'मासिक पाळीमुळं मला आत्महत्या करायची होती'

ल्युसी

महिन्यांतील काही आठवडे ल्युसी मानसिक आणि शारीरिक व्याधींनी ग्रस्त असणारी वेगळी व्यक्ती वाटायची आणि तिला हे समजत नव्हते की हे का घडतयं. या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती अनेक वर्ष डॉक्टरचा शोध घेत होती. आणि तिला बरं करण्यासाठी वयाच्या 28व्या वर्षी तिचं गर्भाशय काढावं लागलं.

ल्युसी म्हणते, "सकाळी डोळे उघडण्याच्या आधीच मला माहीत झालेलं असायचं की सगळं बदलेलं असणार. माझ्यावर मोठं वजन ठेवलं आहे की काय असं वाटत असे. मी डॉक्टरांकडे जात होते आणि त्यांना सांगत असे की मला पिशाच्च बाधा झाली आहे."

वयात येण्यापूर्वी ल्युसी शांत, आनंदी आणि चिंतामुक्त मुलगी होती. पण वयाच्या 13व्या वर्षापासून तीव्र स्वरुपाचं नैराश्य, अस्वस्थ वाटणे आणि पॅनिक अटॅक यांच्याशी तिचा सामना सुरू झाला.

ती स्वतःला इजा करून घेऊ लागली होती आणि मूडमध्ये होणारे तीव्र बदल ती अनुभवत होती. त्यामुळे तिला वयाच्या 14व्या वर्षी तिला शाळेतून काढून किशोरवयीन मुलांच्या मनोविकार केंद्रात भरती करावं लागलं होतं.

ल्युसी या जुन्या आठवणी सांगत होती. "पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर आणि ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसऑर्डर हे आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. डॉक्टर वारंवार बायपोलर डिसऑर्डरचाही उल्लेख करत असत."

पण तिच्या लक्षणांचं विशिष्ट चक्र मात्र कशातच बसत नव्हतं.

पण 16व्या वर्षी जेव्हा ती गरोदर होती आणि तिचा मुलगा टोबीचा जन्म झाला, त्यानंतर तिची परिस्थिती बदलली.

"दवाखान्यातून बाहेर पडताच मला दिसणारी ही लक्षण गायब झाली. मी आनंदी होते, मला छान वाटू लागलं होतं. मानसिकदृष्ट्या मला अगदी उत्तम वाटू लागलं होतं. माझ्यासाठीही हा धक्काच होता," असं ती म्हणाली.

गरोदरपणाच्या काळात आणि बाळ स्तनपान करत असे पर्यंत तिची स्थिती चांगली होती. पण पाळी सुरू होताचं तिच्यामधील आजारपणाच्या लक्षणांनी पुन्हा डोकं वर काढलं होतं.

काही वर्षांनंतर ल्युसीनं पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण याचं कारणांमुळं तिला कॉलेज सोडावं लागलं. त्यानंतर तिनं टिचिंग असिस्टंट होण्यासाठी नॅशनल व्होकेशनल क्वॉलिफिकेशनसाठी प्रवेश घेतला. पण शेवटची दोन महिने तिला ही लक्षणं असह्य झाल्याने तिला पुन्हा अभ्यासक्रम सोडावा लागला.

ल्युसी वयाच्या 23व्या वर्षी पुन्हा गरोदर होती आणि तिला बेला नावाची मुलगी झाली. तिची मानसिक स्थिती पुन्हा सुधारली.

पण बेलाच्या जन्मानंतर मात्र तिची ही लक्षण पुन्हा सुरू झाली. इतकंच नव्हे तर या लक्षणांची तीव्रता अधिकच वाढली. तिची काही लक्षण शारीरिक स्वरूपाची होती. स्नायू आणि सांध्यांच्या वेदना, आवाज, गंध, स्पर्श अशा संवेदनांसाठीबद्दल अतिसंवेदनशील वाटणे, थकवा वाटणे अशा शारीरिक तक्रारी सुरू झाल्या होत्या. तर विसराळूपणा, आपण मूर्ख आहोत असं वाटणं, अविवेकी वृत्ती अशा, धोकादायक विचार अशा मानसिक व्याधीही होत्याच.

