दक्षिण प्रशांत महासागरात कोसळलं चीनचं स्पेस स्टेशन

तिअॅगाँग - 1
फोटो कॅप्शन,

तिअॅगाँग - 1चे बरेच तुकडे वातावरणात जळून जातील.

चीनच्या बंद पडलेल्या स्पेस स्टेशनचे अवशेष सोमवारी पृथ्वीवर कोसळले

दक्षिण प्रशांत महासगरात या स्पेस स्टेशनचे अवशेष कोसळले आहेत. अमेरिकी आणि चीनी संस्थांनी ही घटना स्पष्ट केली आहे.

तिअॅगाँग - 1 हे स्पेस स्टेशन चीनच्या महत्त्वाकांक्षी अवकाश कार्यक्रमाचा भाग आहे. 2022मध्ये चीन अवकाशात सोडणार असलेला मानवी स्पेस स्टेशनचे हे प्रोटोटाईप आहे.

Twitter पोस्टवरून पुढे जा, 1

Twitter पोस्ट समाप्त, 1

2011 मध्ये या यानानं कक्षेत प्रवेश केला आणि 5 वर्षांनंतर ही मोहीम संपली. त्यानंतर ते पृथ्वीवर कोसळणार होते.

द चीन मॅन्ड स्पेस इंजिनीअरिगं ऑफिसनं सोशल मीडियावर म्हटलं होतं की, "सिनेमात दाखवतात तसं जोरदारपणे हे पृथ्वीवर कोसळणार नाही तर उल्कापात सारखं हे दिसेल."

संपर्क तुटला होता

या यानाशी संपर्क तुटल्याचे आणि त्यावर कोणतही नियंत्रण राहिलं नसल्याचं चीनने 2016मध्ये सांगितलं होतं.

ESA दिलेल्या माहितीनुसार, "43ºN आणि 43ºS या टप्प्यात हे यान कोसळेल असा अंदाज होता . विषुववृत्ताच्या दक्षिण आणि उत्तरचा मोठा भाग यामध्ये येतो."

ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर स्पेस इंजिनीअरिंग रिसर्चचे उपसंचालक डॉ. इलायस अबाऊटॅनिऑस बीबीसीला म्हणाले, "वातावरणात येताना याचा वेग वाढत जाणार जाईल. पृथ्वीपासून 100 किलोमीटर इतक्या अंतरावर आल्यानंतर ते पेट घेईल."

ते म्हणाले की या यानाचा बराचसा भाग पेट घेईल पण नेमका कोणता भाग शिल्लक राहील हे सांगता येणार नाही, कारण हे यान कशापासून बनलं आहे याची माहिती चीनने दिलेली नाही.

फोटो कॅप्शन,

तिअॅगाँग - 1चे 2011ला प्रक्षेपण करण्यात आलं

या यानाचं वजन 8.5 टन इतकं आहे आणि पृथ्वीच्या वातावरणात येताना त्याचे तुकडे होतील. पण रॉकेट इंजिन आणि इंधन टाकीसारखे भाग पूर्णपणे पेटून नष्ट होणार नाही.

अवकाशातील सर्व कचरा पृथ्वीवर कोसळतो का?

अबाऊटॅनिऑस म्हणाले, "अवकाशातील कचरा नेहमीच पृथ्वीच्या वातावरणात येत असतो एक तर तो हवेत जळून जातो किंवा माणसांपासून दूर महासागरात पाडला जातो."

सर्वसाधारणपणे अशा यानांशी संपर्क असतो आणि त्याचा कोसळण्याचा मार्ग नियंत्रित करता येतो. असा कचरा जमिनीपासून दूर ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आणि दक्षिण अमेरिकेच्यामध्ये दक्षिण पॅसिफिकमध्ये पाडला जातो. जवळपास 1500 चौरस किलोमीटरच्या या जागेत 260 अवशेष पडलेले आहेत.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)