पुणे जिल्ह्याच्या अर्धंही क्षेत्रफळ नसणाऱ्या सिंगापूरच्या प्रगतीचं गुपित

  • सारा केटिंग
  • बीबीसी फ्युचर
सिंगापूर
फोटो कॅप्शन,

सिंगापूरचं विकास प्रारूप अनेक देशांसाठी प्रेरणादायी ठरलं आहे.

"कॉफी प्लीज," सिंगापूरमधील सुसज्ज कॅफेमध्ये, एक वयस्क ग्राहक, दाट दुधाच्या गोड मिट्ट कॉफीची मागणी करत होते. तेव्हा तिथल्या विक्रेत्या स्त्रीला मी विचारलं, "येणारे ग्राहक यापेक्षा काही वेगळ्या आरोग्यपूर्ण पदार्थांची मागणी करीत नाहीत का?" त्यावर ती विक्रेती सूचक हसून म्हणाली, "लोक सवयीचे गुलाम असतात, पण त्यांच्या सवयी हळूहळू बदलता येतात."

नंतर सिंगापूरमधल्या बाजारात फेरफटका मारत असताना, माझ्या भोवताली नूडल्स सूप, बार्बेक्यू पोर्क आणि स्वीट साटे यांचे सुवास दरवळत होते, मात्र या फास्टफूड च्या भाऊगर्दीत काही दुकानांवर 'येथे सकस खाद्य पदार्थ मिळतील' किंवा 'आम्ही पौष्टिक खाद्य तेल वापरतो,' अशा पाट्याही नजरेस पडत होत्या.

हा बदल दिसून येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे सिंगापूर प्रशासनाच्या आरोग्य विभागातर्फे चालवला जाणारा 'हेल्दी डायनिंग प्रोग्राम'. सकस भोजन कार्यक्रमांतर्गत, सकस खाद्यान्न आणि खाद्यपेय यांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या विक्रेत्यांना प्रोत्साहनपर सरकारी आर्थिक अनुदान दिले जाते. सिंगापूर प्रशासनाने आरोग्यपूर्ण आहाराचा पर्याय देऊन, नागरिकांची खाद्यविषयक मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल लहानसे वाटले तरी एका महत्त्वपूर्ण बदलाचे द्योतक म्हणता येईल.

मलेशिया द्वीपकल्पाच्या दक्षिणेला वसलेल्या सिंगापूरमधील प्रशासनयंत्रणा, प्रारंभापासूनच देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, अन्य प्रगत देशांच्या सहयोगाने, नवीन गोष्टी शिकून, सुधारणा घडवून आणण्यासाठी, आग्रही राहिली आहे. याचाच एक भाग म्हणून सिंगापूर प्रशासनाने ब्रिटिश सरकारच्या वर्तनविषयक मानसशास्त्रीय अभ्यासगट 'नज युनिट'शी सहयोग करण्याचे धोरण स्वीकारले.

'नज युनिट', नोबेल पदक विजेत्या 'नज थिअरी' या संकल्पनेवर आधारलेले आहे. साध्या सोप्या योजनांद्वारे, नागरिक त्यांचे निवडीचे स्वातंत्र्य अबाधित ठेवूनही, योग्य पर्याय निवडण्यास प्रवृत्त होतात, असं 'नज थिअरी' संकल्पना सांगते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

नज थिअरी सामाजिक शास्त्रातील महत्त्वाचा सिद्धांत आहे.

आजच्या घडीला, सर्वच प्रगत देशानी 'नज थिअरी' ही संकल्पना 'फॅशन' म्हणून उचलून धरली असली तरी फार पूर्वीपासूनच सिंगापूर मधील विविध कार्यप्रणालींमधून या संकल्पनेचा वापर होत आला आहे. अर्थात असे घडण्यामागील कारण समजून घ्यायचं असेल तर मात्र आपल्याला सिंगापूरच्या इतिहासात डोकावून पाहावे लागेल.

शिस्त, कार्यक्षमता यांसाठी सर्वश्रुत असलेले आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे च्युइंगम सारख्या वस्तूंच्या विक्री वर कायद्याने बंदी आणणारे सिंगापूर हा देश आज जगभरातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपैकी एक म्हणून गणला जातो. अर्थात, हे यश आत्यंतिक प्रयत्नांतूनच साध्य झाले आहे. मलेशियन गणतंत्रातून बाहेर पडल्यानंतर १९६५ साली स्वतंत्र देश म्हणून सिंगापूर अस्तित्वात आला. त्यावेळी सिंगापूर प्रशासनापुढे बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, निकृष्ट दर्जाची घरे , नैसर्गिक स्रोत आणि जमिनीची कमतरता असे अनेक सामाजिक आणि आर्थिक प्रश्न उभे होते.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

सिंगापूरचे तत्कालीन दिवंगत पंतप्रधान ली क्यूआन युव यांनी हे शिवधनुष्य पेललं. अन्य देशांच्या तुलनेत तग धरून राहण्यासाठी देशात सकारात्मक बदल घडवून आणण्याची अनिवार्यता त्यांनी ओळखली होती.