प्रतिमा मथळा ल्युसी गरोदर असताना तिला दिसणारी लक्षण गायब झाली होती.

ती सांगते, "सगळ्यात भीतीदायक होतं ते म्हणजे मला माझ्या शरीराशी आणि मनाशी संबंध नसल्यासारखं वाटतं होतं. मी स्वप्नात आहे, असं वाटायचं. काहीवेळा माझ्या आजूबाजूला असलेल्या लोकांना मी ओळखू शकत नव्हते. मी त्यांना ओळखलं पाहिजे असं वाटायचं. पण त्यांच्या चेहऱ्यावरून मला कशाचं आकलन व्हायचं नाही."

एकवेळ तर अशी आली होती की मला माझाच आवाज ओळखता येत नव्हता. मला माझा आवाज इतरांचा आवाज वाटत असे, असं ती म्हणाली.

तिच्या मनात आत्महत्येचा विचारसुद्धा येत होते आणि ती तिचं जीवन संपवण्याचा धोका निर्माण झाला होता.

हे सर्वकाही घडत होतं ते महिन्याच्या अंतराने. तिचा पती मार्टिनच्या हे लक्षात आल्यानंतर ल्युसीने तिची मासिक पाळी आणि ही लक्षण यांच्यातील संबंध शोधण्यास सुरुवात केली.

ती म्हणते, "काय होतं आहे हे मला स्पष्ट होत होतं. मासिक पाळीवेळी रक्तस्त्रावानंतर मला चांगलं वाटत असे. त्यामुळे मी माझ्या लग्नाची तारीख ठरवताना मासिक स्त्राव सुरू असण्याचा दिवसच निवडला होता."

ल्युसीला असं वाटत होत की हार्मोन्समुळं तिच्या शारीरिक व्याधीत भर पडत आहे की काय. पण आता तिला असं वाटू लागलं होत की या शारीरिक व्याधींना हार्मोन्सच जबाबदार आहेत.

तिनं इंटरनेटवरून जमवलेली माहिती तिला जाणवणाऱ्या 30 लक्षणांची यादी घेऊन ती डॉक्टरकडे गेली. यावेळी तिला सांगण्यात आलं होत की तिला बाळतंपणानंतरच्या नैराश्येचा त्रास होत आहे. यापूर्वीही ती नैराश्येतून गेली असल्याने तिला माहीत होतं की हे नैराश्य नाही.

किशोरवयीन असल्यापासूनच तिच्यावर अँटिडिप्रेसन्ट, अँटिएन्झायटी आणि झोप लागण्यासाठीची औषधं दिली जात होती. यामुळे परिस्थितीमध्ये अधिकच भर पडली होती.

ती सांगते की ती जरी सांगत असली की हे नैराश्य नाही तरी तिच्यावर अॅंटिडिप्रेसंटचा मारा सुरूच होता.

तिच्या डॉक्टरांनी तिला मनोविकार तज्ज्ञांकडे पाठवले. तिला जरी मानसिक आजारांची लक्षणं असली तरी तिला शारीरिक व्याधी आहे, त्यामुळे तिच्यावर उपचार मनोविकार तज्ज्ञांकडून होण शक्य नाही, असं तिला सांगण्यात आलं. ल्युसीने तिच्या डॉक्टरांना स्त्रीरोग तज्ज्ञाकडं दाखवण्याबद्दल विचारणा केली. पण डॉक्टरांनी तिची थट्टा करून तिला परत मानसोपचार तज्ज्ञांकडे पाठवलं.

यावेळी निदान करण्यात आलं, "प्रीमेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसॉर्डर (Premenstrual dysphoric disorder-PMDD). मानसोपचार तज्ज्ञांनी ल्युसीच्या डॉक्टरांनी याची कल्पना दिली आणि तिला स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला दिला. शिवाय तिच्यात स्त्रीबीज निर्मिती पूर्णपणे थांबवण्यासाठी औषधोपचार करण्यात यावेत, असा सल्लाही देण्यात आला.

