या 5 स्टेप्स ठेवतील तुमची फेसबुकवरची माहिती सुरक्षित

फेसबुक

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या आठवड्यांत झालेल्या फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर जगभरात अनेकांना चिंतेनं ग्रासलं आहे. त्यामुळे आपला खासगी डेटा किती सुरक्षित आहे आणि आपल्या परवानगीशिवाय हा डेटा अन्य कोणीही वापरू शकतं का, हे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ब्रिटिश कंपनी केंब्रिज अॅनालिटिकानं फेसबुकवरच्या 5 कोटी वापरकर्त्यांच्या खासगी माहितीचा वापर करून त्याचा डेटाबेस तयार केला होता. त्यांनी अमेरिकेतल्या निवडणुकांसाठी प्रामुख्याने हा डेटाबेस तयार केला होता. फेसबुक वापरकर्त्यांच्या प्रोफाईलवरून त्यांच्या आवडी-निवडची माहिती यात गोळा करण्यात आली होती. पण हे करत असताना या कंपनीनं फेसबुक वापरकर्त्यांकडे कोणतीही परवानगी मागितली नव्हती.

फेसबुक आणि गूगल स्टोर तुमच्या आवडी-निवडींबद्दलची माहिती त्यांच्याकडे राखून आहे, याबाबत कदाचित तुम्हाला माहीत असेल. मात्र, ते या माहितीचा कसा वापर करू शकतील याचा मात्र तुम्हाला अंदाजही नसेल.

डिजिटल सुरक्षेबद्दल जाणकार असलेल्या बर्लिनस्थित एका कंपनीकडून बीबीसीनं याबाबत माहिती घेतली. यात, आपली कोणती खासगी माहिती ऑनलाईन डेटाच्या रूपात ठेवली गेली आहे आणि जी माहिती आवश्यक नसेल ती डिलीट कशी करता येईल याबद्दल बीबीसीनं जाणून घेतलं.

1. फेसबुक प्रोफाईल व्यवस्थित ठेवणे

फेसबुकवर असलेली आपली सगळी माहिती आपण डाऊनलोड करू शकतो. यात आपले फोटो आणि खासगी संदेशांचाही समावेश आहे. ही माहिती डाऊनलोड करण्यासाठी सगळ्यांत आधी जनरल अकाऊंट सेटिंगमध्ये जाऊन त्यात 'डाऊनलोड ए कॉपी ऑफ युवर फेसबुक डेटा' या ऑप्शनवर क्लिक करावं. असं केल्यानं आपली सगळी माहिती आपल्याला ईमेलद्वारे मिळेल.

गुगल

फोटो स्रोत, Getty Images

तसंच, याचवेळी ज्या गोष्टींची आपल्या फेसबुक प्रोफाईलवर आवश्यकता नाही, त्या गोष्टी आपण अॅपमधून हटवू शकतो. तसंच, ज्या मोबाईल अॅप्सचा आपण वापर करत नाही, ते अॅप्ससुद्धा नक्की हटवावेत. तसंच, या अॅप्सना डिलिट करण्यापूर्वी त्यात आपली कोणती माहिती साठवली आहे हे नक्की पाहून घ्यावे. त्याशिवाय तुम्ही नसलेल्या फोटोंमधून स्वतःला अनटॅग करू शकता. असं करण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रोफाइलच्या अॅक्टिव्हिटी लॉगवर जाऊ शकता आणि कोणत्या फोटोंमधून स्वतःला अनटॅग करायचं हे ठरवू शकता.

2. गूगल तुमच्याबद्दलची कोणती माहिती जाणून आहे?

गूगल आपल्या आयुष्यात पूर्ण मिसळून गेलं आहे. आपण, रोज वेगवेगळ्या पद्धतीनं गूगलचा वापर करतो. ही गोष्ट गूगलही जाणून आहे. त्यामुळे गूगलवर आपली खासगी माहिती सुरक्षित राहील याची काळजी घेणं आवश्यक आहे.

यासाठी प्रथम आपल्या गूगल अकाऊंटवर लॉग इन करा आणि आपल्या फोटोवर क्लिक करा. त्यानंतर प्रायव्हसी चेकअप पेजवर जाऊन आपल्या खासगी माहितीला सुरक्षित करा.

गूगलवर जेव्हा आपण 'पर्सनलाईज युवर गुगल एक्सपिरियन्स' या ऑप्शनवर जाऊन तुम्ही तुमच्या खासगी डेटावर नियंत्रण ठेऊ शकता. मोबाईलवरच्या गूगलच्या अॅपवरूनही आपण या डेटावर नियंत्रण ठेऊ शकता.

गूगलकडे तुमच्याबद्दल नेमकी कोणती माहिती आहे, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर takeout.google.com या लिंकवर क्लिक करा.

3. लोकेशनच्या डेटाबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

जर तुम्ही स्मार्ट फोनचे वापरकर्ते असाल तर, या गोष्टीची जास्त शक्यता आहे की तुम्ही एखाद्या अॅपमार्फत लोकेशनची म्हणजे तुम्ही सध्या कुठे आहात, कुठे चालला आहात, कुठे-कुठे जाऊन आलात अशी महत्त्वाची माहिती उघड करत आहात.

आपल्या लोकेशनबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही पुढील टप्प्यांचा वापर करू शकता.

