केंब्रिज अॅनालिटिका : 'डेटा सुरक्षेसाठी फेसबुक सोडायला हवं'

  • जेन वेकफील्ड
  • तंत्रज्ञान प्रतिनिधी

तुम्ही कोणत्या बॉलिवूड स्टार सारखे दिसता, तुम्ही कितीवेळा प्रेमात पडला, तुमचा सर्वांत जवळचा मित्र कोण, अशा प्रकारच्या क्विझ तुम्ही फेसबुकवर दिली असले. वरवर ही क्विझ तुम्हाला अगदीच निरुपद्रवी वाटत असेल, पण यातून तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाईलची माहिती कुणाला तरी देत असता आणि तुमची ही माहिती पुढं कशी वापरली जाणार हे तुम्हाला माहीत नसतं.

असाच काहीसा प्रकार सध्या वादात सापडलेल्या केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीनं केला आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत फेसबुकच्या युजर्सचा गैरवापर केल्यावरून डेटा रिसर्च कंपनी केंब्रिज अॅनालिटिका वादात सापडली आहे. यावरून जगभरातील सोशल मीडियाच विश्व ढवळून निघालं आहे. युजर्सनी आपली माहिती सुरक्षित कशी ठेवायची, हा आता कळीचा मुद्दा बनला आहे.

रिसर्च फर्म केंब्रिज अॅनालिटिकावर आरोप आहे की त्यांनी 5 कोटी फेसबुक युजर्सच्या डेटाचा (वैयक्तिक माहिती) गैरवापर केला. सोशल नेटवर्कवर उपलब्ध माहिती कुणासोबत आणि कशापद्धतीनं शेअर केली जावी, हा मुद्दा चर्चेत आला आहे.

फेसबुकसाठी युजर्सचा डेटा हा इंधन आहे. त्यामुळे जाहिरातदार या व्यासपीठावर येतात. त्याबदल्यात फेसबुकला पैसे मिळतात.

फेसबुकजवळ आपल्या युजर्सचे लाइक्स, डिसलाइक्स, लाइफस्टाइल आणि राजकीय कल यासंदर्भात विस्तृत प्रोफाइल तयार करण्याची क्षमता आहे, याविषयी कुणालाच शंका नाही.

आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, फेसबुक इतरांबरोबर कुठली माहिती शेअर करतं आणि फेसबुक युजर आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी काय करू शकतो?

'तुम्ही कुठल्या हॉलिवूड स्टार सारखे दिसतात? इथं क्लिक करा'

यासारखे अनेक क्विझ आपण फेसबुकवर पाहिले आहेत. भारताच्याबाबतीत बोलायचं झाल्यास तुम्ही कुठल्या बॉलिवूड स्टार सारखे दिसतात? असला प्रश्न असतो. यामध्ये तुमच्या IQ पडताळून पाहण्याची गोष्ट सांगितली जाते. तुमच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याविषयी सांगितलं जातं किंवा तुम्ही एक अॅक्टर म्हणून कसे दिसाल? याविषयी सांगितलं जातं.

फोटो कॅप्शन,

केंब्रिज अॅनालिटिकाचे बॉस अलेक्झांडर निक्स

म्हणायला तर ती एक फेसबुक क्विझ आहे. पण ही क्विझ देऊन तुम्ही तुमचं डिजिटल जीवन कुणाच्यातरी हाती सोपवत असता.

अशाच फेसबुक क्विझच्या माध्यमातून केंब्रिज अॅनालिटिकाने कोट्यावधी लोकांचा डेटा मिळवला आहे.

अशा अनेक क्विझमध्ये तुमचा डेटा सुरक्षित असल्याचा विश्वास आपल्याला दिला जातो. असे अनेक गेम आणि क्विझ हे फेसबुक युजर्सला आकर्षित करण्यासाठीच तयार केलेले असतात. त्यांचा मुख्य उद्देश हा तुमचा वैयक्तिक डेटा गोळा करणं हाच असतो. हे फेसबुकच्या नियमांत बसतं.

ज्या प्रकारे क्विझच्या माध्यमातून लोकांचा डेटा मिळविला जात होता, त्यावरून फेसबुक सेवांसाठीच्या त्यावेळी अटी आणि नियम कसे होते ते लक्षात येतं, असं मत गोपनीयतेवर काम करणाऱ्या 'इलेक्ट्रॉनिक फ्रंटिअर फाऊंडेशन'चं व्यक्त केलं.

आता फेसबुकने आपल्या अटी आणि शर्तींमध्ये काही बदल केले आहेत. यामुळे त्रयस्थांना आता फेसबुक युजर्सच्या डेटापर्यंत पोहचणं मर्यादित झालं आहे. विशेष करून युजरच्या यादीतील मित्रांचा डेटा मिळवणं रोखण्यात आलं आहे.

