केंब्रिज अॅनालिटिका : काय आहे नेमकं प्रकरण?

फेसबुक Image copyright Getty Images

अनैतिकता, हेराफेरी आणि माहितीच्या गैरवापराचा आरोप असलेल्या या गंभीर प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या दोन कंपन्या या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

फेसबुक आणि डेटा अॅनालिटिक्समध्ये कार्यरत असलेली केंब्रिज अॅनालिटिका संस्था या दोन मोठ्या कंपन्या लोकांच्या खासगी माहितीचं विश्लेषण करणं आणि त्याचा वापर करण्यासंदर्भातील वादच्या केंद्रस्थानी आहेत.

2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि युके ब्रेक्झिटसंदर्भातल्या सार्वमतदानादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या माहितीचा गैरवापर झाला का? याविषयीचा हा वाद आहे.

या निवडणुकांबरोबर भारतातही असा माहितीचा गैरवापर झालाय किंवा होऊ शकतो का याविषयी चर्चा सुरू आहे.

माहितीचा गैरवापर झाल्याचा किंवा कुठलीही चुकीची गोष्ट केल्याचा केंब्रिज अॅनालिटिक्स आणि फेसबुक या दोन्ही कंपन्या नाकारत आहेत. पण आतापर्यंत उघड झालेल्या या प्रकरणात नेमकं काय काय घडलंय?

केंब्रिज अॅनालिटिकावर हेराफेरीचा आरोप

'चॅनल 4' या न्यूज चॅनलने गुप्तपणे त्यांच्या पत्रकाराला म्हणजे अंडर कव्हर पत्रकाराला केंब्रिज अॅनालिटिका या डेटा अॅनालिटिक्स कंपनीच्या प्रतिनिधींशी बोलणी करण्यासाठी पाठवलं होतं.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी डोनल्ड ट्रंप यांना मदत केल्याचं श्रेय या कंपनीला दिलं जातं.

Image copyright 4 NEWS/VIDEO GRAB
प्रतिमा मथळा 'चॅनल 4' या न्यूज चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधील दृष्य.

संबधित पत्रकाराने स्वतःला श्रीलंकेतील बिझनेसमॅन असल्याचं भासवत श्रीलंकेतील स्थानिक निवडणुकीवर प्रभाव टाकण्याची इच्छा व्यक्त केली.

केंब्रिज अॅनालिटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स हे विविध उदाहरणं देत असल्याचं चित्रित करण्यात आलं. त्यांची कंपनी कशा पद्धतीनं विविध बदनामीकारक मोहिमांची व्यवस्था करून विरोधकांची प्रतिमा डागाळू शकते याबद्दल ते सांगत आहेत. जसं की, एखाद्या वेश्या प्रकरणात अडकवणं, नाट्यमय स्थिती निर्माण करणं किंवा कॅमेऱ्यावर लाच घेताना पकडणं यांचाही यात समावेश असल्याचं ते सांगत आहेत.

दरम्यान कंपनीने हे सगळे दावे फेटाळून लावले आहेत. "त्यांना ज्यापद्धतीचं संभाषण हवं होत, तशी काटछाट करीत त्यांनी स्क्रिप्ट तयार केली आहे." या संवादाची सुरुवात पत्रकरानेच केल्याचा दावाही करण्यात आला आहे.

"मी हे ठामपणे सांगतो की, केंब्रिज अॅनालिटिका लाच किंवा हनीट्रॅप सारख्या प्रकरणांमध्ये कुणाला अडकवत नाही. चुकीच्या गोष्टीला स्थान देत नाही. ते कोणत्याही उद्देशासाठी असत्य सामग्रीचाही वापर करीत नाही," असं निक्स यांनी सांगितलं.

यात फेसबुकचा काय हात?

तुमचं व्यक्तिमत्त्व कसं आहे ते जाणून घ्या अशी पर्सनॅलिटी टाईप जाणून घेण्यासाठी निमंत्रण देणारी एक क्विझ 2014मध्ये फेसबुकवर टाकण्यात आली होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा केंब्रिज अॅनालिटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स यांनी सर्वं आरोप फेटाळून लावले आहेत.

ही क्विझ केंब्रिज विद्यापीठाचे अलेक्झांडर कोगन (विद्यापीठाचा केंब्रिज अॅनालिटिकाशी काही संबध नाही) यांनी विकसित केली होती.

त्या वेळी अॅप्स आणि गेम्सचा वापर सर्रासपणे होत असल्यानं केवळ या क्विझमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीची नव्हे तर त्यांच्या मित्रांचीही संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ही क्विझ डिझाइन करण्यात आली होती.

डेटा डेव्हलपर अशा पद्धतीनं माहिती मिळवू शकणार नाही याकरिता नंतरच्या काळात फेसबुकने बरेच बदल केले.