ल्युसीला हा आशेचा किरण वाटला. पण तिच्या डॉक्टरांना मात्र हे निदान पटलं नाही. तिनं पर्यायी औषधं घ्यावीत असं त्यांनी सूचवलं. तिला विविध प्रकारची गर्भरोधक औषध, अॅंटिडिप्रेसंट दिली जात होती. औषधांचा डोसची मर्यादा संपली की नवीन औषध दिलं जातं होतं. या औषधांमुळे तिला पूर्ण बधीर वाटू लागलं होतं.

"माझ्या जीवनातील हा सर्वांत वाईट काळ होता. मला बोलताही येत नव्हतं. मला बोलताना वाक्य ही नीट बनवता येत नव्हतं," ती सांगते.

तिचा नवरा मार्टिन यांनं तिला दुसऱ्या डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला. ती दुसऱ्या डॉक्टरांकडे गेली. कोणतेच उपाय चालत नसल्याने शेवटचा पर्याय म्हणून तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे पाठवण्यात आला.

PMDDच निदान झाल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाईपर्यंत 1 वर्षाचा वेळ गेला होता. तिला तातडीनं ओएस्ट्रोजेनची निर्मिती थांबवण्यासाठी इंजेक्शन देण्यात आलं. हे इंजेक्शन चार आठवड्यांनी घ्यायचं होतं. त्यामुळे तिची मासिक पाळी थांबणार होती. या इंजेक्शनचा लाभ झाला तर PMDDचं निदान निश्चित मानण्यात येणार होतं.

तिला पहिली 2 आठवडे मोठा त्रास झाला. पण कालांतराने तिला बरं वाटू लागलं होतं. गेल्या दशकभरात तिला पहिल्यांदाच बरं वाटू लागलं होतं. तिची सर्व लक्षण नाहिशी झाली होती. दोनच महिन्यात तिची इतर सर्व औषधं बंद करता आली होती. ही औषधं ती किशोर वयापासून घेत होती.

पाच महिन्यानंतर तिला PMDD असल्याचं निदान करण्यात निश्चित झालं होतं. तिला गर्भाशय काढून टाकण्याचा (हिस्ट्रेक्टॉमी) पर्याय देण्यात आला.

ल्युसीला आणखी एक मूल हवं होतं. पण आणखी एक मूल होऊ देण्याची तिची इच्छा डळमळू लागली होती.

ती सांगते, "दुसरं मूल हवं असेल तर मला हे इंजेक्शन बंद करावे लागणार होते. म्हणजे मासिक पाळी परत सुरू होणार. म्हणजे आणखी सगळा त्रास पुन्हा सुरू होणार होता. ते माझ्यासाठी अशक्य होतं. माझ्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार येणार होते. सगळं काही भीतीदायक होतं."

ल्युसीने तिच्या पतीशी चर्चा केली. त्याने ल्युसीला पाठबळ दिलं. पण त्याने तिला सांगितलं की तिनं हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, कारण तिला मुलं होणार नाही शिवाय इंजेक्शनने बंद केलेली मासिक पाळी कायमची बंद होणार होती.

त्यानंतर दोघांनी एकत्र बसून ल्युसीला किती प्रकारचे त्रास झाले याची यादी बनवली. ही यादी 42 इतकी झाली.

ती म्हणते, "ही यादी पाहिल्यानंतर मी हे पुन्हा सोसू शकणार नाही, याची जाणीव झाली. खरंतर सर्वसामान्य आयुष्य म्हणजे काय असतं हे मी कधी अनुभवलचं नव्हतं. आमच्या आयुष्यात झालेला बदल आम्ही दोघं पाहात होतो."

गर्भाशय काढून टाकण्याच्या निर्णायापर्यंत ती आली होती, तोवर तिच्यात पुन्हा जुनी लक्षणं दिसू लागली.

"लक्षणं पुन्हा दिसू लागली. आत्महत्या करण्याचे विचार पुन्हा माझ्या मनात येऊ लागले होते. इंजेक्शन काम करू लागले नव्हते. त्यामुळे ती वारंवार घ्यावीशी वाटत होती. मला या इंजेक्शनच व्यसन जडू लागलं होतं."

