रशिया- ब्रिटन संबंध दुरावले : 23 ब्रिटीश मुत्सद्द्यांना काढून रशियाचं प्रत्युत्तर

लॉरी ब्रिस्टो Image copyright Reuters
प्रतिमा मथळा ब्रिटनचे रशियातील राजदूत लॉरी ब्रिस्टो यांना रशियन परराष्ट्र खात्याने समन्स बजावलं होतं.

रशियाचे माजी गुप्तहेर आणि त्यांच्या मुलीवर युनायटेड किंगडममध्ये झालेल्या विषप्रयोगानंतर रशिया आणि युनायटेड किंगडमच्या संबंधात तणाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात ब्रिटनमधल्या रशियन मुत्सद्द्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता रशियात असलेल्या युनायटेड किंगडमच्या दूतावासातील 23 मुत्सद्द्यांना काढून टाकल्याचं रशियाने जाहीर केलं आहे.

रशियात असलेलं 'ब्रिटिश काउन्सिल' बंद करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे. तसंच सेंट पीट्सबर्गमधील वकिलातही बंद करण्यात येईल असं रशियाने म्हटलं आहे.

गेल्या आठवड्यात ब्रिटनने 23 रशियन मुत्सद्द्यांना काढलं. त्याच्या प्रत्युत्तरात रशियाने हे पाऊल उचललं आहे.

रशियाचे माजी गुप्तहेर सर्जेई स्क्रिपल आणि त्यांची 33 वर्षांची मुलगी युलिया स्क्रिपल हे दोघंही रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. विल्टशायर भागातील सॅलिसबरी या ठिकाणी असलेल्या एका बेंचवर ते दोघं बेशुद्धावस्थेत सापडले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा थेरेसा मे

त्यांच्या या अवस्थेसाठी रशियाने युनायटेड किंगडमला जबाबदार धरले आहे तर युनायटेड किंगडमने रशियाला जबाबदार धरलं आहे. विषप्रयोगामागे रशिया असल्याचा ब्रिटनचा आरोप आहे.

युनायटेड किंगडमचे परराष्ट्र सचिव बोरिस जॉन्सन यांनी म्हटलं, "रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या आदेशावरूनच हा विषप्रयोग झाला असण्याची शक्यता आहे."

ब्रिटनचे रशियातील राजदूत लॉरी ब्रिस्टो यांना रशियन परराष्ट्र खात्याने समन्स बजावले होते. युनायटेड किंगडमने रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यांच्या निर्बंधांना रशियाने उत्तर दिलं आहे. त्या संबंधीची कागदपत्रं राजदूतांच्या हाती देण्यात आली आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?