परफेक्शनिस्ट व्हायचं आहे? आधी हे वाचा

  • अमांडा रुग्गेरी
  • बीबीसी
तरुण

फोटो स्रोत, Getty Images

माझी अगदी अलीकडची आठवण... मी चित्र काढत होते. मी नेमकं कशाचं चित्र काढत होते, हे मला नीटसं आठवतही नाही. पण मला माझ्या चुका ठळकपणे आठवतात. माझ्या हातातला मार्कर चित्र काढताना निसटला, आणि त्या चित्रात एक नको असलेली रेषा उमटली. नकळतपणे माझे ओठ चावले गेले. ते चित्र माझ्या मनातून कधीच पुसलं गेलं, पण ती उद्विग्नता-ती शरमेची भावना मनात आजही ठाण मांडून बसली आहे.

आणि आता असंच वारंवार होऊ लागलं आहे. काहीतरी क्षुल्लक घडतं आणि ती उद्विग्नता-शरमेची भावना पुन्हा-पुन्हा डोकं वर काढते. या गोष्टी किती क्षुल्लक असाव्यात? माझ्या प्रियकराच्या कुटुंबीयांना खास नाताळसाठी मी घरी बोलावलं होतं, त्यावेळी माझ्याकडून पॅनटनचा चुरा झाला, अगदी अपघाती. पण त्या प्रसंगाचे भूत माझ्या मानेवर बसले ते कायमचेच. (आपल्याकडे जशी होळीत पुरणपोळी खातात, तसाच इटलीमध्ये नाताळ या सणाला पॅनटन हा विशेष प्रकारचा सुका मेवा घातलेला पाव खातात.)

त्यातूनच पुढे, "किती वेंधळी आहे मी", "यापेक्षा जरा अधिक चांगली ओळख नाही का निर्माण करता येणार माझी" हे आणि असले विचार माझ्या मनाचा ताबा कधी घेत असत ते मला कळतही नसे. एखादं असाध्य उद्दिष्ट ठरवावं, जे कधीही पूर्ण करता येणार नाही याची खात्री असावी आणि तरीही ते पूर्ण करता न आल्यानं खच्ची व्हावं ही माझ्यासाठी नित्याचीच बाब झाली आहे.

"एखाद दिवशी तू या विषयावर पुस्तक लिहिशील याची खात्रीच होती मला," प्रकाशन क्षेत्रातील माझ्या मध्यस्थाने मला सांगितले. पण त्याचवेळी, "तुझ्या पुस्तकाचा विषय सध्याच्या वाचकांच्या मागणीला - बाजारपेठेला साजेसा नाही" असाही शेलका शेरा मारला. झालं. मला उन्मळून पडायला तेवढं पुरेसं होतं. मी पुस्तक लिहिणार या वाक्याने मला झालेल्या आनंदावर पुढच्या वाक्याने विरजण पडलं. इतकं, की ती नकारात्मक भावना आनंदापेक्षा जास्त प्रबळ ठरली.

"तू काही जन्मात पुस्तक लिहू शकणार नाहीस", माझ्या आतल्या आवाजने गळा काढला. "लेखक होण्यासाठी काही वेगळं लागतं, ते तुझ्यात नाही" माझ्या आतल्या आवाजाचा भडीमार चालू होता. खरं तर त्या आवाजाच्या हे लक्षातही आलं नव्हतं की त्याचं हे वाक्य माझ्या मध्यस्थाने सांगितलेल्या मूळ अभिप्रायाशी पूर्णपणे विसंगत होतं.

परिपूर्णतेच्या ध्यासाची ही खरी गोम आहे. तो कोणाचीच पत्रास ठेवत नाही, कसलीही तमा बाळगत नाही.

हा ध्यास अगदी तारुण्यात मनावर गारूड घालतो. आणि ही अलीकडे नित्याचीच बाब झाली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात ही बाब पुढे आली आहे. थॉमस कुर्रन आणि अँड्र्यू हील यांनी - रेटस् ऑफ पर्फेक्शनिझम फ्रॉम १९८९ टू २०१६ - या आपल्या अभ्यासाचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. परिपूर्णतेच्या ध्यासाची विविध पिढ्यांमधील तुलना करणारा हा पहिलाच अभ्यास प्रकल्प. हा अहवाल म्हणतो की, अमेरीका, युनायटेड किंगडम आणि कॅनडा या तीन देशांमधील पदवी शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये हा "रोग" वाढीस लागलेला दिसतो. १९९०च्या दशकातील किंवा २००० च्या दशकातील कोणत्याही पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा सध्याच्या विद्यार्थ्यांमध्ये परिपूर्णतेचा ध्यास खूप वाढला आहे.

