गर्भलिंग निदानाची 'पार्टी' पडली महागात

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
व्हीडिओ सौजन्य- माईक किलिबर्ट

इंटरनेटवर अमेरिकेतल्या गर्भलिंग निदानाच्या पार्टींचा जोरदार ट्रेंड आहे. त्यातल्या अनेकांना लाखो व्ह्यूज मिळतात. अशाच एक हिट झालेल्या व्हीडिओवर सध्या वाद निर्माण झाला आहे.

गर्भलिंग निदान पार्टी हा आधुनिक ट्रेंड आहे. ज्या कुटुंबात बाळाचा जन्म होणार आहे ते कुटुंबीय अशा पार्टींचं आयोजन करतात. त्यात, मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना बोलावण्यात येतं. याच पार्टीत गर्भाचं लिंग कोणतं आहे ते जाहीर करतात. निळा रंग मुलासाठी तर गुलाबी रंग मुलींसाठी. ही पार्टी क्रिएटिव्ह असते.

किलिबर्ट कुटुंबानं अशीच एक पार्टी आयोजित केली होती. त्यात त्यांची पाळीव मगर आणि टरबूज यांचाही वापर झाला. मगरीमुळेच प्राण्यांच्या रक्षणावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि वाद पेटला.

फेसबुकवरचा हा व्हीडिओ आतापर्यंत सत्तर लाख लोकांनी पाहिला आहे. माईक किलिबर्ट हे मगरी पाळतात. आता त्यांच्याकडे सॅली नावाची एक मगर आहे.

माईक यांनी निमंत्रितांसमोर सॅलीच्या तोंडात एक टरबूज टाकला.

जेव्हा ती मगर तोंड बंद करते तेव्हा टरबूजातून निळ्या रंग बाहेर पडला. याचा अर्थ त्यांना मुलगा होणार!

त्यावर तिथे जमलेल्यांनी लोकांनी एकच जल्लोष केला. हजारो लोकांनी या कुटुंबाचं सोशल मीडियावर अभिनंदन केलं.

सोशल मीडियावर टीकेची झोड

पण त्याचवेळी हजारो लोक खूप चिडलेही. कारण व्हीडिओमध्ये एका दृश्यात एक लहान मुलगा त्या मगरीजवळ लोळताना दिसतो.

त्या क्षणी किलिबर्ट त्या सॅलीचं डोकं दाबतात आणि तिला त्या लहान मुलाकडे जाण्यापासून रोखतात.

या घटनेला अनेकांनी प्राण्यांचा छळ असं संबोधलं. पत्रकार याशर आली यांनी "मगरीनं त्याचा हात चावायला हवा होता," असं विधान केलं आहे.

अली यांना रिप्लाय करताना एकानं, "आपल्या आनंदासाठी असा छळ करणं बंद करा," असं म्हटलं आहे.

किलिबर्ट यांनी टीकेला उत्तर दिलं.

त्यावर स्पष्टीकरण देताना, "परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे अनेक लोक मगरीला हाताळू शकत होते," असा बचाव केला.

अर्थात, अपघात होऊ शकतात असं किलिबर्ट यांनी मान्य केलं. त्याआधी ती मगर तीन वेळा चावली आहे, असंही त्यांनी सांगितलं. पण त्याचवेळी आपण मगरींना हाताळू शकणाऱ्या जगातल्या सर्वोत्तम लोकांपैकी एक असल्याचंही दावाही त्यांनी केला. सरपटणाऱ्या प्राण्यांना सांभाळण्याचं काम ते करतात.

या व्हीडिओवर आलेल्या नकारात्मक काँमेंट्सबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "त्या कॉमेंट कीव करण्याच्या लायकीच्या आहेत."

या किलिबर्टच्या पोस्टवर एकानं आतापर्यंतचा सगळ्यात उत्तम गर्भलिंग निदानाचा व्हीडिओ आहे अशी कॉमेंट केली. या कमेंटशी अनेकांनी सहमती दर्शवली.

हेही वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)