ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यावरचा सूर्य मावळतो तेव्हा...

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी

सातत्यानं जिंकण्याचे असंख्य विक्रम नावावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा दबदबा क्रिकेटविश्वात आहे. मात्र या जिंकण्याला शिष्टाचाराचं कोंदण नसतं. बॉल टँपरिंगच्या निमित्तानं ऑस्ट्रेलियाचा वर्चस्ववादी करिश्मा ओसरल्याची चिन्हं आहेत.

सूर्याची किरणं पडून चमकणारा घोटीव काळसर तपकिरी रंगाचा खडा डोंगर, निळ्या रंगाच्या प्रेमात पडायला लावणारं निरभ्र आकाश, त्या डोंगरावरून अलगद विहरत जाणारे पाणीदार ढग, हिरव्या रंगाच्या विविध छटा मनमुरादपणे उलगडून दाखवणारी झाडं, लोळावंसं वाटावं असं लुसलुशीत गवत.

एखाद्या हिलस्टेशनचं वाटावं असं हे वर्णन आहे केपटाऊनच्या न्यूलँड्सचं. जगातल्या रुपगर्वित स्टेडियम्समध्ये न्यूलँड्सचं स्थान अव्वल आहे. असं म्हणतात की इथलं वातावरण तुमचा नूर पालटवू शकतं.

पर्वताची उत्तुंगता, रंगांची कमाल आणि भारावून टाकणारा निसर्ग मैदानावरही बावनकशी आविष्काराची किमया घडवून आणू शकतो.

पण शनिवारी नितांतसुंदर न्यूलँड्सवर क्रिकेटविश्वाला काळिमा लावणारी घटना घडली. निमित्त होतं बॉल टँपरिंगचं अर्थात अनधिकृत पद्धतीनं चेंडू कुरतडणे. उद्देश हाच की चेंडूला लकाकी मिळून तो स्विंग व्हावा.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बाह्य साधनाद्वारे चेंडू कुरतडला. हे सगळं टीव्ही कॅमेऱ्यानं टिपलं, अंपायर्सनी याची नोंद घेतली.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चूक मान्य केली. अल्पावधीतच ही चूक कोण्या एकाची नसून हा चीटिंगचा शिस्तबद्ध कट असल्याचं समोर आलं आणि क्रिकेटच खोल गर्तेत गेलं.

ही लढाई होती दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या क्रिकेटविश्वातल्या दोन तुल्यबळ संघांची. एकमेकांविरुद्धच्या कडव्या वैरासाठी ओळखल्या जाणाऱ्या संघादरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेपैकी तिसरी कसोटी.

जगातला नंबर एकचा बॅट्समन ऑस्ट्रेलियाकडे तर नंबर वन बॉलर दक्षिण आफ्रिकेकडे. कौशल्यांच्या निकषांवर एकमेकांना पुरून उरणाऱ्या या लढाईत विजय विकृत मानसिकतेचा झाला. जिंकण्याची उर्मी मेंदूला प्रेरित करते, पण अपयशी ठरण्याची भीती मेंदू सडवते.

फोटो कॅप्शन,

जगातल्या निसर्गरम्य स्टेडियम्समध्ये न्यूलँड्स, केपटाऊनचं नाव अग्रणी असतं.

बॉल टँपरिंग हा मैदानावर घडणाऱ्या अनेक चुका किंवा घोडचुकांपैकी एक आहे. या चुकांवर नियंत्रण ठेवण्याकरता आयसीसीची (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) 'कोड ऑफ कंडक्ट' नावाची नियमावली प्रत्येक आंतरराष्ट्रीय मॅचला लागू असते.

या पुस्तिकेतल्या नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहण्यासाठी तीन अंपायर्स आणि एक मॅचरेफरी असतात. साहजिक आहे की खेळाडूंच्या वर्तनाकडे तटस्थ नजर असते.

