इराणनं अणुबाँब बनवला तर आम्हीही बनवणार - सौदी अरेबिया

इराणचे अध्यक्ष आयतुल्ला खोमेनी आणि सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान Image copyright Reuters / EPA
प्रतिमा मथळा इराणचे अध्यक्ष आयतुल्ला खोमेनी आणि सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान

इराणने जर अणुबाँब बनवला तर सौदी अरेबियाही अणुबाँबची निर्मिती करेल असा इशारा सौदी अरबचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी दिला आहे.

"आमचा देश अणुबाँब बनवण्यास इच्छुक नक्कीच नाही. पण, इराणने जर अणुबाँबची निर्मिती केली तर, लवकरात लवकर आम्हीही अणुबाँबची निर्मिती करू यात शंका नाही," असं राजपुत्र मोहम्मद बिन सालेह यांनी अमेरिकी वृत्तवाहिनी सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

2015मध्ये जगातल्या सगळ्या देशांसोबत झालेल्या करारानंतर इराणनं आपला अण्वस्त्र कार्यक्रम बंद केला होता. मात्र, या करारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या करारातून बाहेर पडण्याची धमकी दिली होती.

मध्य-पूर्वेकडील क्षेत्रांत सौदी अरबिया आणि इराण ही दोन्ही राष्ट्रं गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांविरोधात शड्डू ठोकून आहेत. या दोन्ही देशांत इस्लामच्या वेगवेगळ्या पंथांचं प्रभुत्व असून सौदी अरेबियामध्ये सुन्नी पंथाचा प्रभाव असून इराणमध्ये शिया पंथियांचा प्रभाव आहे.

गेल्या काही वर्षांत दोन्ही देशांदरम्यान सीरिया आणि येमेनमध्ये चाललेल्या गृहयुद्धांमुळे तणाव वाढीस लागला आहे.

'मध्य पूर्वेतले हिटलर'

राजपुत्र मोहम्मद बिन सलमान सौदी अरबच्या सत्तेचे वारसदार असून ते सौदीचे संरक्षण मंत्री आहेत. सीबीएस न्यूजला त्यांनी नुकतीच 1 तासाची मुलाखत दिली.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये इराणचे प्रमुख अयातुल्ला खोमेनी यांनी मध्य पूर्वेतला नवा हिटलर का म्हटलं होतं, याचं स्पष्टीकरणही या मुलाखतीदरम्यान दिलं.

Image copyright Getty Images

सलमान म्हणतात, "त्यांना (खोमेनी) मध्य-पूर्व क्षेत्रांत वेगळ्याच योजनांवर काम करायचं आहे, हिटलरही त्यांच्या काळात असाच विचार करायचे. जोपर्यंत हिटलर यांनी नुकसान केलं नाही, तोपर्यंत ते किती खतरनाक ठरतील याचा अंदाज कोणालाच नव्हता. असं चित्र मध्य-पूर्वेत निर्माण झालेलं आम्हाला पाहायचं नाही."

पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात गुंतवणूक

सौदी अरेबिया हा अमेरिकेचा प्रमुख सहकारी देश आहे. 1988 सालीच या देशाने अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी केली आहे. सौदीनं स्वतःचा अण्वस्त्र कार्यक्रम स्थापित करण्याचा प्रयत्न केला की नाही याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मात्र, पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमात त्यांनी गुंतवणूक केल्याच्या बातम्या अनेकदा प्रसिद्ध झाल्या आहेत.

2013मध्ये इस्त्राईलच्या गुप्त सेनेचे माजी प्रमुख अमोस यादलिन यांनी स्वीडनच्या एका संमेलनात सांगितलं होतं की, "जर इराणने अण्वस्त्र बनवली तर सौदी अरबला अणुबाँब मिळवण्यासाठी एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी लागेल, ते पहिल्यापासूनच या बाँबच्या निर्मितीत गुंतवणूक करत आहेत. ते पाकिस्तानात जातील आणि त्यांना हवं ते शस्त्र घेऊन येतील."

Image copyright EPA

इराणने सुद्धा अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर स्वाक्षरी केली आहे आणि आमचा अण्वस्त्र कार्यक्रम केवळ शांततेसाठी असल्याचं इराण गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे. मात्र, 2015मध्ये आंतरराष्ट्रीय दबावामुळे त्यांना हा कार्यक्रम बंद करावा लागला होता. त्यावेळेला इराण अण्वस्त्र कार्यक्रमांतर्गत अणुबाँबची निर्मिती करत असल्याची शंका बहुतेक देशांना होती.

हा कार्यक्रम त्यांना बंद करण्यास भाग पाडणे हा तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा मोठा विजय मानला गेला होता. मात्र, त्यानंतर सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी हा सगळ्यांत वाईट करार होता अशी टीका केली होती.

अमेरिकेचे माजी गृहमंत्री रेक्स टिलरसन यांचा या कराराला पाठिंबा होता. मात्र, त्यांच्या जागी आता आलेले माईक पोम्पो हे मात्र या कराराच्या विरोधात आहेत. जानेवारीमध्ये ट्रंप यांनी इराणवरील प्रतिबंध काही प्रमाणात कमी केले होते, पण हे शेवटचं असं करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

तर, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या युरोपीय देशांनी ट्रंप यांनी हा करार कायम ठेवावा असं आवाहन केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)