पॅलेस्टाइनचे पंतप्रधान हमदल्लाह यांच्या ताफ्यावर गाझापट्टीत हल्ला

गाझा, पॅलेस्टाइन, शांतता Image copyright AFP
प्रतिमा मथळा पॅलेस्टाइनचे पंतप्रधान रामी हमदल्लाह यांच्या ताफ्यावर गाझापट्टीत हल्ला करण्यात आला.

पॅलेस्टाइननचे पंतप्रधान रामी हमदल्लाह यांच्या ताफ्यावर गाझापट्टीत स्फोटकांद्वारे लक्ष्य करण्यात आले. सुदैवाने ते या हल्ल्यातून सुखरुप बचावलेत.

अजून पर्यंत कोणत्याही संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान या हल्ल्यात काही सुरक्षा यंत्रणांचे जवान जखमी झाले आहेत.

हा पंतप्रधानांच्या हत्येचा प्रयत्न असल्याचा दावा पॅलेस्टाइन प्रशासनानं केला आहे. या हल्ल्यासाठी हमास चळवळीतले कट्टरवादी जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला.

तर गाझापट्टीतल्या सुरक्षा व्यवस्थेला हानी पोहोचवण्यासाठी हल्ला करण्यात आल्याचं हमासचं म्हणणं आहे.

पॅलेस्टाइनमधील विविध गटांमध्ये समन्वयाच्या प्रयत्नांमध्ये फूट पाडण्यासाठी हा हल्ला करण्यात आला असं सुद्धा हमासचं म्हणणं आहे.

2007 मध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर हमास आणि राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यातली वैचारिक फूट वाढत गेली.

तेव्हापासून गाझा आणि वेस्ट बँकमध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाइन नागरिकांचे नेतृत्त्व हमास आणि अब्बास स्वतंत्रपणे करत आहेत.

गेल्यावर्षी हमासनं आपलं नियंत्रण असलेल्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या निवडणुकांमध्ये बाजी मारली होती. या विजयासह हमासनं या परिसरातली त्यांची मक्तेदारी आणखी मजबूत केली.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा या हल्ल्यात अनेक गाड्यांचं नुकसान झालं.

गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये हमास आणि फतह यांच्यात सामंजस्य करार झाला. गाझापट्टीचं प्रशासन फतहकडे सोपवण्यासाठी तयार असल्याचं हमासने स्पष्ट केलं होतं. मात्र हा करार लागू करण्यात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या.

पंतप्रधान हमदल्लाह आणि गुप्तचर विभागाचे प्रमुख मजेद फराज हे नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं लक्ष्य होते असं पॅलेस्टाइनच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हमासकडून निषेध

या हल्ल्यात पंतप्रधानांच्या ताफ्यातील तीन गाड्यांचं नुकसान झालं आहे. हल्ल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान रामी हमदल्लाह यांनी गाझापट्टीतील सांडपाणी प्रक्रिया केंद्राचं उद्घाटन केलं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा हल्ला झाला ते ठिकाण.

"असे हल्ले गाझात येण्यापासून आम्हाला रोखू शकत नाहीत. देशाला एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न असेल," असं सांगतानाच हमदल्लाह यांनी हल्लाचा निषेध केला आहे.

पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

दुसरीकडे हमासनंही या हल्ल्याचा निषेध केला आहे. याप्रकरणी त्यांनीही चौकशी सुरू केली आहे.

गेल्यावर्षी हमासच्या सैन्याचे प्रमुख कमांडर माजेन फकहा यांची हत्या करणारेच या हल्ल्याच्या मागे आहेत, असं हमासचे प्रवक्ते फवजी बरहोम यांनी सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)