देश कुठलाही असो, यजमान किंवा पाहुणा संघ कोणीही असो, ब्रॉडकास्टिंग राइट्स अर्थात सामन्याचं प्रक्षेपण करण्याचे अधिकार कोणत्याही चॅनेलकडे असोत- कुठल्याही आंतरराष्ट्रीय मॅचचं चित्रण किमान 25 कॅमेरे करत असतात.

यापैकी काही कॅमेऱ्यांच्या साथीने ऑडियोही रेकॉर्ड होतो. साहजिकच 22 यार्डांच्या मैदानात बारीकसारीक काहीही घडलं तरी 'तिसरा डोळा' ते टिपत असतो. हे टिपण्याकरता साधारण पाऊणशे तंत्रज्ञांची टीम झटत असते. टिपलेल्या गोष्टींच्या वर्णनाकरता डझनावारी माणसं बोलत असतात.

नियमांची आणि तंत्रज्ञानाची एवढी वेसण असतानाही ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला जिंकण्यासाठी इतकी खालची पातळी गाठावीशी वाटणं विचारांचं फोलपण सिद्ध करतं.

सध्याच्या घडीला जगातला सर्वोत्तम बॉलिंग लाइनअप ताफ्यात असतानाही स्किलपेक्षाही ठगवून जिंकूया ही मानसिकता अस्वस्थता दर्शवते.

स्पोर्ट्समन स्पिरीट आणि खेळ मनं जोडतात या संकल्पना केवळ पुस्तकी राहिल्या आहेत हे वास्तव समोर आलं आहे.

शिस्तबद्ध स्पोर्ट्स कल्चर असणाऱ्या आणि एक्सलन्स सेंटर्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या स्पोर्टिंग व्यवस्थेलाही वाळवीनं पोखरलेलं आहे हे सिद्ध झालं आहे.

फोटो कॅप्शन,

कॅमेरून बॅनक्रॉफ्टनं प्रत्यक्षात बॉल टेपरिंग केलं.

मुद्दा नियम तोडण्याचा, गुन्हा करण्याचा नाही. ते वरकरणी निमित्त आहे. ज्या सुनियोजित पद्धतीनं चीटिंग कट रचण्यात आला असं दिसतंय ते हादरवून टाकणारं आहे.

बिनधास्त नियम तोडतो- आम्हाला कुणी हात लावू शकत नाही ही बेफिकिरी मुळाला उखडवणारी आहे. पिवळ्या टेपनं लाल बॉल घासणारा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट किंवा मीडियासमोर या कुभांडाची कबुली देणारा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांचे व्हीडिओ व्हायरल झालेत. पण या कटात प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहे.

जिंकण्यासाठी योजना ठरवणं, सरावाला दिशा देणं, खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधणं यासाठी प्रशिक्षक असतो.

अंतिम संघनिवड करण्याच्या निर्णयप्रक्रियेत प्रशिक्षकाची भूमिका निर्णायक असते. याव्यतिरिक्त प्रशिक्षक राष्ट्रीय निवडसमितीचाही भाग असतो.

इतक्या बहुआयामी भूमिकेत असणाऱ्या प्रशिक्षकाला अंधारात ठेवून हा कट रचला गेला कसा, हे गौडबंगालच आहे. बॅनक्रॉफ्ट पिवळ्या टेपनं बॉल घासतानाचा व्हीडिओ जगभर व्हायरल झाला आहे.

मात्र ड्रेसिंगरुममधून वॉकीटॉकीद्वारे बदली खेळाडू पीटर हँड्सकॉम्बला विचारणा करणाऱ्या लेहमन यांच्या व्हीडिओमुळे त्यांची तुर्तास सुटका झाली आहे. हँड्सकॉम्बनेच बॅनक्रॉफ्टला सूचना दिल्याचं या व्हीडिओत स्पष्ट दिसतंय.

फोटो कॅप्शन,

ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांना क्रिकेट ऑस्ट्रेलियानं क्लिनचीट दिली आहे.

आपण हरू शकतो याची जाणीव झाल्यानंतर खेळाचा दर्जा उंचावण्यापेक्षा आपण नियम वाकवून जिंकू यासाठी कॅप्टन नवख्या खेळाडूला भरीस पाडतो हा पडलेला पायंडा केवळ ऑस्ट्रेलियातल्या नव्हे जगभरातल्या क्रिकेटचाहत्यांच्या जिव्हारी लागणारा आहे.