"बाल्यावस्थेतील आणि किशोरावस्थेतील दर पाच मुलांपैकी दोघांना या ध्यासाने पछाडलेले पहायला मिळते", वेस्ट व्हर्जिनिया विद्यापीठात 'बालविकास व परीपूर्णतेचा ध्यास' या विषयावर संशोधन करणाऱ्या केटी रॅसम्युसेन यांनी आपले निरीक्षण नोंदवले. "या पछाडलेपणातून एका नव्या संक्रामक आणि सार्वजनिक आरोग्याला घातक अशा आजाराची आपल्याला लागण होते आहे की काय अशा चर्चा आता येथे सुरू झाल्या आहेत," इति केटी.

बरं परिपूर्णतेच्या या ध्यासामुळे प्रत्येक पिढी फारच कुशल, कर्तबगार किंवा तरबेज होते आहे का, तर तसेही चित्र दिसत नाही. उलट याचा अर्थ इतकाच की आपण अधिकाधिक आजारी, दुःखी-कष्टी होत आहोत आणि आपल्यातील क्षमतांना नाकारत आहोत.

क्लाऊडी मॉनेट, परिपूर्णतेच्या ध्यासाचं दुसरं नाव. पण अनेकदा आपला ताबा सुटल्यामुळे त्याने आपणच काढलेली अनेक सुंदर चित्रे टरकावली आहेत. माझं जीवन म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून केवळ अपयश आहे, असं मॉनेट एकदा म्हणाला होता. या गृहस्थाने एकदा तर चित्रप्रदर्शनात लावण्यासाठी काढलेली १५ चित्रे भावनेच्या भरात फाडून टाकली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

चित्रप्रदर्शनात लावण्यासाठी काढलेली १५ चित्रे भावनेच्या भरात फाडून टाकली होती.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

परिपूर्णतेच्या ध्यास म्हणजे तरी काय असतं? अखेर तोही या भवसागरातून वाटचाल करण्यासाठी स्वतःलाच पराभूत करणारा एक मार्ग असतो. टोकाची उपरोधिकता - विरोधाभास हा याचा आधार असतो. आधी एखादी कलाकृती निर्माण करा, मग चुका करणे हा मोठं होण्याचा अविभाज्य घटक आहे हे मान्य करा. त्यातून शिका. आणि सरते शेवटी आपणही माणूस असल्याचं पढवा... अशी ही वाटचाल.

या ध्यासाने आपल्या कारकिर्दीत, वेगवेगळ्या नात्यांमध्ये आणि एकूणच जीवनात आपली उन्नती होते हे खरंच. पण, वाट्टेल ती किंमत मोजून चुका टाळण्याचा हा ध्यास आपणच ठरवलेली असाध्य उद्दिष्ट अधिकच दुष्प्राप्य करतो.

परिपूर्णतेच्या ध्यासाचा खरा दोष हा की, सर्वात यशस्वी आणि कर्तबगार होण्यापासून तो आपल्याला मागे ओढतो. रोखतो. ही प्रवृत्ती अनेक भीषण आरोग्यविषयक समस्यांशी जोडली गेली आहे - नैराश्य आणि चिंता (अगदी लहान मुलांमध्येही दिसणारी), आत्मघात, सार्वजनिक स्थळांविषयी वाटणारी अकारण भीती, वारंवार येणारे नकारात्मक विचार व एकाच प्रकारच्या कृती वारंवार करण्याची खोड (OCD), अति खा-खा होणे, भूक मंदावणे आणि भूकेशी संबंधित विकार, अतिशय क्लेषकारक ताणतणाव, तीव्र मानसिक थकवा, निद्रानाश, तीव्र डोकेदुखी, संचयन करण्याची - दडवून ठेवण्याची प्रवृत्ती, अपचन आणि सगळ्यांत घातक म्हणजे लवकर येणारे मृत्यू किंवा आत्महत्या करावीशी वाटणे.

