नॅशनल जिओग्राफिक : 'आमचं कव्हरेज वर्णद्वेषी होतं'

1888ला नॅशनल जिओग्राफिकचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. Image copyright SHUTTERSTOCK
प्रतिमा मथळा 1888ला नॅशनल जिओग्राफिकचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.

गतकाळात आम्ही जगभरातील लोकांचं केलेलं कव्हरेज हे वर्णद्वेषी होतं, अशी कबुली अमेरिकन मॅगझिन नॅशनल जिओग्राफिकनं दिली आहे.

गौरवर्णीयांच्या व्यतिरिक्त अमेरिकन लोकांकडे आमच्याकडून दुर्लक्ष करण्यात आलं आणि गौरवर्णीयांव्यतिरिक्त इतरांचं साचेबद्ध चित्रण करण्यात आलं. काही गटांना क्रूर किंवा इतरांपेक्षा वेगळं दाखविण्यात आलं, असं संपादक सुझान गोल्डबर्ग यांनी स्वतःच सांगितलं.

नागरी हक्क चळवळीचे प्रणेते मार्टिन ल्युथर किंग यांच्या हत्येला 50 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मॅगझिनतर्फे आपल्या आत्तापर्यंतच्या कव्हरेजचा पुनर्आढावा घेतला जात आहे.

या मासिकाचा एप्रिल महिन्याचा अंक हा वर्णाभेदावर आधारित असून त्यात इतिहासकारांना भूतकाळातील मुद्द्यांकडे लक्ष देण्याविषयी विचारणा केली आहे.

"वर्णद्वेषाचा वापर हा राजकीय हेतूसाठी केला जात असल्याच्या कृतीची आज कबुली देऊ या आणि आपण यापेक्षा चांगले आहोत हे सिद्ध करू या," असं गोल्डबर्ग यांनी लिहिलं आहे. "अनेक दशकं आमचं कव्हरेज वर्णद्वेषी होतं," असं त्यांनी त्यांच्या संपादकीयमध्ये लिहिलं आहे.

मॅगझिनमधील काही संग्राहित साहित्य बघून आपण निःशब्द झाल्याच गोल्डबर्ग म्हणाल्या. "यात 1916मधील ऑस्ट्रेलियन आदिवासींचं एक छायाचित्र असून त्याला 'दक्षिण ऑस्ट्रेलियन ब्लॅकफेलोज' अशी ओळ देण्यात आली आहे. मानव जातीच्या बुद्धिमत्तेच्या तुलनेत ही सगळी माणसं सर्वांत खालच्या पातळीवर असल्याचं सांगण्यात आलं," गोल्डबर्ग म्हणाले.

Image copyright Twitter / @NatGeo
प्रतिमा मथळा Twitter / @NatGeo

व्हर्जिनिया विद्यापीठातील प्राध्यापक जॉन एडविन मॅसन यांनी सांगितलं की, नॅशनल जिओग्राफिकने माध्यम म्हणून प्रचंड अधिकारवाणीनं केवळ वर्णद्वेषासंबंधी वृत्ती वाढविण्याचंच काम केलं. 1970पर्यंत मॅगझिनने गौरवर्णीय नसलेल्यांना डावलल्याचं दाखवताना त्यांना केवळ कामगार किंवा घरगुती नोकर दाखविल्याचं मॅसन यांनी लक्षात आणून दिलं.

पाश्चिमात्य तंत्रज्ञानाच्या पुढे मूळ रहिवासी किंवा आदिवासींची तुलना Us and Them - 'आम्ही आणि ते' अशा भेदातूनच केली गेली. 'सुसंस्कृत आणि असंस्कृत' अशी वातावरण निर्मिती केली गेली, या मुद्द्याकडेही प्रा. मॅसन यांनी लक्ष वेधलं. यासंदर्भात पॅसिफिक आयलँडवरील महिलांची भरपूर छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आल्याचं त्यांनी दाखवून दिलं.

1962 मधील वर्णद्वेषी दक्षिण आफ्रिकेवरील लेखांत समस्यांविषयी क्वचितच लिहिण्यात आलं आहे. 1977मधील दुसरा लेख जो कृष्णवर्णीय नेत्यांच्या शासनाला विरोध दर्शवणारा होता, असं या प्राध्यापकांनी सांगितलं.

Image copyright AFP/GETTY
प्रतिमा मथळा मार्टिन ल्युथर किंग

नॅशनल जिओग्राफिक : दृष्टिक्षेपात

नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी या नॉन-प्रॉफिट एज्युकेशन ग्रुपची स्थापना झाल्यानंतर मॅगझिनचा पहिला अंक सप्टेंबर 1888मध्ये प्रकाशित झाला.

1980 मध्ये 1 कोटी 20 लाख अंक असलेल्या या मॅगझिनचे सध्या 60 लाख अंक प्रकाशित होतात.

जानेवारी 1905पूर्वी ते फक्त लेख छापत होते. नंतर त्यांनी छायाचित्रांचं कव्हरेजही सुरू केलं.

1982 मध्ये पिरॅमिड ऑफ गाझाच्या छायाचित्रात फेरफार करून त्यांनी ते कव्हरवर छापलं. हा घोटाळा पहिलं डिजिटल फोटोशॉप स्कँडल म्हणून गाजला.

जून 1985च्या अंकाच्या कव्हरवर हिरव्या डोळ्यांच्या अफगाणी युवतीचं छायाचित्र छापलं गेलं. ते जगप्रसिद्ध झालं आणि अजूनही त्यावर बातम्या होत असतात.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)