फेसबुक बनत आहे डिजिटल स्मशानभूमी

  • ब्रॅडन अम्ब्रेसिनो
  • बीबीसी

लवकरच एका टप्प्यावर फेसबुकवर जितके जिवंत, सक्रिय युजर आहेत, त्यांपेक्षा मृत फेसबुक युजर्सची संख्या वाढणार आहे. होय हे अगदी खरे आहे. आपल्या जिवलगांच्या मृत्यूकडे आपण कसे पाहतो, हा कटू अनुभव कसे घेतो याचा दृष्टिकोनच बदलणारी ही घटना ठरते आहे.

काकू गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी तिने दिलेल्या शेक्सपियरच्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर तिने लिहिलेल्या सुंदर ओळी आठवल्या, त्या ओळी अशा होत्या,

"तुझ्यासाठी लिखित शब्दांचे मोल किती आहे हे मला माहिती आहे. म्हणूनच हीच माझी तुला भेट आहे."

नेहमीप्रमाणे तुझ्यावर लोभ आहेच,

जॅकी अँटी.

मी आतून हाललो, चटकन लॅपटॉप उघडला आणि नकळतपणे काकूचे फेसबुक पेज ओपन केले. तिचे काही फोटो बघून, तिच्या विनोदी, थट्टेखोर पोस्ट वाचून, त्या वाचताना तिच्या खास बाल्टीमोर खिंकाळणाऱ्या काहीशा उद्धट, कोडग्या शैलीत ती कशी बोलली असेल याची कल्पना करून मला थोडे बरे वाटेल असे वाटले होते.

तिच्या फेसबुकपेजवर सगळ्यात वर, एक व्हिडीओ होता - दोन हत्ती पाण्यात खेळतानाचा तो व्हीडिओ माझ्या चुलत भावाने पोस्ट केला होता. माझ्या काकूला हत्ती खूप आवडत. तिच्या घरभर हत्तीचे शोपीस हजारोंच्या संख्येने सजवलेले होते. त्याच्याखाली काकूच्या माजी विद्यार्थ्यांनी तिला दिलेली श्रद्धांजली तसेच तिच्या नणंदेने लिहिलेला मृत्यूलेखही होता.

डिजिटल अवकाशात आपले अस्तित्त्व कायम

मी वरच्या दिशेने स्क्रोल केले. फेसबुकवरील माहिती अनुसार, जॅकी काकूने 'फ्रॉस्टबर्ग स्टेट युनिव्हर्सिटी'तून इंग्रजीचे शिक्षण घेतले, ती बाल्टिमोर सिटी शाळेतली इंग्रजी विभागाची माजी प्रमुख होती आणि बाल्टिमोर, मेरीलँडमध्ये ती राहते. राहते ? मी विचार केला.

ती तर आता कुठेच राहत नाही, ती तर कायमची गेली.

पण जर तुम्ही फेसबुकचे तिचे प्रोफाइल पाहिले आणि स्क्रोल करून खाली आला नाहीत, तिच्यावरचा मृत्यूलेख वाचला नाहीत तर तिच्या जाण्याविषयी तुम्हाला कळणारही नाही. याचाच अर्थ ती आहे....इथे या फेसबुकवर तिचे अस्तित्व अजून आहे.

रात्रभर मी विचार करत होतो, मी आणि माझे कुटुंब काकू गेली तेव्हा तिच्या सोबतच होतो, अनेक मशीन्स, वायर यांनी तिला घेरले होते आणि अचानक तिला जाताना पाहिले..

ह्या प्रसंगाचे निरीक्षण करणे हा एक विचित्र अनुभव होता. ती तिकडेच होती, तुमचे जिच्यावर जिवापाड प्रेम होते- तिच्याशी तुम्ही बोलत असता, तिचा हात कुरवाळत असता, तुमच्यासाठी तिने खूप काही केले म्हणून तिचे आभार मानत असता, त्याचवेळी समोरच्या मशिनमधल्या नागमोडी रेषा हळूहळू कमी-कमी होताना दिसत असतात, अखेर त्यांची एकच सरळ रेष तयार होते- आणि एकाएकी काकू नाहीशी होते.

आणि त्याचवेळी आणखी एका मशिनमध्ये ती जिवंत असल्यासारखे वाटते. दूर कुठेतरी एका काँप्युटरच्या सर्व्हरमध्ये तिचे विचार, तिच्या आठवणी आणि तिचे नातेसंबंध सारे काही पूर्वीसारखेच आहे...तसेच आहे.

