ऑफिस नावाची वाचाळ वस्ती

तुमचं गोंगाटात नीट काम होतं का की एकांतात? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तुमचं गोंगाटात नीट काम होतं का की एकांतात?

आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये मधल्या भिंती पाडून मोठमोठाली ऑफिसेस बनवण्याची संकल्पना आली आहे. म्हणे याने कामाच्या ठिकाणी समानता येते, आणि लोकांमध्ये संवाद वाढतो. पण हे कितपत खरं आहे?

बिनभिंतींची खुली कार्यालयं फक्त थंडगार आणि गजबजलेली नसतात तर आपल्या मेंदूवरही आघात करतात. त्यामुळे काही कंपन्या आता आपल्या कार्यालयांमध्ये भिंती आणि दरवाजे परत आणू पाहत आहेत.

इतर तंत्रज्ञान अधिकाऱ्यांचं अनुकरण करत ख्रिस नॅगल यांनीही पाच वर्षांपूर्वी आपल्या टीमला बिनभिंतीच्या कार्यालयात नेलं. सर्वांनी एकत्र यावं, एकमेकांसोबत मिसळून सहज काम करावं, अशी त्यांची इच्छा होती. पण लवकरच ही घोडचूक झाल्याचं नॅगल यांना उमगलं. प्रत्येक कर्मचारी विचलित झाला होता, त्यांच्या कार्यक्षमतेवरही परिणाम झाला होता. स्वत: नॅगल आणि इतर नऊ कर्मचारी खूप नाराज होते.

कधी वैयक्तिक फोन कॉलच्या आवाजांनी तर कधी इतर कशाने या खुल्या कार्यालयात कामात सतत अडथळे येत होते. आमच्यापैकी अनेक जण खुल्या कार्यालयाचे बळी ठरले होते आणि आजही ठरत असतील.

एप्रिल 2015 साली खुल्या कार्यालयात स्थलांतर केल्यानंतर तीन वर्षांनी नॅगेल यांनी आता त्यांची कंपनी पुन्हा 10,000 चौरस फुटाच्या जागेत हलवली आहे. या कार्यालयात प्रत्येकाला दार लावून घेता येईल अशी स्वतंत्र जागा आहे.

असंख्य कंपन्यांनी आपली कार्यालयं खुली केली आहेत. अमेरिकेत 70 टक्के कार्यालयं बिनभिंतींची आहेत. त्यापैकी खूप कमी जण पुन्हा पारंपारिक दरवाजे असलेल्या कार्यालयाकडे परतले आहेत.

पण एका संशोधनानुसार खुल्या कार्यालयात आपली कार्यक्षमता 15 टक्क्यांनी घसरते, एकाग्रतेने काम करणं अवघड होतं आणि एक जण आजारी पडला तर इतरांनाही त्यातं संक्रमण होऊन आजारी पडण्याचं प्रमाण दुप्पट झालं होतं. यामुळे खुल्या कामाच्या ठिकाणांबद्दल विरोधी मत जोरकस झालं आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा खुल्या ऑफिसांमध्ये खरंच कामाची उत्पादकता वाढते?

तंत्रज्ञान क्षेत्रातील बऱ्याच जणांनी नॅगेल यांच्याकडे एका स्वतंत्र आणि बंदिस्त जागी काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "आपल्याला खुलं ऑफिस अजिबात आवडत नाही, हे अनेकजण मान्य करतात. यामुळे त्यांना काम व्यवस्थित करवून घेता येत नाहीत आणि बरचसं काम घरी करावं लागतं," असं नॅगेल म्हणतात.

खुल्या कार्यालयांची संकल्पना लवकर लयाला जाईल, असं सध्यातरी दिसत नाही. पण काही कंपन्यांनी नॅगेल यांचं अनुकरण करून प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतंत्र जागा असेल, अशा कार्यालयात परतायला सुरुवात केली आहे.

जेवढी एकाग्रता असेल तेवढी चांगली

आपल्याला चार भिंती आणि दारं बंद करता येणारी वेगळी जागा अधिक प्रिय असण्याचं प्रमुख कारण आहे एकाग्रता. आपण एकाच वेळी अनेक कामं करू शकत नाही. खुल्या कार्यालयात छोट्या छोट्या कारणाने 20 मिनिटांपर्यंत आपली एकाग्रता भंग होते.

