पहिला बळी : अमेरिकेत सेल्फ-ड्रायव्हिंग कारच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

उबरची एक सेल्फ-ड्रायव्हिंग कार Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उबरची एक सेल्फ-ड्रायव्हिंग कार

अखेर ज्याची भीती होती ते घडलंच. एका सेल्फ-ड्रायव्हिंग कारने जगातला आपला पहिलावहिला बळी घेतला आणि आता या तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तंत्रज्ञान कंपनी उबर, जी जगभरात अनेक देशांमध्ये अॅपवरून कॅब बुक करण्याची सेवा पुरवते, अनेक दिवसांपासून अमेरिकेत आपली अद्ययावत स्वयंचलित वाहनं टेस्ट करत होती. अशाच एका टेस्ट कारने अॅरिझोनाच्या टेम्पे शहरात एका पादचारी महिलेला धडक दिली. उपचारादरम्यान या 49 वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतं, जी अशा अपघाताची कदाचित पहिलीच बळी ठरली आहे.

या अपघातानंतर आपण तपास संस्थांशी पूर्ण सहकार्य करत असल्याचं सांगत उबरने सर्व ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कारच्या चाचण्यांवर तात्पुरती बंदी घातली आहे.

उबरचे मुख्य कार्यकारी अधिकारी डारा खॉस्रोवशाही यांनी ट्वीट करत ही "अत्यंत दुःखद बातमी" असल्याचं म्हटलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी रात्री झाला जेव्हा ही कार ऑटोनॉमस मोडवर होती. एक मानव चालक गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर होताही, पण तो गाडी नियंत्रित करत नव्हता.

पोलिसांनी हेही सांगितलं की मृत महिला रस्ता ओलांडण्यासाठी कुठल्याही पादचारी क्रॉसिंगचा वापर करत नव्हती. एक स्थानिक रुग्णालयात नेलं असता तिने अखेरचा श्वास घेतला.

अमेरिकेच्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा संस्था US National Highway Traffic Safety Administration आणि National Transportation Safety Board यांनी आपले दोन चमू टेम्पे शहरात पुढील तपासासाठी पाठवले आहेत.

धोक्याची घंटा

ऑटोनॉमस ड्रायव्हिंग तंत्रज्ञानावर फोर्ड, जनरल मोटर्स, टेस्ला आणि गुगलच्या वेयमोसारख्या बड्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक तसंच आर्थिक गुंतवणूक करत आहेत. या स्वयंचलित गाड्या भविष्यातल्या रहदारीचं रूप कसं पालटतील, अशा आशयाचा गवगवा जगभरात करण्यात आला आहे. याने रस्त्यांवर अपघात कमी होतील आणि माणूस तणावमुक्त ड्रायव्हिंग करू शकेल, असा सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाच्या पाठीराख्यांचा दावा आहे.

अमेरिकेतच अनेक मोठ्या शहरांमध्ये या गाड्यांच्या चाचण्या सुरू आहेत. पण हे तंत्रज्ञान तयार होण्यापूर्वीच रस्त्यांवर येत असल्याने तज्ज्ञांनी यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

अशा गाड्यांबद्दल अजूनही काही ठोस कायदा अस्तित्वात नसल्याने रविवारी झालेल्या अपघातासाठी नेमका दोष कुणाला द्यावा, यावर वाद होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतही यावर कायदा तयार केला जात आहे.

"आपण हा अपघात रोखण्यासाठी खूप वर्षांपासून लढत होतो," असं कंझ्युमर वॉचडॉग नावाच्या एका संस्थेने म्हणत या वाहनांवर तात्पुरती बंदी आणण्याची मागणी केली आहे. "यावर खरोखरंच ताबडतोब कायदा आणावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही आशा करतो की सिलिकॉन व्हॅली आणि ट्रंप सरकार आमच्या मागण्यांना दाद देईल," असं कंझ्युमर वॉचडॉगने ट्वीट करत म्हटलं आहे.

भारतात सध्या अशा कुठल्याच सेल्फ ड्रायव्हिंग कारला सार्वजनिक रस्त्यांवर चालवण्याची परवानगी नाही.

उबर 2016 पासून अमेरिकेतल्या पिट्सबर्गमध्ये ऑटोनॉमस ड्रायव्हिंग कारच्या चाचण्या घेत आहे. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को, टोरोंटो आणि फिनिक्स भागांमध्येही अशा चाचण्या सुरू झाल्या. जिथे हा अपघात झाला ते टेम्पे शहर फिनिक्स राज्यात येतं.

वर्षभरापूर्वी उबरच्याच एका सेल्फ-ड्रायव्हिंग व्होल्व्हो SUVला अपघात झाल्यानंतर उबरने अॅरिझोनामध्ये आपल्या स्वयंचलित गाड्यांची चाचणी तात्पुरती बंद केली होती.

2016च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत दरवर्षी 37,000 लोक रस्ते अपघातांमध्ये जीव गमावतात. Center for Automotive Research च्या प्रमुख कार्ला बेयलो यांच्यानुसार या अपघाताची पूर्ण माहिती मिळाल्यावरच त्या सांगू शकतील की नेमकी कुठे चूक झाली आहे. या अपघाताचा तपास इतर सर्व अपघातांना लक्षात ठेवून केला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

"आपण निष्पक्षपणे पूर्ण माहितीकडे बघायला हवं. पण कोणीही याला कमी गांभीर्याने घेईल, असं मला वाटत नाही," असं त्या म्हणाल्या.

टेम्पे शहराचे महापौर मार्क मिचेल यांनी म्हटलं की ते या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देतात कारण त्यांना यात भविष्यासाठी खूप सामर्थ्य दिसतं. पण या अपघातानंतर हा चाचणी कार्यक्रम थांबवण्याच्या उबरच्या निर्णयाची त्यांनी प्रशंसा केली.

"आमचं शासन आणि टेम्पे पोलीस पूर्ण प्रयत्न करतील की या अपघातातून सर्व धडे घेता येतील, जेणेकरून पुढे हे तंत्रज्ञान आणखी सुरक्षित करता येईल," असं ते पुढे म्हणाले.

तुम्ही हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : नॅनो बनवणारे मराठमोळ्या इंजिनियरने आता बनवली इलेक्ट्रिक बस

तुम्ही हे वाचलंत का?