प्रशिक्षक लेहमन यांची कटातील खेळाडूंना फूस असेल तर ते आणखी धोकादायक आहे. मात्र लेहमन यांना अंधारात ठेवून हा कट शिजला असेल तर ते संघातील फूट उघड करणारं आहे.

प्रतिस्पर्ध्यांच्या भूमीवर जाऊन त्यांना चीतपट करण्याची, जगातल्या प्रतिकूल अशा वातावरणामध्येही समोरच्याला नमवण्याची ताकद असलेला, खेळायला अशक्यप्राय वाटाव्या अशा पिचवरही वर्चस्व गाजवणारा, मॅचमध्ये कुठल्याही स्थितीतून कमबॅक करण्याची हातोटी असणारा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही असं म्हटलं जायचं.

हरायला आवडत नाही म्हणून त्यांनी जिंकण्याचीच सवय करून घेतली. पण या जिंकण्याला नैतिक अधिष्ठान ठेवायला त्यांना जमत नाही. त्या जिंकण्यात मग्रुरी आहे. उद्दामपणाचा दर्प आहे. तुम्हाला कसं चिरडलं असं प्रतिस्पर्ध्यांना खिजवण्याची वृत्ती आहे.

कसोटी क्रिकेटमधला सगळ्यात यशस्वी संघ हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. थोडेथोडके नव्हे तर पाच वर्ल्डकप त्यांच्या नावावर आहेत. जिंकण्याचे अनेकविध पराक्रम मिरवणाऱ्या या संघाचं वागणं नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतं. यशाचं शिखर सर केल्यावर नम्र होणं, कृतज्ञ असणं अपेक्षित असतं. पण असलं काही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या गावीही नाही.

"जिंकण्यासाठी अगतिक झालो होतो म्हणून बॉल टँपरिंग केल्याची कबुली दिल्यामुळे ऑस्ट्रेलियावरचा राग अधिक तीव्र झाला आहे. रोल मॉडेल म्हणून जबाबदारी असताना नामुष्की आणणारं वागल्यामुळे ऑस्ट्रेलियन जनतेचा पाठिंबाही संघाने गमावला," असं ज्येष्ठ पत्रकार आणि क्रिकेट लेखक राजदीप सरदेसाई सांगतात.

ते पुढे म्हणतात, "बॉल टँपरिंगसाठी नियमात जेवढी शिक्षेची तरतूद आहे तेवढी शिक्षा स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टला झाली. मात्र प्रसंगाचं गांभीर्य जाणून आयसीसीनं नियम कठोर करायला हवा होता. फुटबॉलमध्ये रेड कार्ड मिळालं की किमान तीन सामने बाहेर बसावं लागतं. त्याधर्तीवर नियम बदलायला हवेत."

फोटो कॅप्शन,

डेव्हिड वॉर्नरला बॉल टेंपरिंग प्रकरणाचा सूत्रधार मानण्यात येत आहे.

"एक संघटना म्हणून आयसीसी पूर्वग्रहदूषित नाही परंतु कमकुवत नक्कीच आहे. हे त्यांचं अपयश आहे. ऑस्ट्रेलिया जिंकणारा संघ आहे, पण त्यांच्याकडे जेत्याची वृत्ती नाही. खेळ ही ऑस्ट्रेलियाची अस्मिता आहे. त्यांचा इतिहास मर्यादित आहे. खेळातल्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियन म्हणून त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी वाट्टेल ते हेच त्यांच्या अंगी भिनलंय. बॅड लूझर्स आणि अरोगंट विनर्स आहेत," असं सरदेसाई सांगतात.

