स्टीव्हन स्मिथ : कोण होतास तू, काय झालास तू...

  • पराग फाटक
  • बीबीसी मराठी
ऑस्ट्रेलिया, स्टीव्हन स्मिथ, बॉल टेंपरिंग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्मिथची शतकं यंत्रवत झाली होती.

प्रतिब्रॅडमन अशी बिरुदावली मिरवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ अवघ्या काही तासात राष्ट्रीय खलनायक झाला. स्मिथच्या रोलरकोस्टर करिअरला लागलेलं हे अनपेक्षित वळण.

हा प्रसंग आहे 2011 वर्ल्डकपमधला. तारीख होती 16 मार्च. मॅच होती ऑस्ट्रेलिया-कॅनडा. कॅनडाच्या हरवीर बैदवाननं चेंडू जोरात टोलावला, पण तो हवेत गेला. कॅच म्हटल्यावर हरणासारखं पळणाऱ्या त्या मुलाचे डोळे लकाकले. जीवाचं रान करून तो मुलगा पळत सुटला.

मात्र त्याच्याआधी फिल्डिंगमधला दादा रिकी पॉन्टिंग त्या चेंडूखाली येऊन पोहचला होता. अफाट पळणारा तो मुलगा पॉन्टिंगवर हलकेच आदळला. पॉन्टिंगने कॅच नीट घेतला. मागे वळला आणि त्या मुलाच्या दिशेनं जळजळीत कटाक्ष टाकला आणि रागानं चेंडू जमिनीवर फेकून मारला.

तो मुलगा बावरुन गेला. विकेटचं सेलिब्रेशन करायला आलेले सहकारीही गोंधळले. त्या विकेटचं सेलिब्रेशन झालंच नाही. मॅच संपल्यानंतर पॉन्टिंगनं आक्रस्ताळ्या वर्तनासाठी माफी मागितली.

एकवीस वर्षांच्या त्या मुलाला आयुष्यभराची शिकवण मिळाली. भविष्यात आपण कर्णधार झालो तर असं वागायचं नाही याची. सळसळती ऊर्जा भरलेल्या 'त्या' पोरगेल्या मुलाचं नाव होतं- स्टीव्हन स्मिथ.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्मिथने प्रतिष्ठेचा अॅलन बॉर्डर पुरस्कार पटकावला तो क्षण.

पॉन्टिंगचं ते वागणं चुकीचंच होतं. पण आदर करावा असं स्मिथ काहीच करत नव्हता. तो अंतिम अकरात का होता याचंही ठोस उत्तर कोणाकडेच नव्हतं.

मेन बॉलर्सना विश्रांती मिळावी त्यावेळी तो 3-4 ओव्हर्स टाकायचा. विकेट मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तरी फारसं काहीच बिघडत नव्हतं.

बॅटिंगला यायचा ज्या नंबरवर पाठवतील त्या. आणि फारतर 20 धावा करून बाद व्हायचा. काहीतरी इनोव्हेटिव्ह खेळताना आऊट व्हायचा.

त्यानं विकेट फेकल्यानं काहीच फरक पडायचा नाही. ऑस्ट्रेलिया जिंकायचंच सवयीप्रमाणे. 'बिट्स एण्ड पिसेस प्लेयर' ही संज्ञा त्याला चपखल होती आणि जोडीला फाजील आत्मविश्वास होता.

शाळेत असल्यापासून या मुलाच्या खेळाची चर्चा व्हायची. 'नेक्स्ट बिग थिंग' असं काहींनी त्याचं वर्णनही करून ठेवलं होतं. कोणानंतर नेक्स्ट तर शेन वॉर्ननंतर.

