बिझी बिझी बिझी! आपण खरंच आयुष्यात इतके व्यग्र आहोत का?

तुम्ही एकाच वेळी किती संभाषणांमध्ये गुंतलेले असता? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुम्ही एकाच वेळी किती संभाषणांमध्ये गुंतलेले असता?

आपण खूप बिझी आहोत, अगदी गळ्यापर्यंत कामात बुडालेलो आहोत, असं तुम्हांला वाटतं का? (खरंतर परिस्थिती अशी असते की, तुम्ही खरोखर एवढे व्यग्र नसता!)

व्यग्रतेच्या भावनेनं तुम्ही वेढलेले आहात का? कधीकधी आपल्य़ाला असं वाटतं की, आपण याएवढे व्यस्त याआधी कधीच नव्हतो. पण हा विचार काही तितकसा खरा नसतो, असं प्रतिपादन ऑलिव्हर बर्कमन यांनी केलं आहे. बीबीसी रेडिओ 4 वरून प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमात त्यांनी या विषयाचा विविध अंगांनी वेध घेतला.

आधुनिक जीवनशैलीतल्या काही बोचऱ्या मुद्द्यांपैकी एक वादग्रस्त मुद्दा म्हणजे लोकांची व्यस्तता. भोवताली एक नजर टाकली तर जो तो आपापल्या कामात व्यस्त झालेला दिसतो. उद्योगप्रधान जगतात केलेल्या एका सर्वेक्षणात `आम्हाला वाजवीपेक्षा अधिक काम दिलं जातं, त्यामुळं कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळच देता येत नाही,` अशा आशयाच्या तक्रारी संशोधकांना उत्तरांमध्ये मिळाल्या.

आणि हे शक्य आहे, कारण या लोकांना तुम्हाला कसं वाटतं, हेदेखील कधी कुणी विचारलं नव्हतं. 2014 मध्ये करण्यात आलेल्या एका व्यापक अभ्यासानुसार लोकांनी या सर्वेक्षणात सहभागी व्हायलादेखील नम्रपणं नकार दिला. का? कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता.

या व्यस्तेमागील सर्वांत साधं डोक्यात येतं ते हे की आजच्या काळात आपल्याकडे कामच इतकी आहेत की वेळच उरत नाही. आपण व्यग्र आहोत कारण आपल्याला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण इथंच आपलं समीकरण चुकतं.

लोकांचा काम करण्याचा एकूण वेळ - ज्यासाठी त्यांना पगार मिळतो किेंवा नाही मिळत - तो वेळ गेल्या काही दशकांत युरोप किंवा उत्तर अमेरिकेत वाढलेलाच नाही. आधुनिक काळातल्या पालकांना कायम घोर लागलेला असतो की आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नाही आहोत. पण एका अभ्यासानुसार या पिढीचे पालक खरंच आधीच्या पिढीपेक्षा जास्त वेळ आपल्या पाल्यांसोबत घालवत आहे.

Image copyright iStock
प्रतिमा मथळा बिझी असण्याचे फायदे आहेत आणि तोटेही

"गेल्या 50 वर्षांतल्या काही प्रमुख बदलांवर एक नजर टाकल्यास असं दिसतं की पूर्वीच्या स्त्रियांपेक्षा आजच्या स्त्रिया मोबदला न मिळणारी कामं कमी करत आहेत. तर पुरुषांच्या मोबदला मिळणाऱ्या कामाचं प्रमाण कमी झालं आणि मोबदला न मिळणाऱ्या कामाच्या प्रमाणात वाढ झाली," असं मत ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या `द सेंटर फॉर द टाईम युज रिसर्च`चे जोनाथन गेरशुनी यांनी मांडलं.

पण "एकंदर कामाचं स्वरूप हे दिसायला खूप आहे असं वाटतं, पण ते तेवढंच असतं," असं ते म्हणतात. त्याखेरीज त्यांनी मांडलेल्या आकडेवारीनुसार "जे लोक आपण खूप बिझी आहोत, असं सतत सांगतात ते साधारणपणं तेवढे बिझी नसतात."

हे बिझी असण्याचं प्रकरण नक्की आहे तरी काय? या प्रश्नाच्या उत्तरात साधं-सोपं अर्थशास्त्र दडलेलं आहे.

जसजशी अर्थव्यवस्था वाढली आहे आणि लोकांचे पगार वाढले आहेत तसतसा काळ खरोखरच बहुमोल होत गेला आहे. आता दर तासाला अधिक मूल्य मिळायला हवं, म्हणून मग कमी वेळात अधिक काम व्हावं, अशा ताणाखाली आपण जणू चिरडले जात आहोत, असं वाटतं.

