'एलियन'चा सांगाडा? नेमकं सत्य काय?

सांगाडा Image copyright EMERY SMITH

दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये मिळालेला 6 इंचाचा सापळा परग्रहवासियाचा नसून हा मानवी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या ममीचा आकार आणि त्याच्या डोक्याचा विचित्र आकार यामुळे ही ममी परग्रहवासियाची (एलियन) असावी असा संशय होता. त्यामुळे या सापळ्याबद्दल बरीच उत्सुकता होती.

संशोधनात असं सिद्ध झालं आहे की हे अवशेष नवजात मुलाचे आहेत. याच्या जनुकांमध्ये बरीच असमानता दिसली. या अवशेषांचा आकार भ्रूणाइतका असूनही सुरुवातीच्या काळात याचं वय 6 ते 8 वर्षं असावं असं मानलं जात होतं.

असमान्य लक्षणांमुळे याचं मूळ समजू शकत नव्हतं.

या सापळ्यात अनेक अनुवांशिक बदल झालेले असल्याने याचं वयही समजू शकलं नव्हतं, असा निष्कर्ष डीएनए टेस्टमधून काढण्यात आला आहे.

जिनोम रिसर्च या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे.

लहान आकार, हाडांची कमी संख्या आणि शंकूच्या आकाराचं डोकं आदी असमानता या अवशेषांमध्ये होती.

चिलीमधील अटाकामा या वाळवंटात एका निर्मनुष्य गावात एका पिशवीमध्ये हे अवशेष सापडले होते. तिथून हे अवशेष स्पेनमध्ये नेण्यात आले. या अवशेषाला अटा असं नाव देण्यात आलं होतं.

काही लोकांनी हे अवशेष परग्रहवासियाचे असावेत असं मत व्यक्त केलं होतं.

पण नव्या संशोधनामुळं हे अवशेष माणसाचेच असल्याचं निष्पन्न झालं आहे. यावर 'सिरिस' नावाची डॉक्युमेंट्री ही बनवण्यात आली होती. यातही परग्रहवासियांच्या रहिवाशाचा पुरावा असावा असं सुचवण्यात आलं होतं.

Image copyright EMERY SMITH

पण नव्या संशोधनानं हे सर्व अंदाज खोडून काढलं आहे. संशोधकांनी या अवशेषांचा जनुकांची ब्लूप्रिंट बनवली आहे.

संशोधकांनी सुरुवातीलाच हे अवशेष मानवाचे असल्याचं मत व्यक्त केलं होतं. पण आता संशोधकांना याचे पुरावे ही मिळाले आहेत.

हे अवेशष एक नवजात मुलीचे असून तिच्या जनुकांत मोठे बदल झाले होते. शिवाय याची उंची कमी होतीच आणि माकड हाड वाकलेलं होतं.

स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनमधील सुक्ष्म जीव विज्ञान आणि इम्युनोलॉजीचे प्राध्यापक गॅरी नोलन म्हणाले, "याची हाडं पाहून थोडं विचित्र वाटतं होतं आणि काही समजूनही येत नव्हतं."

सर्वसाधारणपणे माणसांच्या छातीच्या पिंजऱ्याला 12 हाडं असतात. पण या अवशेषांत ही हाडं फक्त 10 आहेत. नोलन म्हणतात, "हा सांगाडा 40 वर्षं जुना असून ही मुलगी जन्म होताच मृत झाली असावी."

गॅरी नोलन 2012पासून या अवशेषावर काम करतात.

या संशोधनाचे सहलेखक युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया-सॅन फ्रॅन्सिस्कोमधील अतुल बटे म्हणतात, "असामान्य सिंड्रोम असलेल्या रुग्णाच्या जनुकांचा अभ्यास करताना लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्यात अधिक जनुकं असण्याची शक्यता असते."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)