पाकिस्तानमध्ये काही लोक मलाला यांचा तिरस्कार का करतात?

मलाला, मानवाधिकार, नोबेल Image copyright Getty Images

तालिबानच्या हल्ल्यातून बचावल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझई यांनी प्रथमच पाकिस्तानला भेट दिली.

युसूफझई आता 20 वर्षांच्या आहेत आणि त्या मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत.

2012मध्ये तालिबानी बंडखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून बचावल्यानंतर त्या पुन्हा मुलींच्या शिक्षणाच्या प्रसाराचं काम करु लागल्या.

गुरुवारी त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी एक छोटंसं भाषण दिलं. "पाकिस्तानला निर्भयपणे भेट देणं हे माझं स्वप्न होतं," असं त्या यावेळी म्हणाल्या.

इस्लामाबादच्या बेनझीर भुट्टो आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचं स्वागत झाल्याचं सर्वांनी पाहिलं. त्यांच्या अवतीभोवती सुरक्षा रक्षकांचं कवच होतं.

Image copyright EPA
प्रतिमा मथळा त्या चारदिवसीय पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.

"पाकिस्तानला भेट देणं हे माझं स्वप्न होतं. शांततापूर्ण वातावरण, निर्भयपणे रस्त्यावर फिरणं, लोकांना भेटणं, त्यांच्याशी गप्पा मारणं या सर्वं गोष्टी कराव्यात असं मला वाटत होतं. माझं स्वप्न पूर्ण झालं. मी तुम्हा सर्वांची आभारी आहे," असं त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं. त्यांचं हे भाषण टीव्हीवर प्रसारित झालं.

त्या पाकिस्तानच्या चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. मलाला फाउंडेशनचे सदस्य त्यांच्यासोबत प्रवास करणार आहेत.

त्या आपल्या जुन्या घरी जाणार आहेत की नाही याबद्दल अद्याप काही माहिती नाही. त्यांचं घर स्वात या भागात आहे. एकेकाळी या भागात तालिबानी बंडखोरांनी धुमाकूळ घातला होता.

खूप जणांनी मलाला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना पाकिस्तानची कन्या आणि पाकिस्तानचा अभिमान अशी विशेषणं देण्यात येत आहेत.

काही लोक मलाला यांचा तिरस्कार का करतात?

पाकिस्तानमध्ये त्या लोकप्रिय असल्या तरी त्यांचा तिरस्कार करणारा एक मोठा वर्ग आहे. जर दोन-एक वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानमध्ये येण्याचं ठरवलं असतं तर ते अशक्य वाटलं असतं. पण सध्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्या येऊ शकल्या.

आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे आणि इथलं जनजीवन सुरळीत सुरू आहे, असं पाकिस्तानच्या लष्कराला दाखवून द्यायचं आहे. मलाला यांच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे एक सकारात्मक संदेश गेला आहे.

जितकं आपण घरापासून दूर राहू तितकं टीकाकार आपल्याला लक्ष्य करतील हे मलाला यांना माहीत होतं.

त्यांना अनेक जणांचा पाठिंबा आहे, पण इथल्या पुरुषप्रधान समाजात अद्यापही अनेकांचं त्यांच्याबद्दल चांगलं मत नाही. मुलींच्या शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांना मान्यता देण्यास अनेकांना जड जातं.

मलाला या पाश्चिमात्य देशांचा अजेंडा पुढे रेटतात, असं इथल्या पुराणमतवादी लोकांचं म्हणणं आहे.

मुलींनी शिक्षण घेणं अत्यंत धोकादायक आहे असं या लोकांचं मत आहे. पाकिस्तानतल्या खेड्यांमध्ये मुलींचं शाळा सोडण्याचं प्रमाण खूप आहे. शाळा सोडून त्या घरकाम करतात. मलाला यांच्या विचारसरणीमुळे पुराणमतवाद्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मलाला यांनी थेट पुरुषी मानसिकतेलाच धक्का दिला आहे. त्यामुळे काही लोक त्यांचा तिरस्कार करतात.

मलाला यांच्यावर हल्ला का करण्यात आला होता?

वयाच्या 11व्या वर्षी मलाला बीबीसी उर्दूसाठी टोपणनावानं लेखमालिका लिहित होत्या. स्वात प्रांतातल्या तालिबानच्या वावरामुळे तिथलं जनजीवन कसं विस्कळीत झालं आहे, याबद्दल त्या लिहित असंत.

नंतर त्या मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार उघडपणे करू लागल्या. पंधरा वर्षांच्या असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यांकडे संपूर्ण जगाचं लक्ष गेलं.

Image copyright University Hospital Birmingham
प्रतिमा मथळा मलाला आपल्या कुटुंबीयांसह

मलाला युसूफझई या पाश्चिमात्य विचारसरणीचा प्रचार करत होत्या, त्यामुळं त्यांना आम्ही गोळी घातली असं स्पष्टीकरण तालिबानी बंडखोरांनी दिलं होतं.

त्यांच्यावर पाकिस्तानमधल्या लष्करी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. पुढच्या उपचारासाठी त्यांना इंग्लंडमधल्या बर्मिंगहममध्ये नेण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव त्या आणि त्यांचं कुटुंब लंडनमध्येच स्थायिक झालं.

मलाला यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान

त्यांची प्रकृती स्थिरावल्यानंतर त्या शाळेत जाऊ लागल्या आणि पुन्हा त्यांनी मुलींच्या शिक्षणाच्या पुरस्काराचं काम सुरू केलं.

त्यांच्या वडिलांसोबत त्यांनी मलाला फंड या ट्रस्टची स्थापना केली. जगातली प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे असं मलाला यांना वाटतं, हेच त्यांच्या ट्रस्टचं उद्दिष्ट आहे.

2014मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. या पुरस्काराच्या त्या सर्वांत लहान मानकरी ठरल्या. सध्या त्या मानवी हक्क संरक्षण आणि शिक्षणाच्या प्रसाराचं काम करत आहेत. तसंच त्या स्वतः ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेत आहेत.

पाकिस्तान अजूनही त्यांच्यासाठी असुरक्षित आहे का?

पाकिस्तानी लष्कराच्या प्रयत्नानंतरही तिथं पाकिस्तानी तालिबान अजूनही सक्रिय आहे. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये शाळा आणि कॉलेजवर हल्ले केले आहेत. त्यामध्ये शेकडो मुलांचे प्राण गेले आहेत.

पाकिस्तानमध्ये जाण्याची इच्छा मलाला यांनी वेळोवेळी व्यक्त केली होती. "मी ज्या प्रांतात राहत असे तो स्वात प्रांत म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग आहे," असं त्या म्हणतात.

"मला पाकिस्तानच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळाला आहे," असं त्यांनी नेटफ्लिक्सवर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं.

"लोकांना बदल हवा आहे. सध्या बदलाचे वारे आहेत. मी त्याच दिशेनं काम करत आहे, पण मला माझ्या मातृभूमीमध्ये जाण्याची इच्छा आहे."

जीन्स आणि हाय हीलचे शूज घालून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जातानाचं त्यांचं छायाचित्र सोशल मिडियावर गाजलं होतं. ही गोष्ट पाकिस्तानच्या पुराणमतवाद्यांना आवडली नव्हती. त्यांनी मलाला यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं होतं.

मलाला यांच्यावरील हल्ला प्रकरणात 2015 मध्ये न्यायालयानं दोन जणांना शिक्षा ठोठावली होती तर आठ जणांची निर्दोष सुटका केली होती. या प्रकरणातले मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)