वॉर्ननंतर ऑस्ट्रेलियाला फिरकीपटूचा शोध सुरू होता (तो आजही सुरूच आहे म्हणा...) तर स्मिथची स्पिन बॉलिंग पाहून हाच तो वॉर्नचा वारसदार असं पक्कं करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्टीव्हन स्मिथची गेल्या तीन वर्षातील आकडेवारी अचंबित करणारी होती.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

ब्राऊन रंगाचे भुरभुरणारे केस, चेहऱ्यावरचं मिश्कील हास्य, ऑस्ट्रेलियाच्या घोटीव सिस्टिमला साजेसं अॅथलेटिक बॉडीस्ट्रक्चर आणि संपूर्ण शरीरात असणारी सळसळती ऊर्जा- असा हा एकदम फंकी, 'यो-लुकिंग', तरणाबांड स्मिथ ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू झाला होता. वनडेत थोडंबहूत सगळ्याच गोष्टी करणाऱ्या स्मिथला 'बॅगी ग्रीन' कॅप देण्याचा क्षण येऊन ठेपला.

स्मिथचं नशीब किती भारी- क्रिकेटची मक्का अर्थात लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध त्यानं कसोटीत पदार्पण केलं- विशेषज्ञ फिरकीपटू म्हणून.

वेगात चेंडू टाकताना त्याला फ्लाइट देणं एवढ्यापुरतं त्याचं फिरकीचं कौशल्य मर्यादित होतं. वनडेत वेळ कमी असतो, पण टेस्टमध्ये फलंदाजांनी त्याला हेरलं. ऑस्ट्रेलियाच्या अटॅकमधली ही विक लिंक आहे हे जाणलेल्या फलंदाजांनी स्मिथच्या गोलंदाजीवर मनमुराद रन्स केल्या.

विशेषज्ञ स्पिनर असल्यानं तो आठव्या नंबरवर बॅटिंगला यायचा. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयात स्मिथचं स्पिनर म्हणून अपयश खपून जायचं.

हळूहळू हा प्रयोग फसायला लागला. बाहेरच्या चेंडूला बॅट लावणं, चेंडू हवेत उडवणं, आत येणाऱ्या चेंडूवर उडणारी त्याची त्रेधातिरपीट, स्थिरावल्यानंतरही सणकी पद्धतीनं विकेट फेकणं या सगळ्यामुळे बॅटिंगमध्येही तो अपयशी ठरत गेला आणि थोड्याच दिवसात सजग निवडसमितीनं स्मिथची गच्छंती केली.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्मिथचे चाहते जगभर पसरले आहेत.

नेक्स्ट बिग थिंग सोडा, तो अगदी पूअर थिंग बनला. पण ऑस्ट्रेलियन सिस्टम टॅलेंट वाया जाऊ देत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सीईओ जेम्स सदरलँड त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

स्मिथला जागतिक दर्जाचा स्पिनर करण्याचा प्रयत्न चुकल्याचं त्यानं मान्य केलं, पण स्मिथमध्ये जागतिक दर्जाचा बॅट्समन आहे हे त्यानं ओळखलं.

गोंधळलेल्या स्मिथला त्यानं मायकेल डिव्हेन्टोकडे सुपुर्द केलं. मार्क टेलर, मायकेल स्लेटर, मार्क वॉ यांची सद्दी असताना डिव्हेन्टो कधी येऊन गेला कोणाला कळलंच नाही.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये खोऱ्यानं धावा करणारा डिव्हेन्टो ऑस्ट्रेलियाचा वनडेचा बॅटिंग कोच आहे. त्यानं स्मिथच्या बॅटिंगला पैलू पाडायला घेतलं. नंतर या मिशनमध्ये ऑस्ट्रेलियाचा टेस्ट बॅटिंग कोच जस्टिन लँगरही सामील झाला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्टीव्हन स्मिथनं करिअरची सुरुवात बॉलर म्हणून केली होती.

बॅटिंगची सगळी तंत्रं घोटल्यानंतर प्रॉपर बॅट्समन म्हणून स्मिथला संधी देण्यात आली. घरच्या मैदानांवर अॅशेस मालिकेत त्यानं तीन शतकं झळकावली.

आगमनाची नांदी तर दणक्यात झाली. पण पुढचं आव्हान होतं दक्षिण आफ्रिका आणि मैदान त्यांचंच- सेंच्युरिअन. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर-जगातला बेस्ट अटॅक. बाऊन्सी पिच. स्वत:ला सिद्ध करायचं नाहीतर बाहेरचा रस्ता. पण त्यानं सिद्ध केलं शतकासह.