ल्युसीच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिला सांगितलं इंजेक्शन काम करत नाहीत, असं होणार नाही. याचा अर्थ PMDDची निदान चुकलं आहे आणि तिनं पुन्हा गर्भधारणा रोखण्याची जुनी औषध घ्यावीत.

यावेळी तिला इंजेक्शन देणाऱ्या नर्सने तिला दुसऱ्या एका जनरल प्रॅक्टिशरला दाखवण्याचा सल्ला दिला. या जनरल प्रॅक्टिशर डॉक्टरने तिला लंडनमधील चेल्सी वेस्टमिनिस्टर या हॉस्पिटलमध्ये रेफर केले.

या हॉस्पिटलमध्ये ल्युसीने तिची गेली 15 वर्षांतील कथा सांगितली. तिनं जेव्हा सांगितलं की इंजेक्शन काम करत नाही, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की असं होण अगदीच सामान्य आहे. हा ल्युसीसाठी मोठाच सुस्कारा होता.

तिला प्रत्येक 10 आठवड्यानंतर घ्यायचं एक इंजेक्शन देण्यात आल. याचा तिला फारच फायदा झाला. गर्भाशय काढून टाकावं लागणार नाही, असं वाटू लागलं.

पण ल्युसीला नव्याच समस्येला तोंड द्यावं लागू लागलं. ते म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात पाळी बंद केल्यामुळं तिची हाडं ठिसूळ होऊ लागली होती. त्यानंतर तिला हार्मोन रिप्लेसमेंट थेरीप देण्यात आली पण त्यातून ती अधिकच आजारी पडू लागली.

त्यामुळं डिसेंबर 2016ला तिनं गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

आता शस्त्रक्रियेनंतर एका वर्षात ती जी गेल्या दहा वर्षांत ती जे करू शकली नाही ते ती करू शकली नाही. ती आती अभ्यासक्रम पूर्ण करून टीचिंग असिस्टंट म्हणून काम करू लागली आहे.

निदान होण्यासाठी वेळ लागला याबद्दल ल्युसीला वाईट वाटत नाही. "निदान फार शेवटी झालं. पण यावर उपचार होऊ शकतात याचा आनंद होतो. मला फार चांगल्या लोकांशी भेटता आलं."

मुलीच्या जन्मानंतर डॉक्टरांनी तिला अधिक गांभीर्याने घ्यायला हवं होतं, असं तिला वाटतं.

शस्त्रक्रियेनंतर ल्युसीचंच नाही तर तिच्या कुटुंबाच जीवनही बदललं आहे. मार्टिन संगीतकार आहे. ल्युसी आता मुलांकडे लक्ष देऊ शकते, त्यामुळे मार्टिन कामावर लक्ष देऊ शकतो. कुटुंब म्हणू ते आता अधिक आनंदी आहेत.

ल्युसी म्हणते, "इतर सर्व सर्वसामान्य कसं जगतात, ते आता कळालं. ते किती भाग्यवान आहेत असं मला वाटते."

PMDDम्हणजे काय?

PMDD हा प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोमचं (PMS) तीव्र स्वरूप असतं. हार्मोन्समधील बदल याला कारणीभूत असतात. मासिक पाळी सुरू असलेल्या 5 ते 10 टक्के महिलांत PMDD दिसून येतो. या मागं जनुकीय कारणही असतात. PMSच्या मागे फॅमिली हिस्ट्री असते, असं संशोधकांनी दाखवून दिलं आहे.

शारीरिक लक्षण सर्वसामान्य असली तरी मानसिक लक्षण मात्र मोठ्या समस्या निर्माण करतात. PMDD कोणालाही होऊ शकतो. पण सर्वसामान्यपणे किशोर वयात पहिल्यांदा मासिक पाळी सुरू होताना आणि 35 वयानंतर PMDD उद्भवतो. PMDDमध्ये गर्भाशय काढण्याचा पर्याय शेवटचा असतो. पेशंटना HRTचे उपचार द्यावे लगतात.

संदर्भ : निक पेनी आणि अॅना फेन्टन

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)