प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी स्लेजिंग अर्थात शेरेबाजी हे वाचाळ अस्त्र ऑस्ट्रेलियानंच पहिल्यांदा परजलं. रंग, वर्ण, जात, वंश, कुटुंबीय, देश या कशावरूनही अर्वाच्य भाषेत शेलके वाग्बाण लगावणं ही कांगारुंची खासियत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना खेळण्याच्या कौशल्यापेक्षा या बोलंदाजीचा सामना करणं सगळ्यात अवघड असतं असं अनेक क्रिकेटपटू सांगतात.

वाचाळपणाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतो आणि तिथंच ऑस्ट्रेलियाच्या गेमप्लॅनची सरशी होते. समोरच्याची एकाग्रता भंग करणं हेच तर मुख्य ध्येय असतं.

1981 मध्ये बेन्सन अँड हेजेस या वनडे स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा मुकाबला कडवे प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी होता. न्यूझीलंडला शेवटच्या चेंडूवर सामना टाय करण्यासाठी सहा रन्स हव्या होत्या. सामना जिंकून देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे तेव्हाचे कॅप्टन ग्रेग चॅपेल यांनी बॉलिंग टाकत असलेल्या आपल्या भावाला अर्थात ट्रेव्हर चॅपेलला अंडरआर्म अर्थात सरपटी चेंडू टाकायला सांगितलं.

सरपटी चेंडू टाकल्यानं न्यूझीलंडच्या बॅट्समनला चौकार किंवा षटकार लगावता आला नाही आणि ऑस्ट्रेलियानं सामना जिंकला. अंडरआर्म बॉल टाकणं नियमानुसार अवैध नव्हतं. परंतु ते खिलाडूवृत्तीला बट्टा लावणारं होतं.

फोटो कॅप्शन,

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड.

ट्रेव्हर तसंच ग्रेग आणि एकूणच ऑस्ट्रेलियाच्या संघावर जगभरातून टीका झाली. या घटनेनंतर नियमात बदल होऊन अंडरआर्म चेंडूवर बंदी घालण्यात आली. ठरवून नियमांना बगल देण्याचा तो पहिलाच प्रयत्न होता.

2008 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणाऱ्या बॉर्डर गावस्कर टेस्ट सीरिजवेळी घडलेलं मंकीगेट प्रकरण क्रिकेटच्या इतिहासातला अशोभनीय कालखंड म्हणून ओळखला जातो. हरभजन सिंग आणि अँड्रयू सायमंड्स यांच्यात झालेल्या बाचाबाचीने टोक गाठलं.

हरभजनवर वंशद्वेषी शेरेबाजी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. याप्रकरणाची सुनावणी एका स्वतंत्र विधितज्ज्ञांसमोर झाली. मैदानावरच्या वादावादीचं पर्यावसान न्यायालयीन खटल्यात झालं. हरभजनला वंशद्वेषी शेरेबाजीच्या आरोपातून मुक्त करण्यात आलं. मात्र आक्षेपार्ह भाषेसाठी मानधनातून काही रक्कम कापून घेण्यात आली.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मानसिकतेची साक्ष देणाऱ्या या दोन घटना केवळ वानगीदाखल. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी, प्रतिस्पर्धी खेळाडू तसंच अंपार्यसना उद्देशून आक्षेपार्ह भाषेप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या संघातले खेळाडू सातत्याने दोषी आढळतात.

विशेष म्हणजे श्रीलंकेच्या खेळाडूंना उद्देशून वंशद्वेषी उद्गार काढल्याप्रकरणी सध्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांच्यावर पाच सामन्यांची बंदी ठोठावण्यात आली होती.

बॉल टेपरिंग प्रकरणात आरोपी डेव्हिड वॉर्नरनं याआधीही शिस्तभंगाच्या कारणांसाठी शिक्षा भोगली आहे. इंग्लंडचा खेळाडू जो रूटला ठोसा लगावण्याप्रकरणी वॉर्नरला शिक्षा सुनावण्यात आली होती.

फोटो कॅप्शन,

2008 मध्ये घडलेल्या मंकीगेट प्रकरण क्रिकेट विश्वावर नामुष्की आणणारं होतं.

काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकला उद्देशून आक्षेपार्ह भाषेप्रकरणी वॉर्नरच्या मानधनातून 75 टक्के रक्कम कापून घेण्यात आली होती.