मानसिक आजारांचा, मनोविकारांचा विचार करता, परिपूर्णतेच्या ध्यासाइतकं घातक काहीही नाही, असं साराह एगन म्हणतात. एगन या सध्या पर्थ येथील कर्टिन विद्यापीठात सिनियर रिसर्च फेलो म्हणून काम करतात. पर्फेक्शनिझम, इटिंग डिसॉर्डर्स अँड अँक्झायटी (परिपूर्णतेचा ध्यास, भुकेशी संबंधित विकार आणि नैराश्य) या विषयात त्यांचा हातखंडा आहे. मनोविकार जडविणाऱ्या इतर गोष्टींच्या तुलनेत या ध्यासाइतकं दुसरं घातक काहीही नाही, साराह पुढे म्हणतात.

आपल्या संस्कारांचा भाग म्हणून परिपूर्णतेचा ध्यास या गोष्टीकडे आपण नेहमीच सकारात्मक नजरेने पाहतो. अनेकदा परिपूर्णतेचा ध्यास हीच माझी वृत्ती आहे, यांसारखे दावे स्वतःची प्रशंसा करण्यासाठी केले जातात. तुमचा स्वभावदोष काय, असा प्रश्न नोकरी मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराच्या मुलाखतीदरम्यान विचारला गेला तर उमेदवार लबाडीने - परिपूर्णतेचा ध्यास हाच माझा स्वभावदोष आहे, असली ठरलेली उत्तरेही देतात.

पण इथूनच गुंतागुंत वाढण्यास प्रारंभ होतो. इथूनच तो ध्यास हा वादग्रस्त ठरण्यास सुरुवात होते.

काही वेळा हा ध्यास सकारात्मक ठरतो तर काही वेळा हाच ध्यास पूर्णपणे नकारात्मक ठरतो. सुमारे १००० चिनी विद्यार्थ्यांचा या दृष्टीने अभ्यास केला गेला. तेव्हा हे लक्षात आले की दैवी देणगी लाभलेले विद्यार्थी हे सकारात्मक पद्धतीने ध्यास घेणारे असतात तर दैवी देणगीपासून वंचित असणारे विद्यार्थी मात्र नकारात्मक पद्धतीने हा ध्यास घेणारे असतात. म्हणजे नेमकं काय तर सदैव उत्तमतेचा ध्यास असणं हे सकारात्मक पद्धतीच्या ध्यासाचं उदाहरण झालं तर स्वतःची जराशी चूक झाली तरी आत्मप्रतिमा ढासळणं, स्वतःला मारणं ही किंवा अशी वागणूक म्हणजे नकारात्मक पद्धत झाली, असं संशोधक मानतात.

प्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचे विधान विचारात घेण्यासारखे आहे. तो म्हणतो, मी माझा खेळ उंचावण्याचा ध्यास नक्कीच घेतो मात्र कोणत्याही परिस्थितीत केवळ परिपूर्णतेचा ध्यास धरीत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

फूटबॉलपटू रोनाल्डो म्हणतो तो उत्तम होण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण होण्याचा नाही.

परिपूर्णतेचा ध्यास ही वृत्ती नाही तर हा तुमचा स्वतःकडे बघण्याचा, दृष्टीकोन असतो असं सेंट जॉन विद्यापीठाच्या अँड्र्यू हील यांना वाटतं. एखाद्या ध्येयाशी बांधिलकी असणं हे वाईट नाही. पण सकारात्मक ध्यास म्हणजे अशी व्यक्ती ज्यांच्यासाठी ही बांधिलकी हे लक्षण असतं. उलट, काही वेळा आपल्याला आपल्याला उत्तुंग ध्येयाऐवजी अवास्तव ध्येय ठेवलेली पहावयास मिळतात, ते घातक असतं, असं हील यांना वाटतं.

झपाटलेला कोण आहे आणि वेडा कोण आहे हे निव्वळ बाहेरून ठरवणं सोपं नाही, असं त्या म्हणतात.

