अखेर त्या मुलींची इस्लामिक कट्टरवाद्यांच्या तावडीतून सुटका

नायजेरियातील मुलगी

नायजेरियातल्या दापची गावातील अपहरण करण्यात आलेल्या शाळकरी मुलींची कट्टरवाद्यांनी सुटका केली आहे. बीबीसीने काही गावकऱ्यांशी संवाद साधला. अपहरणाचा हा प्रकार गेल्या महिन्यात घडला होता. अपहरण झालेल्यांपैकी पाच मुलींची मृत्यू झाला असल्याचं सांगतील जातं आहे.

अपहरण करण्यात आलेल्या 110 मुलींपैकी अनेक मुलींना गाड्यांच्या ताफ्यातून गावातून सोडण्यात आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.

कोणत्या परिस्थितीत या मुलींची सुटका करण्यात आली आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र शंभराहून अधिक मुलींपैकी पाच जणींचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे.

साधारण महिनाभरापूर्वी शाळेतून या मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं.

अपहरण करणारे कट्टरवादी बोको हराम संघटनेशी संबंधित असल्याचं मुलींच्या पालकांपैकी एक कुंडिली बुकार यांनी बीबीसीला सांगितलं. मोटाराबाइकवरून कट्टरवादी गावात आले. त्यांनी मुलींना गावकऱ्यांकडे सोपवलं आणि ते निघून गेले. मुली निस्तेज आणि थकलेल्या वाटत होत्या. मात्र सुटका झाल्यानंतर काहीजणींनी घर गाठलं.

मुलीशी फोनवर बोलल्याचं ऐशा नावाच्या मुलीचे पालक मनुगा लवाल यांनी बीबीसीला सांगितलं.

योबे प्रांताचे पोलीस प्रमुख अब्दुलमालिकी सन्मोयू यांनी मुलींच्या परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र असं काही घडल्याचं वृत्त कानी आलं आहे असं त्यांनी सांगितलं.

मात्र या गावानजीकच्या गस्तीसीमेवर कार्यरत लष्करी अधिकाऱ्याने बोको हरामच्या कट्टरवाद्यांनी मुलींची सुटका केल्याचं सांगितलं.

प्रतिमा मथळा नायजेरियाच्या या प्रांतातून मुलींचं अपहरण करण्यात आलं.

19 फेब्रुवारी रोजी दापची गावावर हल्ला चढवत कट्टरवाद्यांनी मुलींचं अपहरण केलं होतं. सुरुवातीला या मुलींनी पळ काढल्याचं सांगण्यात आलं. त्यांचं अपहरणही झालं नसल्याचा दावा करण्यात आला. मात्र आठवडाभरानंतर इस्लामी कट्टरवाद्यांनी मुलींचं अपहरण केल्याची प्रशासनाने कबुली दिली.

2014 मध्ये दापची शेजारच्या बोर्नो प्रांतात चिबोक गावातल्या मुलींचं अशाच पद्धतीने अपहरण करण्यात आलं होतं. त्यापैकी काही मुली अजूनही कट्टरवाद्यांच्या ताब्यात आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics