अमेरिकेचे रशियाच्या दूतावासातील 60 जणांना देश सोडण्याचे आदेश

पुतीन ट्रंप Image copyright Getty Images

ब्रिटनमधल्या पूर्वीच्या रशियन गुप्तहेरावर नर्व्ह एजंटचा प्रयोग केल्याचं प्रकरण अमेरिकेनंही गांभीर्यानं घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी या प्रकरणावरून रशियन दूतावासातील 60 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

शीतयुद्धानंतर अमेरिकेनं रशियाविरोधात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.

अमेरिकेच्या बरोबरीनं युरोपात जर्मनीनेही चार रशियन अधिकाऱ्यांची हकालपट्टी केल्याचा दावा जर्मनीच्या परराष्ट्र मंत्रालयानं केला आहे. या प्रकरणी युरोपातील अन्य देशांनीही त्यांच्या-त्यांच्या देशातील रशियन दूतावासातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण इंग्लंडमध्ये रशियात यापूर्वी गुप्तहेर म्हणून काम केलेले सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलिया यांच्यावर नर्व्ह एजंटचा वापर करत हल्ला करण्यात आल्याच्या घटनेत रशियाचा हात आहे. यावर युरोपीयन युनियनच्या नेत्यांमध्ये गेल्या आठवड्यात एकमत झालं होतं.

मात्र, रशियानं या आरोपांचा साफ शब्दांत इन्कार केला आहे. अमेरिकेतल्या सिअॅटल इथला रशियाचा वाणिज्य दूतावास अमेरिका बंद करणार असल्याचं वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

Image copyright EPA

शीतयुद्धात सोविएत युनियनच्या विरोधात केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेकडून झालेली ही मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. अन्य युरोपीय देशांनीही त्याची री ओढल्याने आता युरोपात रशियाविरोधी वातावरण निर्माण व्हायला लागलं आहे.

कोणता देश किती अधिकाऱ्यांना काढणार

ब्रिटनने या महिन्यात त्यांच्या देशात असलेल्या रशियन दूतावासातील 23 अधिकाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले होते. ब्रिटनच्या या घोषणेनंतर अन्य अनेक देशांनी ब्रिटनला साथ दिली आहेत. हे देश आहेत;

अमेरिका - 60

युक्रेन - 13

पोलंड - 4

फ्रान्स - 4

जर्मनी - 4

कॅनडा - 4

चेक प्रजासत्ताक - 3

लिथुआनिया - 3

नेदरलँड - 2

इटली - 2

डेन्मार्क - 2

एस्टोनिया - 1

लाटाव्हिया - 1

फिनलँड - 1

रोमानिया - 1

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)