पण आपण कोणत्या प्रकारच्या कामात व्यग्र आहोत, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पूर्वीच्या काळातलं शेतीचं क्षेत्र असो किंवा उत्पादन निर्मितीचं असो, कामगाराला शारीरिक कष्टांची जणू शिक्षा असायची, पण त्यालाही काही मर्यादा होत्याच. सुगीचा हंगाम होण्यापूर्वीच आपण पीक कापत नसू; उपलब्ध साधनांखेरीज अधिकचं उत्पादन घेताच येत नव्हतं.

पण व्यवस्थापन तज्ज्ञ पीटर ड्रकर यांनी या बदललेल्या काळाचं वर्णन "नॉलेज वर्क" असं केलं आहे. आणि या काळात आपण अमर्याद जगात राहत आहोत, असं `Busy: How to Thrive in a World of Too Much` या पुस्तकाचे लेखक टोनी क्रॅब म्हणतात.

इथं सतत ईमेल्स येतात, सारख्या मिटिंग्ज होतात, वाचण्याजोग्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, कित्येक कल्पनांचा पाठपुरावा करणं बाकी आहे आणि डिजिटल मोबाईल तंत्रज्ञानामुळं आपण यापैकी कित्येक गोष्टी घरी, सुट्टीवर असताना किंवा प्रसंगी जिममध्ये गेल्यावर सहजगत्या हाताळू शकतो. या साऱ्याची अपरिहार्य परिणती होते ती स्वतःला बिझी वाटण्यात... सतत व्यग्रता असण्यात. पण माणूस म्हणून आपल्या सगळ्यांची एक मर्यादा आहे.

आपल्या उर्जेला आणि योग्यतेलाही काही मर्यादा आहेत. तरीही या अफाट पसाऱ्याच्या जगात आपण शक्य तेवढ्या गोष्टी साधायची जीवघेणी धडपड करतच असतो.

"Do it all" अर्थात सगळ्या गोष्टी साध्य करायला हव्यात, असं एक प्रकारचं सोशल प्रेशर आपल्यावर घरीदारी येत असतं. पण ही गोष्ट केवळ खरोखरच कठीण आहे, असं नव्हे तर त्यात अचूकपणा येणंदेखील अशक्य गोष्ट आहे.

"आपण सतत पुढं करत असलेल्या 'बिझी फिलिंग' या संज्ञेतली एक औपरोधिक निष्पत्ती अशी की, आपण सगळ्याच गोष्टी घाईघाईनं साध्य करायला जातो आणि त्यातल्या फार थोडक्या गोष्टी साध्य होतात."

Image copyright iStock
प्रतिमा मथळा तुम्ही बिझी आहात?

काळाचा हा वाढत जाणारा दबाव आपल्याला फारसा विचार करायला वाव न देता जणू भुईसपाट करतो, वेळेच्या या शर्यतीत आपलं बहुतांशी लक्ष घड्याळ्याच्या काट्यांवर स्थिरावलेलं असतं, यात आश्चर्य ते काय... पण मानसशास्त्रासंबंधीचं संशोधन सप्रमाण सिद्ध करतं की, काळ-काम-वेगाची ही जाणीव असल्यानं आपली कामगिरी अधिक खालावते (इथं सहानुभूतीची पातळी घटण्याचा उल्लेखही नाही). म्हणूनच "आपण सतत पुढं करत असलेल्या 'बिझी फिलिंग' या संज्ञेतली एक औपरोधिक निष्पत्ती अशी की, आपण सगळ्याच गोष्टी घाईघाईनं साध्य करायला जातो आणि त्यातल्या फार थोडक्या गोष्टी साध्य होतात," असं म्हटलं गेलं.

अर्थशास्त्रज्ञ सेंथील मुल्लईनाथन आणि बिहेव्हिअरल सायन्टिस्ट एल्दार शाफिर यांनी या समस्येचं वर्णन "cognitive bandwidth" असं केलं आहे. सतत अभावाची भावना मनात वागवणं - मग तो अभाव पैशांचा असो किंवा वेळेचा, सतत चिंता करणं आणि या चिंतेचंच जणू लक्ष्य होणं, त्यामुळं निर्णयक्षमता दुर्बल होण्यासारख्या गोष्टी घडतात.

आपण व्यग्र असतो तेव्हा आपलं वेळेचं नियोजन गडबडतं - कोणत्या गोष्टीची निवड करावी, कोणत्या गोष्टींना प्राधान्य देऊन त्या कशा हाताळाव्यात, या गोष्टी एखाद्या चक्रव्यूहासमान भासू लागतात आणि किरकोळ गोष्टींनाही उगीचच महत्त्व प्राप्त होतं. या एखाद्या दुष्टचक्रासमान असणाऱ्या फेऱ्यात आपण स्वतःला पूर्वीपेक्षाही अधिक पटीनं व्यग्र समजू लागतो.

या सगळ्यांत अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे जसजशी ही मनोवृत्ती बळावू लागते, त्याचा परिणाम आपल्या फुरसतीच्या वेळेवरही होतो. म्हणून मग मोठ्या उदार मनानं आपण स्वतःला तास-दोन तास क्षणभर विश्रांती म्हणून देऊ करतो आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा होईल, ते पाहतो.

