'यू आर फायर्ड!' : ट्रंप यांनी आजवर कोणाकोणाला व्हाईट हाउसमधून काढलं?

ट्रंप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ट्रंप यांनी एक शो होस्ट केला होता. त्यातलं 'यु आर फायर्ड' हे वाक्य फार गाजलं होतं.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेच्या संयुक्त राष्ट्राच्या राजदूत निकी हेली यांचा राजीनामा स्वीकारल्याचं वृत्त अनेक वृत्तसंस्थांनी दिलं आहे.

साऊथ कॅरोलिनाच्या गव्हर्नर राहिलेल्या हेली यांची जानेवारी 2017मध्ये या पदावर नियुक्ती झाली होती. त्यांचा राजीनामा अनेकांना चकित करणारा आहे, असं अॅक्सिअस या राजकीय वेबसाईटने लिहिलं आहे.

व्हाईट हाऊसने अजूनही या वृत्ताला दुजोरा दिला नाही आहे.

पण डोनाल्ड ट्रंप यांच्या सरकारमधून याआधीही बरेच राजीनामे देण्यात आले आहेत. तर काही जणांना ट्रंप यांनी बडतर्फ केलं आहे.

एक नजर टाकूया ट्रंप यांनी बडतर्फ केलेल्या मोठ्या अधिकाऱ्यांवर -


एच. आर. मॅकमास्टर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, 22 मार्च 2018

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा एच. आर. मॅकमास्टर

अमेरिकेच्या लष्करात ते लेफ्टनंट जनरल या पदावर होते. अफगणिस्तान आणि इराकमध्ये त्यांनी काम केलं आहे. या ठिकाणी त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत सहभाग घेतला होता.

त्यांच्या आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ले. जनरल मायकल फ्लिन होते. त्यांना या पदावर काम करण्याची संधी फक्त तीन आठवडे आणि तीन दिवसच मिळाली होती. फ्लिन हे रशियन राजदूतांच्या संपर्कात होते. त्यांच्या संबंधाबाबत त्यांनी माइक पेन्स यांना अंधारात ठेऊन त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आलं.

मॅकमास्टर यांना 2014 साली टाइम मॅगझिनने जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिलं होतं. 21 शतकातील लष्करातील मान्यवर विचारवंत असं टाइमने त्यांना संबोधलं होतं.

हे पद का सोडावं लागलं?

मॅकमास्टर हे त्यांच्या वरिष्ठांशी सलगीने वागत आणि कनिष्ठ सहकाऱ्यांशी फटकून वागत. त्यांचं हे वागणं ट्रंप यांना खुपत असे असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं असं म्हणतात. तर व्हाइट हाउसचे चीफ ऑफ स्टाफ जॉन केली यांचं देखील त्यांच्याबद्दल चांगलं मत नव्हतं. मॅकमास्टर हे या पदावर 13 दिवस होते.


रेक्स टिलरसन परराष्ट्र सचिव - 13 मार्च 2018

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा रेक्स टिलरसन

परराष्ट्र सचिव टिलरसन यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं ट्रंप यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर घोषित केलं होतं. त्यांनंतर त्यांनी माइक पॉम्पेओ यांची नियुक्ती परराष्ट्र सचिव म्हणून केली. पॉम्पेओ हे CIAचे संचालक होते.

उत्तर कोरियासोबतच्या संबंधांमुळे निर्माण झालेली तणावपूर्ण स्थिती त्यांना हाताळता येत नव्हती. ट्रंप यांनी उत्तर कोरियाशी थेट चर्चा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक नाट्यमय हालचाली घडल्या. त्यांना ते व्यवस्थितरीत्या सामोरे गेले नाहीत असं म्हटलं जातं.

ट्रंप यांनी आपल्या प्रसिद्धिपत्रकात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांना का पद सोडावं लागलं?

14 महिने पदभार सांभाळल्यानंतर त्यांना आपलं पद सोडावं लागलं. त्यांचे आणि ट्रंप यांचे मतभेद होत असत. अनेक धोरणांवर त्यांचं मत एक नव्हतं. स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर शुल्क लादण्याच्या निर्णयावरून ट्रंप आणि त्यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. टिलरसन हे त्यांच्या भूमिकेवर खूपच ठाम असतात असं ट्रंप यांना वाटत असे.