याशिवाय काही खुल्या कामाच्या जागांमुळे स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होतो. हॉट डेस्किंग या अत्यंत खुल्या प्रकाराच्या कार्यालयात हे विशेष जाणवते. अशा कार्यालयात कर्मचारी आपली उपकरणं बरोबर घेऊन त्यांना हवं तिथे बसून काम करू शकतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा कर्मचाऱ्यांमध्ये संवाद वाढावा यासाठी नवनवे उपक्रम हाती घेतले जातात.

"एकाच ठिकाणी बसून काम केल्यास आपण जास्त माहिती लक्षात ठेऊ शकतो," असे सॅली ऑगस्टीन सांगतात. त्या इलिनॉयच्या 'ला ग्रेंज पार्क' इथे पर्यावरण आणि रचना मानसशास्त्रज्ञ आहेत. "ही बाब दैनंदिन जीवनात सहजपणे आपल्या जाणवत नाही. पण आपण जेव्हा गोष्टी आठवतो तेव्हा आपसूकच आपल्याला आसपासचे छोटे छोटे तपशील आठवतात," त्या म्हणाल्या.

आपण एकाच जागी बसत असल्यास जास्त माहिती लक्षात ठेऊ शकतो. हे तपशील काहीही असू शकतात, म्हणजे आपण काम करत असलेल्या पत्रकाची रंगसंगती बदलण्यासंबंधी एखादी कल्पना असेल ती एकाच ठिकाणी बसत असाल तर आठवू शकते. वाटतं त्याप्रमाणे आपण समन्वयानं काम करू शकत नाही.

आपल्यापैकी बरेच जण आवाजांमुळे सर्वांत जास्त डिस्टर्ब होतात. सिडनी विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या पाहणीनुसार बिनभिंतीच्या कार्यालयातील 50 टक्के लोकांना आणि क्युबिकल (अंशत: बंदिस्त) कार्यालयात 60 टक्के लोक आवाजामुळे त्रस्त आहेत. स्वतंत्र कामाची जागा असलेल्यांपैकी फक्त 16 टक्के लोकांनी अशी तक्रार केली आहे.

त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना 14 कारणांसाठी ते कामाच्या ठिकाणाबद्दल नाखूश आहेत का? असे प्रश्न विचारले. त्यात तापमान, हवेची गुणवत्ता, एकांत आदी बाबींचा समावेश होता. त्यात खुल्या कार्यालयांच्या तुलनेत कामाची स्वतंत्र जागा असलेली कार्यालयं सरस ठरली. लोक एकमेकांशी जास्त बोलतात पण त्यांच्या या गप्पा कामासंदर्भात नसतात.

पण फायदेही

खुल्या कार्यालयांना खर्च कमी येतो. याशिवाय इथे एकत्रित काम होतं, असा प्रमुख दावा आहे. परंतु समस्त कर्मचाऱ्यांवर केवळ एकसारखे वाऱ्याचे झोत येत असल्याने इथे जोरदार चर्चा घडून चमकदार कल्पना सुचल्या आहेत, असं खूपच कमीवेळा घडल्याची नोंद झाली आहे. याऐवजी सहकारी सणांना कुटुंबीयांसाठी काय भेटी खरेदी करणार आहेत किंवा त्यांच्या जोडीदाराबरोबर काय समस्या आहेत हेच जास्त कळतं, हे आपल्याला माहीतच आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑफिसमध्ये शांततेत काम करता येतं का?

"लोक एकमेकांशी जास्त बोलतात पण त्यांच्या कामासंदर्भात गप्पा कमीच असतात," असं ऑगस्टीन सांगतात. तुम्ही खुल्या कार्यालयात काम करत असाल तरी चर्चा करण्यासाठी तुम्ही 'मीटिंग रूम' आरक्षित करताच. चर्चा करण्यासाठी काही नियोजन आणि एकांत असण्याची गरज असते, हे लक्षात घेतलं पाहिजे.

पूर्ण एकाग्रतेने केलेलं कामच उत्तम ठरतं, असं ऑगस्टीन यांचं म्हणणं आहे. "आपण गजबजाटात काम करू शकतो परंतु त्याचं अंतिम स्वरूप, आपण शांत ठिकाणी बसून केलेल्या कामापेक्षा चांगलं नसतं."

"लोकांना त्यांचं नेमून दिलेलं काम प्रत्यक्षात करता येईल, असा पूरक अवकाश न देऊन त्यांची कार्यशक्ती वाया घालवणं ही शरमेची गोष्ट आहे. ही अकार्यक्षमता आहे," असं ऑगस्टीन यांचं परखड मत आहे.