"आपल्या कामातून थोडीशी फुरसत काढणं, ही खरंतर सहजप्रवृत्ती आहे. पण या वेळेची नुकसानभरपाई म्हणून आपण प्रॉडक्टटीव्ह गोष्टीच करायला लागतो, हे अपायकारक आहे," असं मारिया पोपोव्हा या 'ब्रेन पिकिंग' च्या ब्लॉगरचं मत आहे.

तिनं स्वतःच्या छंदांचं निरीक्षण नोंदवलं आहे. उदाहरणार्थ - फोटोग्राफी. ती सांगते की, "एके काळी मी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन सगळीकडं फिरायची. पण सध्या `शेअरिंग` हे भूतच जणू माझ्या मानगुटीवर बसलेलं असतं. मग छायाचित्र काढायचं कशाला तर ते फेसबुक आणि इस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठीच. ही बाब मग आपसूकच एक ओझं होऊन जाते."

Image copyright olaser
प्रतिमा मथळा बिझी असल्याचा बहाणा आपण सातत्याने करतो.

`बिझिनेस` या सर्वत्र पसरलेल्या मनोवस्थेवर मग काही उपाय आहे का? काही जण विचार करत आहेत की कामाचा आठवडा 21 तासांचा करण्यात यावा. पण यासारखे पर्याय 'आपण बिझी आहोत' या आपल्या दृष्टिकोनास दुजोरा देण्याचं काम करतील, त्याचा उपाय शोधणार नाही.

ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर संपत्ती, यश आणि सामाजिक श्रेष्ठत्वाचं मूलभूत प्रतीक म्हणजे कुठलंही काम करण्याची गरज न पडणं. कामापासून सुटका मिळवून निवांत वेळ घालवता येणं म्हणजे खरं यश होय, असा विचार 19व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ थॉर्स्टीन व्हेब्लेन यांनीही मांडला.

पण आता 'बिझिनेस' हे हाय स्टेटसचं मानक झालं आहे. "आपल्या समाजातली मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा वेळ मौल्यवान असायलाच हवा, असं गृहित धरलं जात. आणि ती तशी असावीतही," असा विचार मांडून गेरशुनी पुढं सांगतात की, ``मला तुम्ही विचारलंत की, मी बिझी आहे का, तर 'हो, मी बिझी आहे' असं मी तुम्हाला सांगेन. 'कारण मी एक महत्त्वाची व्यक्ती आहे'."

हे सगळं वरकरणी विसंगत वाटत असलं तरी एक प्रकारे त्यात एक उपयुक्त बाबही दडलेली आहे. ही गोष्ट बिहेव्हिरिअल अर्थशास्त्रज्ञ डॅन एरिली आपल्या निदर्शनास आणून देतात. एकदा त्यांची गाठ एका कुलुपवाल्याशी पडली. ते सांगतात, "व्यवसायाच्या सुरुवातीला त्याला त्यात फारशी गती नव्हती. तेव्हा त्याला दरवाजा उघडायला बराच वेळ लागायचा आणि अनेकदा त्याला कुलुपं तोडावी लागायची. तरीही लोक त्याला त्याचे पैसे द्यायचे आणि टिपही द्यायचे. कालांतराने तो त्या कामात वाकबगार होऊ लागला आणि झटपट कामही करू लागला. मग लोक त्याला पैसे देताना कुरकूर करू लागले आणि टिप देणं तर त्यांनी थांबवलंच."

"आता तुम्हाला वाटेल की, त्यांच्या घरात किंवा गाडीत त्यांना पटकन प्रवेश मिळाला म्हणून लोकांनी त्याला अधिक पैसे द्यायला हवे. पण तसं नाही. लोक त्याला त्याच्या कामाचा वेळ आणि कुलूप उघडण्यासाठी किती कष्ट लागले, यावरून पैसे देत होते. जास्त वेळ म्हणजे जास्त कष्ट आणि म्हणून जास्त पैसे आणि कधीकधी टिपही, मग त्यासाठी जास्त वाट पाहण्याची त्यांची तयारी असायची."

अनेकदा आपली हीच प्रवृत्ती केवळ लोकांसाठीच नव्हे तर आपल्यासाठीही असते. आपण आपल्या कामगिरीचा निष्कर्ष योग्य होता की नाही यावर त्याचं मूल्यमापन न करता त्यासाठी आपण किती वेळ दिला, किती जोर लावला हा कळीचा मुद्दा असतो.

आपण जगतो आहोत बेभानपणे, तुकड्यातुकड्यांनी, कारण त्यातच आपल्याला आपल्या आयुष्याची मजा येत आहे.

पण थोडं सौम्य शब्दांत सांगायचं तर या अशा जगण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कदाचित आपणच आयुष्यात कुठंतरी थोडा अल्पविराम घ्यायला हवा, आणि विचार करायला हवा... आपण खरंच इतकं बिझी आहोत का?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)