सुरुवातीला धडपडला, गोंधळला पण जगातल्या सर्वोत्तम गोलंदाजांसमोरही फलंदाज म्हणून उभा राहू शकतो हे त्यानं दाखवून दिलं. त्या दिवसापासून नुसतं टेस्ट नव्हे, वनडे, टी-ट्वेन्टी सगळीकडे स्मिथ धावांचा रतीब घालतोय.

पेस आणि स्पिन दोन्हीचा उत्तम फूटवर्कसह सामना करतोय. नियमित कर्णधार मायकेल क्लार्कला झालेल्या दुखापतीमुळे स्मिथकडे कॅप्टन्सी देण्यात आली. बाकी खेळाडू कॅप्टन्सीच्या ओझ्याखाली दबून जातात. स्मिथला स्फुरण चढलंय. कॅप्टन झाल्यावर तर आणखी दर्जेदार फलंदाज झालाय.

स्मिथच्या बॅटिंगचं वर्णन करताना प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले म्हणाले होते- "व्हेन स्मिथ इज बॅटिंग, देअर आर ऑन्ली गॅप्स." आधुनिक, मात्र त्याचवेळी विंटेज शैली असलेली स्मिथची बॅटिंग म्हणजे पर्वणी आहे. तासनतास नेट्समध्ये सराव हे स्मिथच्या यशाचं गमक आहे.

अपुऱ्या स्किल्समुळे पॅव्हिलियनमध्ये टिंगलटवाळीचा शिकार ठरलेला स्मिथ बघताबघता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार झाला. आणि हे त्यानं अविरत कष्टातून कमावलं आहे.

आजही त्याची बॅटिंग तंत्रशुद्ध वगैरे नाही. ऑफस्टंपच्या बाहेर उभा राहतो. बॉल खेळण्याआधी हेल्मेटला स्पर्श करतो. बॉलर जसा रनअप सुरू करतो तसा स्मिथ लेगस्टंपवरून सरकत ऑफस्टंपच्या बाहेर येऊन उभा राहतो. यादरम्यान किमान एकदा गुडघ्यात वाकून पुन्हा उभा राहतो. स्ट्रोक्स काय मारतोय यापेक्षा स्मिथच्या शरीराची होणारी हालचाल बॉलरला बुचकळ्यात टाकते. तुडतुड्या स्मिथनं टेक्स्टबुक बॅटिंगला नवा आयाम दिला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

स्मिथला आधुनिक ब्रॅडमन अशी उपाधी मिळाली.

या परिवर्तनाच्या काळात दोन माणसं स्मिथच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. स्मिथला क्रिकेटची धुळाक्षरं शिकवणारे ट्रेंट वुडहिल आणि त्याची बायको डॅनी विलीस. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्मिथ भरकटला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघातून बॉलर म्हणून वगळल्यानंतर पुन्हा परतण्याची शक्यता धूसर होती. पण त्यानं बदल घडवून आणला.

स्मिथची बॅटिंग लिजंड दर्जाची नाही. बॅटिंग करू शकणारा बॉलर या ओळखीतून तो बॅट्समन झाला हे विसरून चालणार नाही. स्वत:च्या खेळातल्या उणीवांची अचूक जाणीव असल्यानं सातत्यानं चुका सुधारत, नव्या गोष्टी पोतडीत टाकणारा विशेषज्ञ बॅट्समन ही त्याची ओळख झाली.

माइक हसीनंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंगची बैठकच हरवली होती. सगळेच दांडपट्टा चालवणारे. इनिंग उभी करणं, चांगल्या बॉलला सन्मान देणं, वाइट बॉलला चोपटवणं, भागीदारी रचणं, एकेरी-दुहेरी प्लेस करत धावफलक हलता ठेवणं या बेसिक गोष्टीच लोप पावत चालल्या होत्या. स्मिथ ती हरवलेली बैठक झाला. अशक्यप्राय सातत्य आणि जगभरात कठीण खेळपट्यांवर तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर स्मिथनं स्वत:ला सिद्ध केलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

जगातल्या सर्वोत्कृष्ट फिल्डर्समध्ये स्मिथची गणना होते.