गॅरी कॉन, मुख्य आर्थिक सल्लागार, 6 मार्च 2018

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गॅरी कॉन

कॉन हे गोल्डमन सॅक्स बॅंकेचे अध्यक्ष माजी अध्यक्ष होते. त्यांची ट्रंप यांनी 14 महिन्यांपूर्वी मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली होती.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. ट्रंप प्रशासनात ज्या सकारात्मक गोष्टी घडल्या त्यापैकी या सुधारणा आहेत.

त्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता, असं असलं तरी त्या दोघांचं पटत नसे. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर बडतर्फीची टांगती तलवार असायची.

त्यांना हे पद का सोडावं लागलं?

कॉन हे जागतिकीकरणाचे कट्टर समर्थक आहे. जर स्टील आणि अॅल्युमिनिअमवर कर लादले तर आपण सोडू असं ते म्हणत असत. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जातं. व्हर्जिनियातील चार्लोटेसविल्ले येथे झालेल्या अति-उजव्यांच्या रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी ट्रंप यांनी दोन्ही बाजू तितक्याच जबाबदार आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतरच कॉन हे आपलं पद सोडणार होते, असं अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटलं होतं.


होप हिक्स, व्हाइट हाऊस कम्युनिकेशन डायरेक्टर, 28 मार्च 2018

हे पद स्वीकारण्याआधी हिक्स ट्रंप यांच्या माध्यम सल्लागार होत्या. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी त्यांनी ट्रंप यांच्या प्रसिद्धीप्रमुखाची भूमिका बजावली होती.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा होप हिक्स

अॅंथनी स्कारामुच्ची यांना डायरेक्टर ऑफ कम्युनिकेशन्स होऊन केवळ दहा दिवस झाले होते. त्यांची ट्रंप यांनी हकालपट्टी केली होती. त्यानंतर हिक्स यांनी हे पद सांभाळलं.

हिक्स या फॅशन मॉडल होत्या. इव्हांका ट्रंप यांच्यासोबत त्यांनी आधी काम केलं होतं. त्या इव्हांका ट्रंप यांच्या फॅशन ब्रॅंडच्या प्रसिद्धिप्रमुख होत्या.

त्यांना हे पद का सोडावं लागलं?

2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत रशियानं हस्तक्षेप केला की नाही याबाबत चौकशी सुरू होती. 'ट्रंप यांच्यासाठी आपण खोटं बोललो होतो.' अशी कबुली त्यांनी चौकशीवेळी दिली होती. त्यांच्या जबाबानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी आपला राजीनामा दिला होता. ट्रंप यांच्यासोबत त्यांनी एकूण सहा वर्षं काम केलं. ट्रंप यांच्या प्रचार मोहिमेदरम्यान आणि राष्ट्राध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी काम केलेलं आहे.


रॉब पोर्टर, व्हाइट हाऊस स्टाफ सेक्रेटरी - 8 फेब्रुवारी 2018

पोर्टर यांना ट्रंप यांचा उजवा हात म्हटलं जायचं. पोर्टर यांनी आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला असा आरोप त्यांच्या दोन्ही पूर्व पत्नींनी केल्यानंतर पोर्टर यांना हे पद सोडावं लागलं होतं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा रॉब पोर्टर

दोघींपैकी एकीने म्हटलं की 2003मध्ये हनीमूनवेळी पोर्टर यांनी तिच्या पोटात लाथ मारली होती. तसेच तोंडावर गुद्दे देखील मारले होते. पोर्टर यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

त्यांनी हे पद का सोडावं लागलं?

त्यांच्या विरोधात हे आरोप जेव्हा लागले तेव्हा त्यांना काढून टाकण्यासाठी माध्यमातून दबाव वाढला होता. त्यांनी या पदावर एक वर्ष काम केलं होतं.


अॅंड्र्यू मॅककॅबे, FBI उप-संचालक, 29 जानेवारी 2018

अॅंड्र्यू मॅककॅबे यांनी क्रिस्टोफर व्रे आणि जेम्स कॉमी हे संचालक असताना उप-संचालकाचं काम केलं आहे. ट्रंप यांनी कॉमे यांना बडतर्फ केल्यानंतर मॅककॅबे यांनी FBIचे प्रभारी संचालक म्हणून तीन महिने कामकाज पाहिलं. ट्रंप आणि त्यांचं फारसं पटत नव्हतं. ट्रंप यांना ते नकोसे होते.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अॅंड्र्यू मॅककॅबे

त्यांना हे पद का सोडावं लागलं?