केंब्रिज अॅनालिटिकासोबत काम केलेले ख्रिस्तोफर विली यांनी आरोप केला की, क्विझमध्ये 2,70,000 लोकांनी सहभाग घेतल्यानं जवळपास 5 कोटी लोकांची विशेषतः अमेरिकेतील लोकांची माहिती त्यांच्या मित्रांच्या नेटवर्कमधून मिळवण्यात आली होती. तेही त्यांची संमती न घेता.

Image copyright Getty Images

विली यांनी दावा केला की, ही माहिती केंब्रिज अॅनालिटिकाला विकण्यात आली. जी नंतर लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आणि ट्रंप यांना पूरक अशी साम्रगी वितरित करण्यासाठी वापरली गेली.

ट्रंप कॅंपेनसाठी दिलेल्या सेवेमध्ये असं काहीही वापरलं गेलं नसल्याचं केंब्रिज अॅनालिटिकाने म्हटलं आहे.

हे फेसबुकच्या नियमांविरोधात आहे का?

ही सगळी माहिती त्यावेळी फेसबुकचं व्यासपीठ वापरून गोळा करण्यात आली होती आणि अनेक डेव्हलपर्सनी त्याचा फायदा उठवला होता. पण ही माहिती इतरांना शेअर करण्याची त्यांना परवानगी नव्हती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा मार्क झुकरबर्ग

यात आणखी एक विशेष मुद्दा असा आहे की, ज्या लोकांनी व्यक्तिमत्व क्विझमध्ये सहभाग घेतला होता त्यांना अशी कुठलीही कल्पना नव्हती की, ते त्यांची खाजगी माहिती डोनल्ड ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारासाठी शेअर करत आहेत.

फेसबुकचं म्हणणं आहे की, त्यांच्या नियमांचा भंग झाला होता हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी अॅप हटवलं आणि ती माहिती डिलिट करण्यात येईल, असं आश्वासन घेतलं.

केंब्रिज अॅनालिटिकाने दावा केला की, त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून मिळालेली ही माहिती कधीही वापरली नाही आणि फेसबुकने सांगितल्यानंतर त्यांनी सगळी माहिती डिलिट करून टाकली.

ही माहिती योग्य पद्धतीनं मिटवण्यात आली की नाही, हे फेसबुक आणि युनायटेड किंगडमचे माहिती आयुक्त दोघंही जाणून घेऊ इच्छितात. पण असं काही एक करण्यात आलं नसल्याचा दावा विली यांनी केला.

काय आहे अधिकृत प्रतिसाद?

फेसबुक त्यांच्या वापरकर्त्यांचं संरक्षण कसं करणार आहे याची चाचपणी करण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटर्सनी मार्क झुकरबर्ग यांना बोलावलं होतं.

या माहितीचा गैरवापर तर झाला नाही ना, याची चौकशी केली जाईल असं युरोपियन संसदेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान थेरेसा मे यांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, त्या या खुलाशाविषयी त्यांना चिंता आहे.


तुमची ऑनलाईन माहिती कशी सुरक्षित ठेवाल?

इंटरनेटचा वापर करताना काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही दिलेल्या माहितीचा दुरुपयोग टळू शकतो.

  • तुमच्या फेसबुक खात्यावरून लॉग इन करा असं सांगणाऱ्या अॅप्सवर लक्ष ठेवा. बहुतेकदा तुमची माहिती गोळा करण्यासाठी ते वेगवेगळी परवानगी मागतात.
  • जाहिराती थांबवण्यासाठी अॅड ब्लॉकरचा वापर करा.
  • फेसबुकची सिक्युरिटी सेटिंग्स तपासत राहा. कोणत्या गोष्टी चालू आहेत ते पाहा. वैयक्तिक अॅपची सेटिंग तपासा. तुमचे मित्र कोणत्या गोष्टी पाहू शकतात हे पडताळा.
  • फेसबुकवरील तुमचा डेटा तुम्ही डाउनलोड करू शकता. जनरल सेटिंग्सच्या सर्वांत खाली डाउनलोड बटन असतं. पण तुमच्या काँप्युटर किंवा लॅपटॉपमधील डेटा हा फेसबुक डेटापेक्षा कमी सुरक्षित असतो. तुमचा लॅपटॉप हॅक केला तर त्यामधील सर्व माहीतीची चोरी होऊ शकते.

शेवटी तुम्ही फेसबुकला रामराम ठोकू शकता. पण Privacy International या संस्थेच्या मते आपल्या माहितीच्या गोपनीयतेला केवळ सोशल नेटवर्कमुळेच धोका निर्माण होत नाही.

Image copyright Getty Images

"सध्या तिऱ्हाईत संस्थेकडून तुमच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होणार नाही ना यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. पण, तुमच्या माहितीची गैरवापर तर नेहमीच होत असतो," असं संस्थेच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे.

"फोनमधील बहुतेक अॅप्सना तुमच्या लोकेशन डेटाचा अॅक्सेस असतो. फोनबुकमधील फोन नंबर्सचाही अॅक्सेस आपण दिलेला असतो. हे तर फक्त हिमनगाचं एक टोक आहे."

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)