रोहिंग्या ग्राऊंड रिपोर्ट : मायदेश पाच पावलांवर आहे, पण आम्ही परत का जावं?

  • अनबरासन एथिराजन
  • बीबीसी न्यूज, टोंब्रू चेकपॉईंट
रोहिंग्या मुस्लीम

बांगलादेश आणि म्यानमार सीमेवरच्या टोंब्रू चेकपॉईंटवर निर्मनुष्य भागात जवळपास 5000 रोहिंग्या मुस्लीम अडकून पडले आहेत. त्यांना आपल्या घराकडे परत जायचं असलं तरी म्यानमारच्या सैन्याच्या भीतीनं त्यांचा पाय पुढे सरकत नाही.

प्रदेश जरी निर्मनुष्य असला तरी लहान मुलांना हे चांगलं माहीत आहे की कुठे आणि कसं खेळायचं. ताडपत्रीच्या झोपड्या आणि उघड्यावर वाहणाऱ्या सांडपाण्यामधून वाट काढत लहान मुलं इथे हॅण्डपम्प आणि पाण्यशी खेळतात. तर, ज्येष्ठ जवळच बसून गप्पा मारण्याचं काम करतात.

पण, रोहिंग्या मुस्लिमांच्या या तात्पुरत्या घरांमागे टोकदार असं कुंपण असून या कुंपणामागे म्यानमारचे बॉर्डर पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत.

दिल मोहम्मद मात्र या कुंपणाकडे डोळे लाऊन बसले आहेत. एक दिवस त्यांना म्यानमार मधल्या त्यांच्या रखाईन प्रांतात परतता येईल अशी आशा त्यांना आहे. यातला मूळ विरोधाभास असा की, ते सध्या म्यानमारच्या हद्दीत असले तरी त्यांना चेकपॉईंटच्या या भागातून दुसऱ्या भागात जाता येत नाही.

ते एकटे नाहीत. या निर्मनुष्य भागात जवळपास 5000 रोहिंग्या मुस्लिमांनी आसरा घेतला आहे. बांगलादेश आणि म्यानमारच्या सिमेवर असलेल्या एका छोट्या पट्टीवजा भागात हा निर्मनुष्य भाग येतो.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रोहिंग्या मुस्लिमांच्या घरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर 7 लाख रोहिंग्या मुस्लिमांनी बांगलादेशच्या दिशेनं धाव घेतली होती. यात सगळ्यांत पहिल्यांदा पलायन केलेला गट या भागात स्थिरावला.

कॉक्स बाझारपासून 45 किलोमीटरवर (28 मैल) असलेल्या टोंब्रू चेकपॉईंटवर हा कॅम्प आहे. हा भाग बांगलादेशपासून एका कालव्यामुळे वेगळा झाला आहे. हा भाग मूळ म्यानमारच्या हद्दीत असला तरी कुंपणामुळे तो देशाबाहेर गेला आहे.

हद्दपार झालेल्या या रोहिंग्यांना अन्न आणि आरोग्याच्या सोयींसाठी बांगलादेशात जात येत असंल तरी म्यानमारमध्ये परतता येत नाही.

मला बांगलादेशी बॉर्डर पोलिसांच्या जवळपास चार मोठ्या चौक्या ओलांडून जाव्या लागल्या. पण, मला म्यानमारच्या या हद्दीत जाण्यापासून रोखण्यात आलं. म्हणून मग मला दिल मोहम्मद यांना आणि त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी बांगलादेशच्या हद्दीजवळ बोलवावं लागलं.

या कॅम्पमध्ये बांबू, प्लास्टिक ताडपत्रीच्या सहाय्यानं उभ्या केलेल्या झोपड्यांमध्ये हे रोहिंग्या मुस्लीम राहतात. राहण्यासाठी इथली परिस्थिती वाईट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेल्या हॅण्डपम्पच्या अवतीभोवती सांडपाणी पसरल्याचं दिसतं.

कॅम्पमधल्या नूरस्सान यावेळी म्हणाल्या, "माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर म्यानमारच्या लष्करानं हल्ला केल्यानंतर मी माझं गाव सोडून इथे पळून आले. या कॅम्पमधलं आयुष्य खडतर आहे. इथं उष्म्याचं प्रमाण खूप जास्त आहे. तसंच अन्न शिजवण्यासाठी लाकडं मिळवायलाही कष्ट पडतात. युनिसेफचे डॉक्टर केव्हातरी इथे येतात. त्याव्यतिरिक्त कोणत्याही आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाहीत."