न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना ते म्हणाले होते की, "सिंगापूरचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शेजारी राष्ट्रांपेक्षा काही वेगळे, चांगले घडवून आणणे गरजेचे होते. शेजारी राष्ट्रांकडून काही घेऊन त्या बदल्यात देण्यायोग्य अशा कोणत्याच वस्तूचे उत्पादन त्यावेळी सिंगापूरमध्ये होत नव्हते, म्हणून शेजारी राष्ट्रांपेक्षा वेगळे, चांगले, भ्रष्टाचार मुक्त, कार्यक्षम आणि गुणवत्तापूर्ण असं काही निर्माण करण्याचे कसून प्रयत्न झाले आणि ते पूर्णत्वालाही गेले."

अर्थात हे सर्व घडवून आणण्यासाठी, नागरिकांच्या मूलभूत भौतिक गरजा पूर्ण करू शकेल अशी सामाजिक आणि आर्थिक घडी बसवण्यासाठी, सरकारी हस्तक्षेप, नियंत्रण आवश्यकच होते. घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी गगनचुंबी गृहसंकुले उभारण्यात आली. रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरण, परकीय आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यात आली आणि अर्भकावस्थेतील सिंगापूर राष्ट्र, हळूहळू बाळसे धरू लागले.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरमध्ये राबवण्यात आलेलं नॅशनल स्टेप्स चॅलेंज यशस्वी ठरलं होतं.

सिंगापूरमधील लोकसंख्येत अनेकविध संस्कृतींची सरमिसळ होती. त्यांच्यात सामाजिक जाणिवा आणि सामायिक सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुरवातीच्या काळात अनेक सार्वजनिक मोहिमा राबवण्यात आल्या. पहिल्या टप्प्यात 'कीप सिंगापूर क्लीन' आणि 'प्लांट ट्रीज'अशी घोषवाक्य असलेल्या, स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठीच्या मोहिमा, तसेच लोकसंख्या नियंत्रणाचे नागरिकांना आवाहन करणारे 'स्टॉप अॅट 2' हे अभियान राबवण्यात आले.

सिंगापूरमध्ये होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांबरोबरच, सुसंस्कृत, एकसंघ आणि समंजस अशा समाजाच्या घडणी साठी 'नॅशनल कर्टसी कँम्पेन' चालवण्यात आले आणि 'मँडरिन' भाषेत संवाद साधण्यासाठी नागरिकांना उद्युक्त केले गेले.

१९८६मध्ये सिंगापूरचे पंतप्रधान म्हणाले होते की, "नागरिकांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करत असल्याचा आरोप माझ्यावर नेहमी केला जातो. खरं आहे, पण मी जर तसं केलं नसतं तर आजचा दिवस आपण पाहू शकलो नसतो. अगदी क्षुल्लक वाटणाऱ्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यातल्या बाबी, जसे तुमचे शेजारी कोण आहेत, तुमचे राहणीमान कसं आहे, तुम्ही कोणत्या भाषेत संवाद साधता, तुम्ही का आणि किती आवाज करता, कुठे आणि का थुंकता, वगैरे गोष्टीत मी हस्तक्षेप केला नसता तर आज दिसतेय ती आर्थिक, सामाजिक प्रगती शक्य झाली नसती."

नागरिकांच्या वर्तणूक मानसिकतेचा अंदाज घेऊन, त्यांना विविध पर्याय पुरवून, त्यांतील सर्वतोपरी हितकारक पर्याय निवडण्यासाठी, जाणीवपूर्वक प्रवृत्त करण्याची कार्यपद्धती म्हणजेच 'नजिंग'. हे एकट्या सिंगापूर पुरतेच मर्यादित नसून, जगभरातील १५० हून अधिक देशांच्या शासनयंत्रणा, प्राधान्यक्रमाने याच कार्यपद्धतीचा अवलंब करत आहेत.

