इस्राईल-पॅलेस्टाईन : गाझा सीमेवरील गोळीबारात 16 जणांचा मृत्यू

इस्राईल-पॅलेस्टाईन Image copyright MOHAMMED ABED/AFP/GETTY IMAGES

गाझा-इस्राईल सीमेवर निदर्शनावेळी इस्राईलच्या सैन्यानं केलेल्या गोळीबारामुळे 16 जणांचा मृत्यू झाला, असं पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

सहा आठवड्यांच्या निदर्शनाला सुरुवात करणाऱ्यासाठी हजारोंच्या संख्येने निदर्शक सीमेकडे कूच करत होते. या विरोध प्रदर्शनाला 'ग्रेट मार्च ऑफ रिटर्न' असं नाव देण्यात आलं आहे.

पॅलेस्टिनी नागरिकांची ही निदर्शनं दक्षिण गाझाच्या खास यूनिस या शहरासमवेत पॅलेस्टाईन-इस्राईल सीमेजवळच्या पाच भागात आयोजित करण्यात आली आहेत.

"सीमेवरील अनेक भागांत दंगलसदृश्य परिस्थिती होती. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी दंगलखोरांवर गोळ्या चालवण्यात आल्या," असं इस्राईलच्या सैन्यानं सांगितलं आहे. हमास समूहातल्या भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं नंतर इस्राईलकडून स्पष्ट करण्यात आलं.

पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे पॅलेस्टिनी नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. "गोळीबारात मृत्यूमुखी पडली आहेत. त्याला इस्राईल जबाबदार आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

सहा आठवडे चालणाऱ्या या निदर्शनांसाठी पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या सीमेजवळ तंबू उभारले आहेत.

इस्राईलच्या सीमेजवळ जवळपास 17 हजार पॅलेस्टिनी नागरिक जमा झाले आहेत, असं इस्राईलच्या सैन्यानं म्हटलं आहे.

सैन्याच्या सोशल मीडिया चॅनेलनुसार, "दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणाऱ्या गर्दीला पांगवण्यासाठी गोळीबार करण्यात आला. यात दंगेखोरांना लक्ष्य करण्यात आलं. टायर जाळणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली आहे."

पॅलेस्टाईनच्या म्हणण्यानुसार, "गाझाच्या उत्तरेकडील जबालिया आणि दक्षिणेकडील रफाल शहराजवळ इस्राईल सैन्यानं केलेल्या हल्ल्यात अनेक पॅलेस्टिनी नागरिक जखमी झाले आहेत."

Image copyright JACK GUEZ/AFP/GETTY IMAGES

"निदर्शन सुरू होण्यापूर्वीच इस्राईलनं 27 वर्षांचा शेतकरी ओमर समूरला मारलं होतं," असं पॅलेस्टाईनच्या आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

"रणगाड्यांतून चालवण्यात आलेल्या गोळ्या ज्या दोन लोकांना लागल्या ते शेतात कोथिंबीर तोडायचं काम करत होते," असं बीबीसी गाझाचे प्रतिनिधी रुश्दी अबालूफ यांनी सांगितलं आहे.

Image copyright JACK GUEZ/AFP/GETTY IMAGES

'ग्रेट मार्च ऑफ रिटर्न' 30 मार्च शुक्रवारपासून सुरू झाला आहे. पॅलेस्टाईनमध्ये हा दिवस 'लँड डे' म्हणून साजरा करतात. 1976मध्ये याच दिवशी भूभागावर ताबा मिळावा म्हणून करण्यात आलेल्या निदर्शनात इस्राईलच्या सैन्यानं 6 पॅलेस्टिनी नागरिकांना ठार केलं होतं.

गाझा सीमेजवळ 'नो-गो झोन' बनवण्यात आला आहे. सुरक्षेची कारणं देत इस्राईलचं सैन्य नियमितपणे या क्षेत्राचं निरीक्षण करतं. या क्षेत्रात कुणीही पाऊल टाकायचं नाही, अशी ताकीद इस्राईलनं दिली आहे.

Image copyright REUTERS/MOHAMMED SALEM

"या निदर्शनात सहभागी होऊ नये म्हणून एका शेतकऱ्याचा जीव घेऊन इस्राईल पॅलेस्टिनी नागरिकांना भय घालू पाहत आहे," असा आरोप गाझा पट्टीवर कार्यरत असणाऱ्या पॅलेस्टिनी कट्टरतावादी संघटना हमासनं केला आहे.

"या निदर्शनाच्या माध्यमातून पॅलेस्टाईन जाणूनबुजून इस्राईलसोबतचा संघर्ष वाढवत आहे. तसंच कुठे काही दुर्घटना घडली तर त्यासाठी हमास आणि निदर्शनात सहभागी होणाऱ्या पॅलेस्टीनी संघटना जबाबदार राहतील," असं इस्राईलच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

Image copyright EPA/MOHAMMED SABER

निदर्शनासाठी पॅलेस्टिनी नागरिकांनी इस्राईलच्या सीमेजवळ पाच मुख्य कँप लावले आहेत. इस्राईलच्या सीमेजवळ असलेल्या बेत हनूनपासून इजिप्तच्या सीमेजवळील रफाहपर्यंत हे कँप पसरले आहेत.

Image copyright JACK GUEZ/AFP/GETTY IMAGES

15 मे रोजी हे निदर्शन समाप्त होईल. या दिवसाला पॅलेस्टिनी नकबा म्हणजे कयामत का दिन म्हणतात. 1948मध्ये याच दिवशी वादग्रस्त क्षेत्र असलेल्या इस्राईलची निर्मिती झाली होती आणि हजारो पॅलेस्टिनी नागरिकांना बेघर व्हावं लागलं होतं.

हे पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : मलाला यांना राजकारणात यायचं नाही. कारण...

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)