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

 • अॅनड्रॉईड : गुगल मॅप्सवर जा>मेन्यू>तुमची टाइमलाईन. त्यानतंर जी माहिती हवी असेल त्यावर जा.
 • आयफोन : सेटिंग्स>प्रायव्हसी>लोकेशन सर्व्हिसेस>स्क्रोलकरून खाली येऊन सिस्टम सर्विस निवडा>स्क्रोलकरून खाली येऊन फ्रिक्वेंट/सिग्निफिकंट लोकेशन हा पर्याय निवडा.

इतर कोणत्याही अॅपला तुम्हाला तुमच्या लोकेशनबाबतची माहिती द्यायची नसेल तर पुढील टप्प्यांचा वापर करा.

 • अॅनड्रॉईड - सेटिंग्स>अॅप्स>अॅप्स परमिशन>लोकेशन
 • आयफोन - सेटिंग्स>प्रायव्हसी>लोकेशन सर्विसेस>अॅपच्या सहाय्यानं लोकेशन नियंत्रित करा.

4. प्रायव्हेट ब्राऊझर्सचा वापर कसा करायचा?

ऑनलाईन शॉपिंग साईटवर काही खरेदी करताना आपल्याकडून नकळत अन्य पेजेसही उघडले जातात. या पेजेसवर आपण नकळत क्लिकही करतो. हे पेजेस दुसऱ्याच कोणत्या तरी कंपनीची असतात. या कंपन्यांकडे आपला डेटा साठवला जात असतो. आपण काय शोधतो आहोत, कोणत्या वेबसाईटवर जातो आहोत, आपण वापरत असलेला आयपी अॅड्रेस अशी सगळ्याच प्रकारची माहिती या कंपन्यांपर्यंत पोहचत असते.

या कोणत्याही ब्राऊझरमध्ये पहिल्यापासून प्रायव्हेट सेटिंग नसतात. बहुतेकांमध्ये कुकीजच स्टोर होतात आणि ब्राऊझिंग हिस्टरीही स्टोर होत असते. एवढंच नव्हे तर आपण ऑनलाईन काय लिहीत आहोत यांसह अन्य महत्त्वाची माहितीही यात साठवली जाते. ही माहिती त्यांच्याकडून इतरांना परस्पर दिली जाण्याची शक्यता अधिक असते.

सध्या गूगल, फायरफॉक्स आणि सफारी या ब्राऊझर्समध्ये गुप्तपणे ब्राऊझिंग करण्याची सुविधाही दिली आहे. यात आपली ब्राऊझिंग हिस्टरी, कुकीज, टेम्पररी फाईल आणि इतर माहिती ही आपोआपच डिलीट होत जाते.

यातल्या काही सेटिंग तुम्हालाही पडताळून पाहता येतील.

लॅपटॉप

फोटो स्रोत, Getty Images

 • तुमच्याकडे असलेला ब्राऊझर उघडा (फायरफॉक्स, क्रोम, क्रोमियम किंवा सफारी). त्यानंतर मेन्यूमध्ये जाऊन>न्यू प्रायव्हेट/इन्कॉग्निटो (गुप्त) या विंडोवर जा.

फायरफॉक्स किंवा सफारीमध्ये प्रायव्हेट सेटिंग करण्यासाठी पुढील टप्प्यांचा वापर करा.

 • फायरफॉक्स- मेन्यू>प्रेफरन्स>हिस्ट्री>आपल्या डेटाला नेहमीच प्रायव्हेट मोडवर ठेवा.
 • सफारी- सफारी ब्राऊझरच्या वरच्या बारवर जा>प्रेफरन्स>जनरल>सफारीला एका नव्या प्रायव्हेट विंडोवर उघडा.

5. स्वतःला विचारा : या अॅप्सची मला आवश्यकता आहे का?

तुम्हाला हे माहीत आहे का की तुमच्या मोबाईलमध्ये किती अॅप्स आहेत? एक अंदाज लावा आणि आपल्या मोबाईलमधले अॅप्स मोजा.

तुमच्या फोनमध्ये तुम्ही अंदाज केल्यापेक्षा जास्तीची अॅप्स आहेत? जेव्हा कधी आपण एखादं अॅप डिलीट करण्याचा विचार करतो, त्यावेळी कोणतं अॅप ठेवायचं आणि कोणतं नाही या द्विधामनस्थितीत आपण पडतो. त्यामुळे काही प्रश्न तुम्ही जर स्वतःला विचारले तर तुमची ही अडचण निश्चित दूर होईल.

मोबाईल

फोटो स्रोत, Getty Images

 • या अॅपची तुम्हाला आवश्यकता आहे का?
 • तुम्ही हे अॅप शेवटचं कधी वापरलंत?
 • या अॅपमध्ये कोणता डेटा स्टोर आहे?
 • हे अॅप कुठून सुरू होतं?
 • तुमचा या अॅपवर विश्वास आहे का? या अॅपच्या प्रायव्हेट पॉलिसीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
 • या अॅपमध्ये स्वतःबद्दलची सगळी माहिती दिल्यावर तुम्हाला कोणता फायदा झाला आहे?

या प्रश्नांची उत्तरं मिळाल्यावर तुम्ही काही अॅप डिलीट करण्यात नक्की यशस्वी व्हाल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)