या कार्यपद्धतीचा सुपरिणाम म्हणून, गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत सिंगापूरची अर्थव्यवस्था, जगभरात, नाविन्यपूर्ण आणि व्यापारस्नेही अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाऊ लागली. इतकेच नव्हे तर आजही सिंगापूरमधील जनतेत, वर्तनविषयक चांगले बदल घडवून आणणारे सार्वजनिक उपक्रम लोकप्रिय आहेत.

'नजिंग' कार्यपद्धतीची अन्य देशांतील उदाहरणे म्हणजे कतार या देशात रमजानच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांना मधुमेह चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यात आले, कारण त्या काळात अनायसे व्यक्ती उपवास करत असल्याने, मधुमेहाच्या चाचणीसाठी वेगळे उपाशी राहण्याचे कष्ट वाचले. लोकांचा वेळ आणि सोय दोन्हीही साधले गेले आणि त्यांचे आरोग्यही राखले गेले. याला 'नजिंग' कार्यपद्धतीचे यशस्वी उदाहरण म्हणता येईल.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरने विकासासाठी नज थिअरीने सर्वार्थाने उपयोग करून घेतला.

आइसलँडमधील काही शहरे, तसेच भारत आणि चीन या देशांमध्ये '3डी ऑप्टीकल' तंत्राचा वापर करून 'फ्लोटिंग झेब्रा क्रॉसिंग'चा सुरक्षित वाहतूक यंत्रणेसाठी वापर केला जातो. या तंत्रामुळे रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी मारलेले पांढरे पट्टे, जमिनींपासून वर उचलल्याचा आभास, समोरून येणाऱ्या वाहनचालकांना होतो. या मुळे वेगाने वाहन चालवणारे वाहन चालक आपसूकच वेग कमी करण्यास प्रवृत्त होतात आणि संभाव्य अपघात टाळले जातात.

याच धर्तीवर युनायटेड किंग्डम मध्ये नागरिकांना प्राप्तीकर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी बहुतांश प्राप्तीकरदाते वेळच्या वेळी कर भरतात, अशा आशयाची पत्रे घरोघर पाठवली गेली आणि मुख्य म्हणजे याचा सकारात्मक परिणामही दिसून आला.

सिंगापूरमधील 'नजिंग' कार्यप्रणाली अंतर्गत खूपच साध्या पण प्रभावी युक्त्या वापरल्याचे दिसते. उदाहरणार्थ कचऱ्याचे डबे बसथांब्यापासून लांब अंतरावर ठेवले जातात, जेणेकरून धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आपोआपच अन्य प्रवाशांपासून लांब उभ्या राहतील. किंवा वीज बिलांमध्ये शेजाऱ्याच्या वीज बिलाचा तपशील दिला जातो. यामुळे विजेचा वापर नियंत्रणात राखण्याची काळजी प्रत्येक ग्राहकाकडून घेतली जाते.

गगनचुंबी इमारतींतून, अगदी प्रवेशद्वारा शेजारीच व्यायामशाळा उभारल्या जातात, यामुळे व्यायाम करू इच्छिणाऱ्या रहिवाशांची सोय होते आणि इतरांना व्यायामाची आठवण करून दिली जाते. तसेच सिंगापूर मधील रेल्वे स्थानकांवर लाल, हिरवे दिशादर्शक बाण दाखवले जातात, यामुळे रेल्वेगाडीतून प्रवाशांची उतरण्याची प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत होते. तसेच गर्दी नसण्याच्या वेळांमध्ये रेल्वे प्रवास तिकिटाचे दर कमी ठेवण्यात येतात, याचा फायदा म्हणजे गर्दीच्या वेळांत रेल्वेतील गर्दी आटोक्यात राहते आणि नागरिकांच्या पैशांची बचतही होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरने घर उभारणाच्या कार्यक्रम हाती घेतला.

सिंगापूरमधील दहा पैकी सहा नागरिक, आठवड्यातील चार किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळा बाहेरच खातात. तेव्हा नागरिकांना सकस भोजन मिळवून देण्याला प्राधान्यक्रम देत 'हेल्दीअर डायनिंग प्रोग्राम' अंतर्गत काही ठिकाणी सकस अन्न स्वस्त दरात मिळण्याची सोय उपलब्ध आहे. जर कोणाला 'खू टेक पुआट हॉस्पिटल'मध्ये 'फ्राईड बी हून' म्हणजे चमचमीत फास्टफूड खायचे असतील तर मात्र जास्त किंमत मोजावी लागते.