मॅककॅबे यांचे डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकांशी चांगले संबंध होते. ही गोष्ट ट्रंप यांना खटकत होती. रशियाचा निवडणुकीतील हस्तक्षेपाबाबतच्या चौकशीमध्ये मॅककॅबे दुजाभाव करतील अशी भीती ट्रंप यांना वाटत होती. म्हणूनच त्यांनी मॅककॅबेंवर दबाव आणला असावा असा अंदाज आहे. त्यांनी या पदावर दोन वर्षं काम केलं. त्यापैकी एक वर्ष ते ट्रंप यांच्या कार्यकाळात होते.


टॉम प्राइस, आरोग्य सचिव, 29 सप्टेंबर 2017

Image copyright Getty Images

प्राइस हे ओबामा केअरचे कट्टर विरोधक होते. आरोग्य कायदा निर्मितीच्या वेळी त्यांनी माहिती बाहेर फोडली असा आरोप त्यांच्यावर होता. तरी देखील त्यांची नियुक्ती आरोग्य सचिवपदी झाली होती. त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते.

प्राइस यांनी मे ते सप्टेंबर या काळात विमान प्रवास केला होता त्यांचं बिल अंदाजे 6.5 कोटी रुपये आलं होतं. त्यातील निम्म्यावेळी ते लष्कराच्या विमानाने गेले तर निम्म्यावेळी ते खासगी विमानांने गेले होते. त्यांच्या या अति खर्चामुळे ट्रंप त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं असावं. ते या पदावर आठ महिने होते.


स्टीव्ह बॅनन, मुख्य रणनीतीकार, 18 ऑगस्ट 2017

ब्रिटबार्ट या न्यूज वेबसाइटची जबाबदारी सांभाळल्यानंतर स्टीव्ह बॅनन यांनी ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला. ब्रिटबार्ट ही वेबसाइट उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ट्रंप यांचे जावई जेरेड कुशनर यांना ते नकोसे होते. बॅनन यांना बडतर्फ करण्यासाठी ते प्रयत्न करत होते असं म्हटलं जातं. प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याच्या वर्षानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली.


अॅंथनी स्केरामुची, कम्युनिकेशन डायरेक्टर - 31 जुलै 2017

स्केरामुची हे ट्रंप यांच्या परिचयातील होते. कित्येक वर्ष त्यांनी टीव्हीवरील वादविवादात ट्रंप यांची बाजू मांडत असत. व्हाइट हाऊसचे ट्वीट लीक झाले होते. या लीकेजसाठी चीफ ऑफ स्टाफ रिएन्स प्रीबस जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला होता.

त्यांना हे पद का सोडावं लागलं?

आपण थेट पंतप्रधानांना उत्तरदायी आहोत असं ते म्हणत होते. पण त्यांच्यात आणि नवीन चीफ ऑफ स्टाफ जनरल जॉन केली यांच्यात मतभेद होते. केली यांची नियुक्ती झाल्याच्या काही तासानंतर त्यांनी राजीनामा दिला. ते त्यांच्या पदवार फक्त 10 दिवस होते.


राइन्स प्रिबस, चीफ ऑफ स्टाफ, 28 जुलै 2017

Image copyright Reuters

त्यांची या महत्त्वपूर्ण पदी नियुक्ती झाली पण ट्रंप यांची मुलगी इव्हांका आणि इव्हांकाचे पती जेरेड कुशनर यांच्यासमोर त्यांचा निभाव लागला नाही. ट्रंप यांचा त्यांच्यावरील विश्वास उडाला आणि त्यांनी केली यांची नियुक्ती केली. ते या पदावर सहा महिने होते.


शॉन स्पायसर, प्रेस सेक्रेटरी 21 जुलै 2017

ट्रंप यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्यावेळी आलेल्या गर्दीच्या संख्येवरून वाद निर्माण झाला होता. आधी सांगितलेली संख्या बरोबर होती असा दावा त्यांनी केला होता. हीच त्यांच्या प्रेस सेक्रेटरीपदाची सुरुवात होती.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा शॉन स्पायसर

स्कारामुच्ची कम्युनिकेशन डायरेक्टर झाल्यावर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यानंतरही त्यांचे आणि ट्रंप यांचे संबंध चांगले राहिले. या पदावर ते सहा महिने होते.