गेल्या तीन वर्षांत स्मिथ दंतकथा वर्गात गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच आहे म्हणजे स्मिथ धावांची टांकसाळ उघडणार आणि मॅच जिंकून देणार हे समीकरण पक्कं झालं.

एखाद्या मशीनप्रमाणे टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 सगळीकडे स्मिथचा दबदबा होता. त्याची प्रत्येक रन नवनवा विक्रम रचत होती. हीच वैशिष्ट्यं जपणाऱ्या 'फॅब फोर' अर्थात विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन यांच्या पंक्तीत स्मिथ दाखल झाला.

बघता बघता त्यानं रूट आणि विल्यमसनला मागे टाकलं. वर्षातल्या 365 पैकी 310 दिवस खेळूनही स्मिथची धावांची भूक कमी होईना. स्मिथला आऊट कसं करायचं हे कोडं जगभरातल्या बॉलर्ससमोर होतं.

दिवसागणिक अचंबित करणाऱ्या प्रदर्शनामुळे स्मिथचे आकडे डॉन ब्रॅडमन यांच्या कामगिरीशी साधर्म्य सांगू लागले. आणि हे सगळं जेमतेम पाच वर्षांत घडलं होतं. ब्रॅडमन पुन्हा होणं नाही असं म्हणणाऱ्या तज्ज्ञांनी त्याला प्रति ब्रॅडमन असा टॅग दिला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

कर्णधार स्मिथसह त्याच्या पतीसह

स्मिथच्या झंझावातासमोर रेकॉर्ड शरण येत होते. रोलर कोस्टर राइडदरम्यान 'ब्रेनफेड' (भारताविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टदरम्यान स्मिथनं 'डीआरएस' अर्थात अंपायरच्या निर्णयाविरोधात दाद मागायची की नाही हे ड्रेसिंगरुममध्ये विचारलं) क्षणही येऊन गेला. माफी मागून स्मिथनं प्रकरण निस्तरलं.

ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोरावण्यात स्मिथचा दमदार फॉर्म निर्णायक होता. दक्षिण आफ्रिकेत वर्चस्व गाजवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ अवतरला. ही मालिका स्मिथच्या नेतृत्त्वाची कसोटी होती. खेळापेक्षा बाचाबाची चर्चेत होती.

जिंकण्यासाठीच्या अगतिकतेतून बॉल टँपरिंगचा प्लॅन रचण्यात आला. हा प्लॅन आपल्या स्वप्नवत वाटचालीला खोल गर्तेत नेऊ शकतो याची जाणीव कदाचित वर्ल्ड रेटिंगमध्ये नंबर वन स्थानी असणाऱ्या स्मिथला झाली नसावी. बॉल टँपरिंग कॅमेऱ्यात कैद झालं. पुढं काय घडतंय ते सर्वश्रुत आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मी चुकलो हे सांगताना स्मिथला अश्रू अनावर झाले. वडील त्याला आधार देताना

अक्षरक्ष: मजाकमध्ये सेंच्युरी लगावणाऱ्या, अॅवॉर्ड्स पटकावणाऱ्या, जेतेपदाच्या ट्रॉफी स्वीकारणाऱ्या स्मिथला वीस बाऊन्सर्सच्या गराड्यात एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे दक्षिण आफ्रिका सोडावं लागलं.

'मी चुकलो, मी उद्ध्वस्त झालोय, मला माफ करा' हे सांगताना कणखर स्मिथ ढसाढसा रडू लागला. त्यावेळी त्याच्या खांद्यावर वडिलांनी हात ठेवला. जगभरातल्या चाहत्यांच्या नजरेतून उतरल्याची खंत स्मिथच्या निळ्या डोळ्यात दिसत होती. जगभरातल्या बॉलर्सना स्मिथच्या बॅटरुपी तलवारीला रोखता आलं नाही. अखेर स्मिथनं स्वत: कर्मानंच ही तलवार म्यान केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)