"द नॅशनल स्टेप्स चॅलेंज" हे सकारात्मक 'नजिंग' चे सिंगापूरमधील आणखी एक उदाहरण, या द्वारे सहभागी नागरिक, व्यायामासाठी, पर्यायाने उत्तम आरोग्यासाठी प्रवृत्त होतात. पार केलेल्या पायऱ्यांच्या संख्येच्या बदल्यात बक्षीस म्हणून भेटवस्तू किंवा रोख रक्कम दिली जाते. थोडक्यात खेळाच्या माध्यमातून नागरिकांकडून आरोग्य राखण्याची ध्येय्यपूर्ती करवून घेणे सोपे होते. 'फिटनेस ट्रॅकर' सारख्या व्यायामाच्या साधनांच्या खरेदीसाठी लागलेल्या रांगा पाहिल्यावर या कार्यक्रमाची लोकप्रियता आपल्या सहज लक्षात येते.

नजिंग प्रणालीची अंमलबजावणी अप्रत्यक्षरित्याही करता येते. सिंगापूरमधील नागरिकांच्या वैयक्तिक अर्थकारणावरही 'नजिंग' कार्यपद्धतीचा प्रभाव असल्याचे दिसते. सामान्यतः नागरिकांची भविष्यातील मोठ्या गरजांची तरतूद करण्यासाठी पुरेशी बचत करण्याची मानसिकता दिसून येत नाही हे लक्षात घेऊन 'मँडेटरी सेव्हिंग्स प्रोग्राम अंतर्गत' मिळकतीचा मोठा हिस्सा केंद्रीय भविष्य निर्वाह निधीत गुंतवावा लागतो. ही गुंतवलेली रक्कम फक्त आजारपण, गृहखरेदी किंवा निवृत्तीवेतनाच्या मार्गानेच वापरता येते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरने साधलेली प्रगती विस्मयकारक आहे.

वृद्धांची वाढती लोकसंख्या आणि घटणारी लोकसंख्या या सिंगापूरसमोरील सध्याच्या मोठ्या समस्या आहे. याचा सामना करण्यासाठी २०३० पर्यंत, लोकसंख्या ३० टक्क्यांनी वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांमधील एक म्हणजे 'द बेबी बोनस स्कीम.' हया पालकांसाठीच्या प्रोत्साहनपर योजने अंतर्गत नवजात शिशूच्या जन्मानंतर रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते.

२००१ साली सुरू झालेल्या योजनेनुसार, अपत्य असलेल्या प्रत्येक नागरिकाला रोख रक्कम बक्षीस रूपात दिली जाते. ही रक्कम 'चाईल्ड डेव्हलपमेंट अकाऊंट'मध्ये साठवली जाते आणि फक्त अपत्याच्या शिक्षण आणि आरोग्यसेवेसाठी वापरली जाते. थोडक्यात जितकी जास्त मुले तितकी जास्त रक्कम पालकांकडे जमा होते. मार्च २०१६पासून, पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर ८००० सिंगापूर डॉलर्स (चार लाख रुपये) तर तिसऱ्या अपत्यासाठी १०,००० सिंगापूर डॉलर्स (पाच लाख रुपये) पर्यंत बक्षीस म्हणून रक्कम पालकांना दिली जाते.

लोकांना अशा प्रकारे 'नज' केलेले किंवा 'कोपरखळी' मारलेली खरोखरच आवडते का? यावर होणाऱ्या प्रतिक्रियांमध्ये, निरनिराळ्या सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार काही बदल होतो का? हा ही एक संशोधनाचा विषय आहे. वर्तणूकविषयक मानसशास्त्रीय अभ्यासाची जागतिक पातळीवरील उपयोगिता आणि गरज यांची व्याप्ती खूप मोठी आहे, मात्र, लोकांना 'नजिंग' म्हणजेच एखाद्या गोष्टीसाठी जाणीवपूर्वक प्रवृत्त करणे कितपत आवडते या विषयासंदर्भात त्या मानाने फार कमी संशोधन झाल्याचे लक्षात येते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरमधील एक विहंगम दृश्य

या बाबतच्या युरोप आणि अमेरिकेतील संशोधनानुसार, नीतीमूल्यांची जपणूक करणारे आणि हितकारक असणारे 'नजिंग' सहज स्वीकारले जाते. उदाहरणार्थ एखाद्या फास्टफूड रेस्टॉरंट मध्ये पदार्थांच्या यादीसह त्यातून मिळणाऱ्या उष्मांकांचीही माहिती दिली जात असेल, किंवा वाहन परवाना देताना, स्वेच्छेने, मरणोत्तर अवयव दान करण्याचा पर्याय दिला जात असेल तर या प्रकारच्या सकारात्मक 'नजिंग' ला मोठ्या प्रमाणावर अनुकूल प्रतिसाद मिळतो असे दिसून येते.

