फ्रान्स सुपरमार्केट हल्ला: 'असामान्य शौर्य' दाखवणाऱ्या पोलिसाचं निधन

बेलट्रामे Image copyright PA
प्रतिमा मथळा ओलिसाच्या बदल्यात स्वतःला कट्टरतावाद्याकडे सोपवणारे पोलीस अधिकारी बेलट्रामे

ओलिसाच्या बदल्यात स्वतःला कट्टरतावाद्याकडे सोपवणारे पोलीस अधिकारी रुग्णालयात अरनॉड बेलट्रामे यांचं रुग्णालयात निधन झालं. त्यांनी देशासाठी असामान्य शौर्य दाखवलं असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुएल मॅकरॉन यांनी म्हटलं.

बेलट्रामे यांच्या मृत्यूची बातमी इंटेरिअर मिनिस्टिर (गृह मंत्री) गेराल्ड कोलॉम्ब यांनी दिली. "त्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली आहे. फ्रान्स त्यांचं शौर्य, त्यांची धडाडी आणि त्याग कधीही विसरणार नाही," असं त्यांनी म्हटलं.

पळून जाण्यासाठी हल्लेखोरानं एका महिलेला मानवी ढाल बनवलं होतं. तिच्या ऐवजी आपला ढाल म्हणून वापर करावा, असं लेफ्टनंट कर्नल अरनॉड बेलट्रामे यांनी हल्लेखोराला पटवून दिलं.

बेलट्रामे यांच्या प्रयत्नामुळेच हल्लेखोर ठार करण्यास फ्रान्सच्या पोलिसांना यश आलं. या हल्ल्यात 3 जण ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं मॅकरॉन यांनी सांगितलं.

Image copyright EPA

दक्षिण फ्रान्सच्या ट्रेबेस शहरात Super U सुपरमार्केटमध्ये एका बंदुकधाऱ्यानं हल्ला केला. तो कथित कट्टरतावादी संघटना इस्लामिक स्टेटचा सदस्य असल्याचा दावा करत होता.

काही फ्रेंच माध्यमांनुसार हल्लेखोराने आधी काही जॉगिंग करत असलेल्या पोलिसांवर गोळ्या झाडल्या होत्या. 25 वर्षीय हल्लेखोराची ओळख पटली असून त्याचं नाव रिडाउन लकदिम आहे. 13 नोव्हेंबर 2015 रोजी झालेल्या हल्ल्यातील संशयित सलाह अब्देसलामची सुटका करण्यात यावी अशी मागणी त्याने ठेवली होती. लकदिमसोबत आलेला आणखी एका हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे.

Image copyright Google Maps
प्रतिमा मथळा Super U मार्केटमध्ये हल्ला झाला.

घटना कशी घडली?

एका नागरिकाला ठार करून हल्लेखोर लकदिमने कारचं अपहरण केलं. त्यानंतर त्याने जॉगिंग करणाऱ्या पोलिसावर गोळ्या झाडल्या. स्वतः कार ड्राइव्ह करून लकदिम ट्रेबेसमध्ये पोहोचला. तिथे सुपर मार्केटमध्ये घुसून त्याने घोषणा केली, मी आयसिसचा सैनिक आहे. त्याने एक ग्राहक आणि सुपर मार्केटच्या कर्मचाऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याने एका महिलेला ओलीस ठेवलं.

हे सुरू असतानाच काही लोक सुपर मार्केटच्या कोल्ड स्टोरेज रूममध्ये जाऊन लपले. त्यानंतर तिथं पोलीस आले. ओलीस महिलेची सुटका करून घेऊन बेलट्रामे यांनी स्वतःला हल्लेखोराकडं सोपवलं. पोलीस आणि हल्लेखोरात चकमक झाली. त्यात हल्लेखोराचा मृत्यू झाला आणि बेलट्रामे हे गंभीर जखमी झाले. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.

फ्रान्सवर 2015 सालापासून अनेक जिहादी हल्ले झाले आहेत. त्यामुळे देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. जानेवारी 2015 मध्ये एका जिहादी बंदुकधाऱ्याने एका पॅरिसच्या सुपरमार्केटवर हल्ला करून चार जणांचा जीव घेतला होता.

नोव्हेंबर 2015 मध्ये झालेल्या एका भीषण हल्ल्यात 130 जणांचा जीव गेला होता. त्यानंतर अनेक महिन्यांसाठी आणीबाणीही जाहीर करण्यात आली होती, जी गेल्या ऑक्टोबरमध्ये उठवण्यात आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)