"एकमेकांची ओळख होणं आणि मैत्री होणं, हे निश्चितच महत्त्वाचं आहे," ऑगस्टीन म्हणतात, "पण एकमेकांबरोबर मिसळण्यासाठी भिंती असलेल्या कार्यालयातही अनेक पर्याय आहेत."

उदाहरणार्थ, नॅगेल यांचे कर्मचारी रोज एकत्र जेवतात. एकत्र जेवताना काही कल्पना सुचतात पण बहुतांश कल्पना नियोजित चर्चासत्रांमधूनच पुढे येतात.

सुवर्णमध्य शोधणे

ज्या कामांसाठी एकांत आवश्यक आहे उदाहरणार्थ, लेखन, जाहिरात, आर्थिक नियोजन आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. यासारख्या कामांसाठी कंपन्या खुलं कार्यालयात निकालात काढण्याऐवजी शांत खोल्या आणि काही बंद जागा वापरण्याचा प्रयोग करत आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अनेक ऑफिसांमध्ये बोलण्याच्या पातळीवर मर्यादा असतात.

काही जणांना सहकाऱ्यांना सोडून स्वत:हून एकटं उठून जाणं आवडत नाही. आपण टीममध्ये नसलो तर आपलं महत्त्व राहणार नाही, असं त्यांना वाटतं. कामाचा अतिताण असलेल्या ठिकाणी असं होणं शक्य आहे. "वेगळ्या शांत खोलीत जाऊन काम करणं हे आपल्यापैकी काही जणांना कमीपणाचंही वाटते, असं ऑगस्टीन सांगतात.

काही कंपन्या छोट्या टीमसाठी वेगळ्या खोल्या तयार करत आहेत. NBBJ या आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार कंपनीचे भागीदार रायन मुलेनिक्स यांनी ज्या तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर काम केलं आहे, त्यांच्यासाठी तीन ते १६ लोकांच्या टीमसाठी स्वतंत्र कार्यालयं तयार केली आहेत.

ते आज एकत्रित काम करू शकतात तसंच त्यांना नको असलेले इतर टीममधल्या लोकांचे आवाज ते रोखू शकतात. तंत्रज्ञानाचीही यात मदत घेता येते. मुलेनिक्स यांच्या स्वत:च्या कार्यालयातही सेन्सर बसवले आहेत. दर दहा फुटावर असलेले हे सेन्सर आवाज, तापमान आणि गर्दी किती आहे याचा मागोवा घेऊ शकतात. कर्मचारी एका अॅपवर खोलीत सर्वात शांत जागा कुठे आहे, हे शोधू शकतात.

विरोधी पक्ष

आपल्यापैकी काही जणांनी बिनभिंतीच्या कार्यालयातच उत्कर्ष साधला आहे. एका गटाचे प्रतिनिधित्व करणारे आणि जे सातत्याने एकच काम करत आहेत आणि जिथे कनिष्ठ पातळीवरचे कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, तिथे इतरांचं काम पाहून त्यांना काहीतरी नवीन शिकता येतं.

नवीनच कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं स्वतंत्र कार्यालय मिळालं तर त्यांना लक्ष केंद्रित करता येणार नाही, आणि त्यांची कार्यक्षमता खालावेल, असं ऑगस्टीन सांगतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऑफिसात एकाग्रता होऊ शकते?

खुल्या कार्यालयांमुळे नाखूश असलेल्यांसाठी वाईट बातमी आहे. ही पद्धत लवकर बंद होण्याची चिन्हं नाहीत. आम्हाला जे गवसलं आहे, ते इतर कंपन्यांनी अनुभवावं, असं नॅगेल यांना वाटतं. त्यांचे कर्मचारी आता खूश आहेत आणि जास्त कार्यक्षम झाले आहेत. याचा फायदा फक्त कंपनीला नाही तर टीमलाही होतो.

"लोक आता कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात आणि काम करण्यासाठी त्यांना जास्त वेळ मिळतो. त्यामुळे सर्वांच्याच मानसिकतेत बदल घडला आहे," असं नॅगेल सांगतात.

तुम्ही कशा ऑफिसमध्ये काम करता? या संशोधनाच्या दिशेने तुमचे काही अनुभव आहेत का? आमच्याशी शेअर करा...फेसबुक आणि ट्विटर वर.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)