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका, आणि दक्षिण कोरिया, रशिया या देशांतून केलेली सर्वेक्षणे, काही अपवाद सोडले तर युरोप आणि अमेरिकेतील सर्वेक्षणांशी मिळतीजुळती होती. त्यातही चीन आणि दक्षिण कोरिया मध्ये 'नजिंग' कार्यपद्धतीला मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद नोंदवला गेला. याउलट जपान, हंगेरी, डेन्मार्कमध्ये हेच प्रमाण खूपच कमी आढळले.

कोणत्याही विवक्षित संशोधनाचा आधार नसला तरीही असे सूचित होते की नागरिकांना भेडसावणाऱ्या थेट दैनंदिन समस्यांवर जर काही तोडगा निघत असेल तर अशा देशांतून 'नजिंग' मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाते. उदाहरणार्थ - चीन मधील वायूप्रदूषण समस्या.

नागरिकांचा देशाच्या सरकारप्रती, विश्वास जितका कमी तितका 'नजिंग' ला मिळणारा प्रतिसाद नकारात्मक असतो हे ही सर्वेक्षणांतून सिद्ध झाले आहे. हंगेरीत सरकारप्रती नागरिकांच्या विश्वासाचे प्रमाण अवघे २८% आहे, तसेच तेथील जनतेने 'नजिंग' च्या बाजूने दिलेला कौल ही असाच नगण्य आहे. मात्र चीनमध्ये स्थिती याच्या सर्वस्वी विरुद्ध आहे.

जागतिक सर्वेक्षणात सिंगापूरचा अंतर्भाव झालेला नसला तरीही सिंगापूरच्या बाबतही हेच म्हणावे लागेल की सरकारप्रति नागरिकांचा विश्वास जितका जास्त तितका 'नजिंग'ला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद जास्त.

'इनोव्हेशन लॅब' या नागरी सेवा आणि सुविधांबाबतच्या धोरणांची आखणी करणाऱ्या लोकसेवा विभागाच्या बहुशाखीय चमूच्या मते सिंगापूरमधील नजिंग कार्यपद्ध्तीचं 'भविष्य डिजिटल आहे.'

त्यांच्या प्रवक्त्याच्या मते डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून सरकारी लोकसेवा विभाग, खासगी सेवासंस्थांपेक्षा गुणवत्तापूर्ण सेवा देऊ शकतील. खासगी सेवा क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या 'चॅट' आणि 'व्हर्च्युअल रिअॅलिटी'सारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर सरकारी सेवाक्षेत्रातही होणे गरजेचे आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

सिंगापूरच्या विकासात तेथील जनतेचा सहभाग आहे.

सार्वजनिक सेवाक्षेत्रांची गुणवत्ता, व्यापारी क्षेत्रातील सेवांच्या तोडीची असावी अशी जनतेची अपेक्षा असते. सद्यस्थितीत, जगाशी जोडले जाण्याची प्रक्रिया वेगवान, तांत्रिकदृष्ट्या प्रगत आणि प्रसंगी वास्तवतेशी फारकत घेतल्यासारखी वाटते. एकंदरीतच या पार्श्वभूमीवर सिंगापूर सरकारनेही आधुनिक तंत्रज्ञानाचा परिपूर्ण वापर करण्याचे योजले आहे.

सिंगापूरमधील चकाकणाऱ्या काचेच्या आणि धातूच्या पत्र्यांनी बनलेल्या गगनचुंबी इमारती पाहताना जाणवते की अवघ्या पन्नास वर्षांपूर्वी येथे काहीच नव्हते. किंबहुना पुरेशी जमीनही उपलब्ध नव्हती. प्रारंभीच्या काळात सरकार आणि नागरिकांमधील सख्यही फारसे चांगले नव्हते. तरीही सिंगापूरवासियांनी मात्र या सुसंवादातूनच स्वतःचे नशीब स्वकष्टाने घडवले. 'नजिंग' संकल्पनेवर आधारित कार्यपद्धतीद्वारे सिंगापूरमधील शासनयंत्रणांनी वेळोवेळी देशाची सर्वांगीण प्रगती आणि लोकहित जपणारे 'विविध सुनियोजित पर्याय' जनतेपुढे ठेवले आणि या टिकली एवढ्या राष्ट्राने स्वतःच्या यशाचा मार्ग स्वतःच आखला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)