९० गुणांची अपेक्षा असताना एखाद्या विद्यार्थिनीला समजा ६० गुण मिळाले आणि ती उदास होण्याऐवजी असं म्हणाली की कमी गुण मिळाले खरे पण म्हणून मी काही वाईट विद्यार्थी किंवा वाईट माणूस नाही तर ती सवय निश्चितच चांगली म्हणावी लागेल. पण याचाच अर्थ काढताना तिने जर मी म्हणजे अपयशाचं दुसरं नाव आहे असा संदर्भ लावला तर ते भीषण म्हणावं लागेल.

आपल्याला टेनिस स्टार आणि विक्रमवीर सेरेना विल्यम्स आठवतच असेल. ती स्वतःला परिपूर्णतेचा ध्यास असणारी म्हणवून घेत असे. तिने मैदानावर मोडलेल्या रॅकेटस्, व्यक्त केलेली चिडचिडही आपल्याला आठवत असेल. ही वृत्ती नकारात्मकतेकडे झुकणारी आहे. नकारात्मकरीत्या परिपूर्णतेचा ध्यास असणाऱ्या व्यक्तीला उत्तमतेच्या रस्त्यावरील प्रत्येच खाचखळगा दुखावत जातो आणि त्यामुळे ती व्यक्ती कोलमडण्याचा संभव असतो.

एकाच पद्धतीची ध्येये आणि उद्दिष्टे दोन्ही प्रकारच्या लोकांना देण्याचा प्रयोगही शास्त्रज्ञांनी करून पाहिला. तेव्हा लक्षात आलं की दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी केलेले प्रयत्न सारखेच, त्यांना मिळालेलं यश किंवा अपयशही सारखंच पण अपयश हाताळण्याची - पचविण्याची दोघांची क्षमता वेगवेगळी होती. स्वतःचा स्वीकार अधिक खुलेपणे करण्याची ताकद परिपूर्णतेचा ध्यास असलेल्यांमध्ये दिसली नाही, असे निरीक्षण अँड्र्यू हील यांनी नोंदवले.

फोटो स्रोत, Getty Images

परिपूर्णतेचा ध्यास आणि कामगिरीची आतुरता यांच्यात बरेच साम्य आहे, असेही काही संशोधन सांगते. सराव चांगला असेल तर कामगिरीची आतुरता वाढते, पण सरावातही अपयश येऊ लागले तर परिपूर्णतेचा ध्यास असणारी व्यक्ती कामगिरी करायचीच थांबते, ती व्यक्ती अशी स्पर्धा कायमची सोडून देऊ शकते. हा फरक लक्षात घेणं गरजेचं आहे.

आपण परिपूर्ण आहोत म्हणजे आपण कधीही अपयशी होणार नाही आणि आपण अपयशी होत नाही म्हणजेच आपण योग्य आहोत, ही धारणा घातक. उलट अपयश आलं तरीही आपली माणूस म्हणून असलेली मूल्य-धारणा जराही कमी न होऊ देणं, पराभव पचवणं, प्रसंगी दुसऱ्याच्या कामगिरीचं दिलदारपणे कौतुक करणं आणि तरीही चांगल्या कामगिरीचे प्रयत्न सुरू ठेवणं हे खरे सकारात्मकतेचे लक्षण. पण उलट झाल्यामुळे एका गर्तेत माणूस अडकतो.

अगदी शाळेपासून जेव्हा काही चांगलं केलं तर आणि तरच त्याचं कौतुक झालं पण काही वाईट झालं किंवा काही करू शकलो नाही तर त्याची हेटाळणी झाली की मग परिपूर्णतेच्या अपयशी गर्तेत माणूस अडकलाच म्हणून समजा.

कोणताही ध्यास हा खरा मानवी जीवन मुक्त करणारा, आनंद देणारा, उत्तम कलाकृतीची निर्मिती करणारा असायला हवा पण परिपूर्णतेचा ध्यास तसा दिसत नाही. आपल्यावर होणाऱ्या टीकेला करुणेने स्वीकारणं, ती पचवून पुढे जाणं, नव्याने मार्गक्रमण करणं हे परिपूर्णतेच्या नकारात्मक ध्यासात प्रतिबिंबित होत नाही. म्हणून मग म्हणावंसं वाटतं...

असाध्य ते साध्य, करिता सायास रोग शरीरास, जडतसे...

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)