कॅम्पमागील कुंपणावर एक टेकडी असून त्या टेकडीवर म्यानमार बॉर्डर पोलिसांची चौकी आहे. या कुंपणाच्या सभोवताली त्यांचा कडक पाहारा असल्याचं दिसतं.

"बॉर्डर पोलिसांची संख्या इथे जास्त आहे. अनेकदा ते भोंग्यावर मोठ्यानं घोषणा करतात आणि आम्हाला बांगलादेशच्या बाजूनं सरकण्यास सांगतात," असं मोहम्मद म्हणतात.

आम्ही जसे कालव्याच्या बाजूनं चालू लागलो, तसे म्यानमार बॉर्डर पोलिसांचे काही जवान एका ट्रकमधून आले. हे जवान कुंपणाच्या एका बाजूला बंदुका घेऊन सज्ज झाले. टेकडीवरील जवानही सतर्क झाले आणि आमच्या हालचाली न्याहाळू लागले.

गेल्याच महिन्यात या भागात तणाव निर्माण झाला होता. म्यानमारच्या सैन्याच्या संख्येत या सीमेवर अचानक मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्यांनी या कॅम्पमधल्या रोहिंग्यांना मागे सरकण्यास सांगितलं, अशी माहिती बांगलादेशी बॉर्डर गार्ड्सनी दिली.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

यावर स्पष्टीकरण देताना म्यानमार सरकारच्या प्रवक्त्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "अराकन रोहिंग्या मुक्ती लष्करी गटाचे काही संशयित रोहिंग्या जहालवादी या भागात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. यात आम्हाला बांगलादेशच्या विरोधात कोणतीही कारवाई करायची नव्हती."

म्यानमारच्या लष्करानं सैन्य मागे घेतल्यानंतर या भागातला तणाव निवळला होता. पण, या निर्मनुष्य भागात रोहिंग्या जहालवादी शिरल्याच्या मुद्द्यावर बांगलादेश बॉर्डर गार्ड्सनी मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

बांगलादेश बॉर्डर गार्ड्सच्या या विभागाचे कमांडर लेफ्टनंट कर्नल माँजूरुल हसन खान सांगतात, "गेल्या सहा महिन्यांत आम्ही जहालमतवाद्यांची कोणतीही हालचाल या भागात पाहिलेली नाही. आम्ही इथे फक्त निर्दोष मुलं आणि महिलाच पाहत आहोत."

बांगलादेश आणि म्यानमार या दोन्ही देशांत गेल्या वर्षी झालेल्या करारानुसार, या निर्मनुष्य भागातल्या रोहिंग्यांना म्यानमारमध्ये परत जाण्याची संधी प्रथम मिळणार आहे. मात्र ही परत जाण्याची प्रक्रिया सध्या थांबल्याचं दिसतं आहे. दोन्ही बाजूंनी रोहिंग्या मुस्लिमांबद्दल अधिक माहिती पुरवण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

बांगलादेशचे रेफ्युजी रिलिफ आणि रोहिंग्यांना परत पाठवण्याच्या विभागाचे आयुक्त मोहम्मद अबुल कलाम सांगतात, "अनेक प्रश्नांवर अजून उत्तरं मिळालेली नाहीत. रोहिंग्यांना सुरक्षित पाठवण्याची हमी आणि त्यांना ज्या भागात पाठवण्यात येणार आहे त्या भागाची माहिती अजूनही मिळालेली नाही."

बहुतांश रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमध्ये आपल्या घरी परतण्याची दुर्दम्य इच्छा आहे, पण भीतीही तेवढीच आहे. कॉक्स बाझारमधल्या बालूखाली रेफ्युजी कॅम्पमध्ये राहणाऱ्या संजिदा बेगम म्हणतात, "म्यानमार जर आम्हाला राष्ट्रीयत्वाची ओळख आणि स्वीकारणार असेल तरच आम्ही परत जाऊ. कारण, आम्ही जर परत गेलो आणि त्यांनी आम्हाला मारण्यास सुरुवात केली तर आम्हाला डोंगरात लपून राहण्याचा खेळ खेळावा लागेल. मग, आम्ही परत का जाऊ?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)