जेम्स कॉमे, FBI संचालक - 9 मे 2017

2016 च्या निवडणुका जाहीर झाल्यावर, मतदानाला केवळ एक आठवडा बाकी असताना त्यांनी जाहीर केलं की हिलरी क्लिंटन यांच्या खासगी इमेल प्रकरणाची चौकशी होईल. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे आधी डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

कुणावर गुन्हे दाखल होणार नाही, असं कॉमी यांनी सांगितल्यावर त्यांच्यावर रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी देखील टीका करण्यास सुरुवात केली.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जेम्स कॉमी

रशियाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाबाबतच्या चौकशीची सुरुवात त्यांच्याच पुढाकाराने झाल्यानंतर ट्रंप त्यांच्यावर नाराज झाले. डेप्युटी अॅटर्नी जनरल यांच्या सल्ल्यानुसार कॉमी यांना बडतर्फ करण्यात आलं, अशी सफाई व्हाइट हाऊसने दिली. सुरुवातीला ते म्हणाले होते हिलरी यांचं इमेल प्रकरण नीट न हाताळलं गेल्यामुळं त्यांना काढून टाकण्यात आलं.

पण, त्यांना काढून टाकताना, 'आपल्या डोक्यात ती रशियाची गोष्ट राहिली,' असं ट्रंप यांनी एका टीव्ही मुलाखती दरम्यान म्हटलं होतं.


मायकल फ्लिन, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, 14 फेब्रुवारी 2017

तांत्रिकदृष्ट्या मायकल फ्लिन यांनी राजीनामा दिला आहे पण त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं गेलं असं म्हटलं जातं.

Image copyright Reuters

रशियाच्या राजदूतांशी असलेल्या जवळीकतेबाबत त्यांनी व्हाइट हाऊसच्या उच्चपदस्थांना अंधारात ठेवलं होतं. उप-राष्ट्राध्यक्षांची देखील त्यांनी दिशाभूल केली होती, असं म्हटलं जातं. या कारणामुळेच त्यांना काढून टाकण्यात आलं असावं. रशियन राजदूत सिर्गे किसलायक यांच्या ते संपर्कात होते, पण त्याबाबत ते खोटं बोललं. ही गोष्ट उघड झाल्यावर त्यांचं जाणं हे निश्चित होतं. ते केवळ 23 दिवसच या पदावर होते.


सॅली येट्स, प्रभारी महाधिवक्ता - 31 जानेवारी 2017

सात मुस्लीम देशांवर ट्रंप यांनी प्रवास बंदी लादली होती. त्यांच्या या निर्णयावर येट्स यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. मुस्लीम देशांबाबत असा निर्णय घेणं हे राज्यघटनेला अनुसरुन नाही असं त्या म्हणाल्या होत्या. त्यामुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं होतं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा येट्स

"अमेरिकन नागरिकांची सुरक्षा करणं आपलं कर्तव्य आहे आणि त्याचं त्यांनी पालन केलं नाही," असं ट्रंप यांच्या प्रशासानाने म्हटलं होतं. त्यांच्या पदावर त्या फक्त 10 दिवस होत्या.


प्रीत भरारा, न्यूयॉर्क फेडरल प्रॉसेक्युटर -11 मार्च 2017

केंद्र सरकारचे वकील म्हणून त्यांची ओबामा यांच्या काळात नियुक्ती झाली होती. ट्रंप यांनी पदभार स्वीकारल्यावर त्यांनी भरारा यांना त्यांच्या पदावर राहण्यास सांगितलं. पण नंतर ट्रंप यांनी भरारा यांना काढलं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा प्रीत भरारा

भरारा हे शिस्तप्रिय वकील समजले जातात. त्यांच्या अधिकार क्षेत्रात ट्रंप टॉवर येत होतं. ही गोष्ट ट्रंप यांना काळजीची वाटली असावी म्हणून त्यांनी भरारा यांना काढलं असावं. भरारा यांच्यासोबत 46 सरकारी वकिलांना काढण्यात आलं होतं. त्यामुळे ही केवळ ही 'रुटीन प्रक्रिया' आहे असं ट्रंप यांच्या प्रशासनाने म्हटलं होतं.


पॉल मॅनाफोर्ट, ट्रंप यांचे प्रचार व्यवस्थापक, 19 ऑगस्ट 2016

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पॉल मॅनाफोर्ट

ट्रंप यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी तीन महिने सांभाळली. त्यांना का काढण्यात आलं यांचं कारण देण्यात आलं नव्हतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)