गेल्यावर्षी याच सुमारास कर्णधार स्मिथनं भारताविरुद्धच्या पुण्यात झालेल्या कसोटी सामन्यात DRS अर्थात थर्ड अंपायरकडे दाद मागावी का यासाठी ड्रेसिंगरुमकडे विचारणा केली होती. खेळ मैदानात खेळला जात असल्यानं तटस्थ व्यक्तीकडे विचारणा करणं स्पिरीट ऑफ द गेमला बट्टा लावणारं होतं. त्यावेळी स्मिथनं 'ब्रेनफेड' क्षण असल्याचं सांगत चुकीची कबुली दिली आहे. ही यादी प्रचंड आहे.

मात्र त्याचवेळी ऑस्ट्रेलिया हा आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा संस्थापक सदस्य आहे हे विसरून चालणार नाही. आयसीसीचं प्रशासन ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या 'बिग थ्री' राष्ट्रांकडे एकवटलं होतं. गेल्याचवर्षी इतर सदस्य राष्ट्रांनी ही मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेतला.

गेल्यावर्षी खेळाडूंच्या मानधनावरून 'क्रिकेट ऑस्ट्रेलिया' आणि खेळाडूंमध्ये बेबनाव निर्माण झाला होता. जवळपास महिनाभर हा तिढा कायम होता. अखेर खेळाडूंच्या मागण्या बोर्डानं मान्य केल्या होत्या. बॉल टँपरिंगप्रकरणात मात्र बोर्डानं कठोर पावलं उचलत खेळाडूंना दणका दिला आहे.

बॉल टँपरिंगप्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया संघाच्या जगभर पसरलेल्या चाहत्यांच्या विश्वासाला तडा गेला. 'ऑस्ट्रेलिया' या ब्रँडलाही फटका बसला. बॅगी ग्रीन मिळणं अर्थात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं ही सर्वोच्च संधी समजली जातं. 'जिंकण्यासाठी वाट्टेल ते'च्या नादात या संधीचा अपमान झाल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयसीसीच्या तुलनेत खेळाडूंवर कठोर कारवाई केली आहे.

अनेक वर्षं उधळलेला ऑस्ट्रेलियाचा अश्वमेध याप्रकरणानं मवाळ होण्याची शक्यता आहे. जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला याप्रकरणाच्या निमित्तानं शिष्टाचाराचं कोंदण बसवून घेण्याची वेळ आली आहे.

फोटो कॅप्शन,

चेंडू अधिक स्विंग व्हावा यासाठी कुरतडला जातो.

5 नोव्हेंबर 2006 या दिवशीचा एक प्रसंग मुद्दाम आठवणीत राहणारा. मुंबईतल्या ऐतिहासिक ब्रेबॉर्न स्टेडियमवरची झगमगती रात्र होती.

नोव्हेंबर महिना असल्यानं जाणवण्याइतपत थंडीही होती. 'मिनी वर्ल्डकप' अर्थात 'चॅम्पियन्स ट्रॉफी' स्पर्धेच्या अंतिम फेरीत वेस्ट इंडीजला आरामात गुंडाळून ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला होता.

वेळखाऊ अशा पुरस्कार सोहळ्यात अखेर ऑस्ट्रेलियाच्या संघाला ट्रॉफी देण्याचा क्षण आला. बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी कॅप्टन रिकी पॉन्टिंगचं अभिनंदन करून ट्रॉफी हातात दिली.

जिंकल्यानंतरही उतावीळ असणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी पवारांना ढकललं. 'आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे, तुम्ही बाजूला व्हा' या भावनेनं त्यांनी पवारांना बाजूला सारलं. मीडियानं हे वागणं समोर आणलं, मात्र पवारांनी विषय वाढवला नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मात्र बॉल टँपरिंग प्रकरणी कडक कारवाई करत, असं वर्तन खपवून घेतलं जाणार नाही असा स्पष्ट संदेश दिला आहे.

हे वाचलंत का?

हे पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)