तथापि अद्याप हे माहिती होऊ शकलेलं नाही की, केंब्रिज अॅनालिटिकाकडे कुठल्यापद्धतीची माहिती जमा झालेली आहे. ब्रिटनची डेटा प्रोटेक्शन अॅथॉरिटी याचा तपास करत आहे.

माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी युजर काय करू शकतात?

  • फेसबुकवर log in केल्यानंतर अॅप सेटिंगमध्ये जा.
  • 'अॅप्स', 'वेबसाइटस' आणि 'प्लग इन'च्या खाली दिलेल्या इडिट बटनवर क्लिक करा.
  • आता प्लॅटफॉर्मला डिबेसल करून टाका.

वर दिलेली पद्धत अवलंबल्यानंतर फेसबुकवर तुम्ही त्रयस्थ साइटचा वापर नाही करू शकणार. जर ही पद्धत तुम्हाला आवडलेली नसेल तर अॅपचा वापर केल्यानंतर तुमच्या खाजगी माहितीपर्यंत इतरांनी पोहचू नये किंवा त्याला मर्यादा याव्यात यासाठी आणखी एक पद्धत आहे.

  • फेसबुकच्या अकाऊंट सेटींग्जमध्ये अॅप सेटिंग्ज पेजवर log in करा.
  • त्यात अशा सगळ्या कॅटेगिरींना अनक्लिक करा ज्यात आपण अॅपला ते वापरण्याची परवानगी देत असतो. जसं की, वाढदिवस, कुटुंब, धार्मिक विचारधारा, तुम्ही ऑनलाइन आहात किंवा नाही, तुमच्या टाईमलाइनवर दिसणाऱ्या पोस्ट, तुमच्या सर्व ऑनलाइन हालचाली आणि आवडींचा यात समावेश आहे.

इतर काही उपायसुद्धा आहेत.

फोटो कॅप्शन,

अॅप सेटिंग्जमध्ये जाऊन तुम्ही बदल करू शकतात.

युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अँग्लिया स्कुल ऑफ लॉमधील माहिती तंत्रज्ञान, बौद्धिक संपदा आणि माध्यम कायदा या विषयाचे व्याख्याते पॉल बर्नल म्हणतात, "कधीही कुठल्याही उत्पादनाच्या सर्व्हिस पेजचं लाइक बटन दाबू नका. जर तुम्हाला एखादा गेम किंवा क्विझ खेळायची असेल तर फेसबुकने त्याची log in करण्याऐवजी थेट त्या वेबसाइटवर जा."

बर्नल म्हणतात, "फेसबुकच्या log inनी हे करणं सोप असतं. पण लक्षात घ्या असं केल्यास तुम्ही अॅप डेव्हलपरला थेट तुमच्या फेसबुक प्रोफाइलवर असलेल्या सर्व माहितीचा अॅक्सेस देऊन टाकतात."

आपला फेसबुक डेटा कसा सुरक्षित ठेवाल?

डॉक्टर बर्नल यांच्या मते तुमचा डेटा पूर्णपणे सुरक्षित ठेवायचा असेल तर फक्त एकच मार्ग दिसतो आणि तो आहे की "तुम्ही फेसबुक सोडा."

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी फेसबुकला प्रोत्साहित करायचं असेल तर त्यासाठी एकच पद्धत आहे, ती म्हणजे लोकांनी फेसबुकचा वापर करणं बंद केलं पाहीजे. लोकं सोडून जायला पाहिजे. फेसबुकवर सध्या कुठलाही दबाव नाही."

फोटो कॅप्शन,

सोशल मीडियावरून तुम्ही तुमचं प्रोफाइल हटवू शकतात का?

असं वाटतं की, अशापद्धतीचा विचार करणारे बर्न हे काही एकटे नाहीत. केंब्रिज अॅनालिटिका स्कॅंडल समोर आल्यानंतर #DeleteFacebook हा हॅशटॅग टेंड्र करायला लागला.

पण डॉ. बर्नल यांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त लोक फेसबुक सोडतील असं तरी वाटत नाही. कारण की अनेक लोक फेसबुकला 'आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा हिस्सा म्हणून पाहतात.'

सध्याच्या नियमांनुसार युजर कोणत्याही फर्मला विचारू शकतो की त्यांच्याकडे त्याच्याविषयी कुठली माहिती उपलब्ध आहे. पण प्रश्न हा आहे की, हे विचारणार कोणाला, असा प्रश्न डॉ. बर्नल उपस्थित करतात.

यातून आगामीकाळात युरोपमध्ये जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन आणखी कडक होऊ शकतील, असं ते म्हणाले.

युजर्स त्यांचं अकाऊंट बंद करू शकतात. यामागचा विचार असा आहे की, यामुळे त्यांच्या मागील सगळ्या पोस्ट गायब होतील. जे लोक सोशल नेटवर्कवरून ब्रेक घेऊ इच्छितात, त्यांची जर परत यायची इच्छा झाली तर फेसबुक त्यांना नेहमी प्रोत्साहन देत असतं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)