श्रीलंका दंगली: बौद्ध मठांनी वाचवले मुस्लिमांचे प्राण

  • मुरलीधरन काशी विश्वनाथन
  • बीबीसी तामिळ
फोटो कॅप्शन,

संतविमल थेरर

श्रीलंकेतील कॅंडी शहरातील रहिवाशी मोहंमद थैयुप यांना एका सिंहली कुंटुंबाने आश्रय दिल्याने त्यांचे प्राण वाचले. दुसऱ्या एका घटनेत एका बौद्ध मठात मुस्लिमांची सुरक्षित निवारा उपलब्ध करून दिला आणि अनेकांचे प्राण वाचवले.

श्रीलंकेत सिंहली आणि मुस्लीम समुदायांत मोठा हिंसाचार झाला. त्यातं मोठं नुकसान झालं. पण या दंगली दरम्यान माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना ही पुढं आल्या.

अनेकांनी त्यांच्या शेजाऱ्यांनी हल्ल्यांपासून वाचवलं किंवा जिथे धर्मगुरूंनी पुढं येऊन शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन केलं.

मग शेजारी असतात कशाला?

"दंगली 2.30 ते 5.30 च्या दरम्यान सुरू झाल्या. दंगलखोरांनी मुस्लीमांच्या घरांवर हल्ले करायला सुरुवात केली. माझंही घर त्यापैकी एक होतं," 5 मार्चच्या घटनांबद्दल 76 वर्षांचे मोहम्मद थैयुप सांगत होते.

थैयुप यांचं दुकान कँडी शहरातील दिगाना भागातील पल्लेकेला इथं आहे. त्यांचं दुकान काचेच्या बाटल्यांनी आणि काठ्यांनी फोडण्यात आलं. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या दुकानावर अवलंबून आहे. त्यांचा मुलगा ड्रायव्हर म्हणून काम करतो.

"मी इथे 36 वर्षांपासून काम करतो. मी याआधी कधीही इथं असं पाहिलं नव्हतं. इथल्या सिंहली लोकांच्या मदतीशिवाय असं होणं शक्य नाही. कारण माझ्या बाजूला सिंहली माणसाचं दुकान आहे. त्याच्या दुकानावर हल्ला झाला नाही. त्याच्या बाजूला एका मुस्लीम माणसाचं दुकान होतं, त्याच्या दुकानावर हल्ला झाला," ते सांगत होते.

फोटो कॅप्शन,

जळलेलं दुकान

"मुस्लिमांच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ले झाल्यानं आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला घरात रहायला भीती वाटत होती. घराबाहेर पडण्याचीही हिंमत होत नव्हती. त्यावेळी माझे शेजारी निमल समारासिंगा यांनी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्या घरी आश्रय दिला. आमचं 11 जणाचं कुटुंब आहे म्हणून आधी मी थोडा अडखळलो. पण त्यांनी काही आपला आग्रह सोडला नाही."

संध्याकाळी सातनंतर थैयुप यांच्या घरावर दगडफेक सुरू झाली. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्वजण रात्रभर शेजाऱ्यांकडे थांबले.

"हल्लेखोरांनी आम्हाला ठार मारलं असतं, असं नाही. पण त्यावेळी आम्ही फार घाबरलो होतो. त्या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी आम्हाला आधार दिला. माझ्या दृष्टीने तेच महत्त्वाचं आहे."

निमल हे टीव्ही मेकॅनिक आहेत. ते म्हणाले, "सामान्य सिंहला लोकांना कोणाशीच वैर नसतं. मला वाटतं हल्लेखोर इथले नव्हते."

"ही काही खूप मोठी गोष्ट आहे, असं समजून आम्ही त्यावर बोलत नाही," असं ते म्हणाले.

गरजेच्या वेळी शेजारी कामाला नाही आले तर कोण येणार, असं निमल सांगतात.

हल्ल्यात उद्धवस्त झालेल्या दुकानात थैयुप यांनी अजून काम सुरू केलेलं नाही. सगळा पसारा तसाच पडलाय.

"दुकान साफ करायला येणाऱ्या लोकांना मला 2000 रुपये द्यावे लागतील. माझ्याकडे अजिबात पैसै नाहीत. आता पुन्हा आयुष्याची सुरुवात कशी करावी, हे मला कळत नाही," असं ते म्हणतात.

भिख्खुंची माणुसकी

"जे घडलं ते काही चांगलं नाही. बुद्धानं आपल्याला शांततेची शिकवण दिली आहे," असं श्री हिंदुसारा विहाराई मठाचे संत कर्डिकला संतविमला थेरार हल्ल्यांविषयी बोलताना म्हणतात. हा मठ हिजरानजीकच्या दिगानामध्ये आहे.

जेव्हा शस्त्रधारी लोकांनी त्यांच्या परिसरात हल्ला करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी तातडीनं हालचाल करून त्यांच्या मठात अनेक मुस्लिमांना संरक्षण दिलं.

फोटो कॅप्शन,

थैयुपच्या दुकानाचे या हिंसाचारात नुकसान झालं.

"हिजरा शहराच्या अंबहलंत, कुंबुकंदूर भागात 5000 मुस्लीम कुटुंब आहेत. मी लगेच गेलो आणि सिंहली लोकांना एकत्र करायला सुरुवात केली," असं संथविमलर सांगतात.

त्यांनी अनेक सिंहली लोकांना गोळा करण्यास सुरुवात केली आणि मुस्लिमांच्या सुरक्षिततेचं आव्हान केलं. त्यांनी मुस्लिमांना चार दिवस सुरक्षित ठेवल्याचं बीबीसी तामीळशी बोलताना सांगितलं. पण कथित हल्लेखोरांबद्दल काहीही माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

त्यांच्यासारख्याच अनेक बुद्ध भिख्खूंनी त्यांच्या आसपासच्या मुस्लिमांचं रक्षण केलं. कँडी जिल्ह्यात 150 दुकानं, धार्मिक स्थळं आणि घरांचं या हल्ल्यांमध्ये नुकसान झालं.

या हिंसाचार प्रकरणी 150पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत. पण याबद्दल जादा माहिती मिळत नाही.

फोटो कॅप्शन,

जळलेलं दुकान

20 फेब्रुवारीला चार मुस्लीम व्यक्तींनी तेलेदेनिया भागात एका अपघाताशी संबंध असल्याच्या कारणावरून एका ड्रायव्हरला मारहाण केली. हा ड्रायव्हर सिंहला समुदायाचा होता आणि काही दिवसांच्या उपचारानंतर त्याचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं.

ज्या मुस्लीम लोकांनी त्या सिंहला ड्रायव्हरला मारहाण केली होती त्यांच्यापैकी एक दिगानाचा राहिवासी होता. त्यातून संघर्षाची पहिली ठिणगी दिगानामध्ये पडली. या दंगलीचं लोण नंतर इतर ठिकाणी पसरलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)