अमेरिकेचे दोन लाख सैनिक 180 देशांत काय करत आहेत?

अमेरिकी सैन्य Image copyright Getty Images

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नायजरमध्ये नियोजनबद्ध हल्ल्यात चार अमेरिकन सैनिक ठार झाले. हे अमेरिकन सैन्य मालीच्या सीमेवर एक कारवाई पूर्णत्वास नेत होते.

अर्थात अमेरिकेला ही घटना म्हणजे फार मोठा धक्का होती. याचं कारण म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील या भागात अमेरिकन सैन्य असल्याची आणि तिथं सैनिकी अभियान सुरू आहे हे कुणालाच माहीत नव्हतं.

जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या अमेरिकेचे जगभरातील 180 देशांत पसरले आहेत. यातील 7 देशांत अमेरिकेतील सैन्य प्रत्यक्ष सैनिकी मोहिमांत सहभागी आहे.

ट्रंप सरकारने अमेरिकच्या काँग्रेसला पाठवलेल्या गोपनिय अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे.

Image copyright Getty Images

हा अहवाल न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेचं सैन्य ज्या देशांत सैन्य मोहिमांत सक्रिय आहे ते देश पुढील प्रमाणे :

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानात 13,329 अमेरिकन सैन्य आहे. 11 सप्टेंबर 2001ला वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कवर झालेल्या अल कायदा आणि तालिबानच्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सैन्य पाठवलं. अमेरिकेला इथं प्रदीर्घ लढाई करावी लागली. आजही हे युद्ध संपलेलं नाही. जगातील सर्वांत मोठी शक्ती असलेली अमेरिकेला इथं अल कायदा, तालिबान, इस्लामिक स्टेट आणि हक्कानी नेटवर्कशी संघर्ष करत आहे.

इराक

सद्दाम हुसेन यांच्या अंतानंतर इराकमध्ये अमेरिकेचं सैन्य आता इस्लामिक स्टेटशी संघर्ष करत आहे. सद्दाम हुसेन यांच्या अंतानंतर इराकमध्ये मोठ्याप्रमाणावर अशांतता आहे आणि इस्लामिक स्टेटमुळं देशभर हिंसा सुरू आहे. इथला संघर्ष संपलेला अजूनही संपलेला नाही.

Image copyright Getty Images

सीरिया

2017मध्ये सीरियात अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय फौजांनी लाखो लोकांना जहालवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केलं. इराक आणि सीरियातील जहालवाद्यांच्या ताब्यातील 98टक्के भूभागाला मुक्त करण्यात यश आलं आहे. सीरियात अमेरिकेचे दीड हजार सैन्य असेल. सीरियातील परिस्थिती सामान्य झालेली नाही. इथं रशिया दुसरी बाजू घेऊन उभा आहे.

Image copyright Getty Images

येमेन

अमेरिकाचे सैन्य येमेनमध्येही आहे. इथं अल कायदाशी अमेरिकेची लढाई सुरू आहे. ट्रंप सरकारने अमेरिकेच्या काँग्रेसला दिलेल्या अहवालात म्हटलं आहे की येमेनमध्ये अमेरिका काही प्रमाणात हूती बंडखोरांच्या विरोधात सौदी अरेबियाच्या फौजांना मदत करत आहे. ही मदत फक्त सैनिक स्वरूपाची नसून गुप्त माहितीचं आदानप्रदान करण्याच्या पातळीवरही आहे.

सोमालिया

सोमालियामध्ये अमेरिकचे 300 सैनिक आहेत. सोमलियामध्ये बंडखोर संघटना अल शबाबच्या विरोधात अमेरिकेची मोहीम सुरू आहे. 1993मध्ये सोमालियात अमेरिकेच्या सैन्याला कटू अनुभवाला समोर जावं लगालं होतं. त्यावेळी अमेरिकेचं सैन्य सोमालियामध्ये महंमद फारह अईदीदला पकडण्याच्या मोहिमेवर होतं. या अभियानात अमेरिकेचे 18 सैनिक मारले गेले होते. सोमालियातील मोहीम किती कठीण आहे, याचा अनुभव त्यावेळी अमेरिकेला आला होता.

Image copyright Getty Images

लिबिया

लिबियामध्ये अमेरिकेच्या सैन्याची संख्या फारच कमी आहे. अमेरिकी काँग्रेसला पाठवलेल्या अहवालात म्हटलं आहे की अमेरिकेचं सैन्य इथं इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढत आहे. लिबियात गडाफी याचं शासन संपल्यानंतर इथं अशांतता आहे.

नायजर

नायजरमध्ये अमेरिकेचे 500 सैनिक आहेत. ऑक्टोबर 2017मध्ये चार अमेरिकी सैनिक मारल्यामुळे इथं इस्लामिक स्टेटच्या विरोधात मोहीम सुरू आहे.

Image copyright Getty Images

अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याने वादही सुरू झाला आहे. अमेरिकेसाठी पश्चिमी आफ्रिकन देशात सैन्याचं अस्तित्व नवी गोष्ट नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)