फेसबुक ही एक डिजिटल स्मशानभूमी होते आहे

डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमात, कुणी मृत्यूनंतरही आपले शारीरिक अस्तित्व कायम ठेवू शकत नाही हे अगदी उघड आहे, तरी एका अर्थाने ते अस्तित्व असते. तुम्ही जिवंत असल्याचा आभास, प्रोफाइलमुळे येत असतो. तुमची व्हर्च्युअल छबी लोक अनुभवत असतात आणि भविष्यातही ती अनुभवू शकतात.

डिजिटल अवकाशात आपले अस्तित्व कायम असल्यामुळे आपण ज्या पद्धतीने मृत्यूकडे पाहतो त्यात बदल होतो आहे का? आपण गेल्यावर आपल्या पश्चात शोक करत असलेल्या आपल्या प्रियजनांसाठी याचा अर्थ काय आहे?

फेसबुकवरील अशा मृत व्यक्तींच्या संख्येत वेगाने वाढ होते आहे. फेसबुक लाँच झाल्याच्या आठच वर्षांत, म्हणजे 2012 सालापर्यंत, मृत्यू झालेल्या फेसबुक खातेदारांची संख्या 30 दशलक्ष झाली आहे. तेव्हापासून या संख्येत वाढच होते आहे. दिवसाला 8 हजार युजर्स मृत्यूमुखी पडत असल्याचा दावाही एका अंदाजात करण्यात आला आहे.

येत्या काळात एक क्षण असा येईल की फेसबुकवर अशा मृत युजर्सची संख्या जिवंत असलेल्या युजर्सपेक्षाही अधिक असेल. म्हणजेच फेसबुक ही एक डिजिटल स्मशानभूमी होते आहे जिला थांबवणे आता शक्य नाही.

अनेक फेसबुक प्रोफाईलवर खातेधारक मृत झाल्याची, या व्यक्तीचे आता फक्त 'स्मरण' होऊ शकते, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे प्रोफाइल 'सदैव आठवणीत राहतील' अशा संदेशाने सजवण्यात आले आहेत आणि 'पिपल यू मे नो' किंवा 'वाढदिवसांचे रिमाइंडर्स' अशा फेसबुकच्या सार्वजनिक अवकाशात प्रकट होण्यापासूनही त्यांना रोखण्यात आले आहे.

पण मृत पावलेले सगळेच फेसबुक युजर्स अशा पद्धतीने स्मरणार्थ झालेले नाहीत.

आपला वारसा काय?

काही वर्षांपूर्वी माझ्या वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलाने, केरीने स्वतःची हत्या केली. त्याचे कुटुंबीय आणि त्याचे मित्रमंडळी नियमितपणे त्याच्या फेसबुक पेजवर पोस्ट शेअर करत असतात. आणि जेव्हा जेव्हा ते अशा पोस्ट टाकतात, माझ्या फेसबुक फीडमध्ये केरीचे प्रोफाइल नव्याने झळकते.

केरी किंवा माझी जॅकी काकी दोघांनाही अजूनही 'कायम स्मरणात राहतील' हा टॅग लागलेला नाही. म्हणजेच सर्व हेतूंनी किंवा संदर्भाने त्यांचा मृत्यू अद्याप फेसबुकने ओळखलेला नाही. किंवा अचानकपणे प्रोफाइलला भेट देणाऱ्यांनीही त्यांच्या जाण्याची नोंद घेतलेली नाही. त्यांचे डिजिटल अस्तित्व अजूनही कायम आहे.

सोशल मीडियाने आपल्याला प्रत्येक क्षणात किती ताकद आहे हे शिकवले आहे, म्हणूनच आपण आत्ता, ह्या क्षणी आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत कनेक्ट होत असतो. अनेकांच्या पोस्टवर रिअॅक्ट होत असतो.

काही पुरस्कार सोहळ्यांच्या, टीव्हीवरच्या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने, फुटबॉल सामन्यांच्या कारणाने, सामाजिक न्यायाच्या काही विषयांवर आणि असंख्य कारणांनी आपले मत फेसबुकवर नोंदवत असतो. परंतु आता हा विचार करण्याची वेळ आली आहे की, ह्यानंतर काय? आपला वारसा ?

काही प्रसिद्ध व्यक्तीच आपल्या माघारी आपला वारसा ठेवून जातात असे मानले जाते. असा वारसा ठेवणाऱ्यांच्या बाबतीत एक तर त्यांच्या वाडवडिलांनी लिखित स्वरूपात काही नोंदी ठेवलेल्या असतात किंवा नंतरच्या पिढीतील काही जिज्ञासू व्यक्तींनी हा वारसा मागे ठेवण्यासारखे कर्तृत्व गाजवलेले असते. पण डिजिटल तंत्रज्ञानाने ही वारशाची संकल्पनाच बदलून टाकली आहे.

आपण सगळेच प्रत्येक आठवड्याला जवळपास 12 तासाहून अधिक वेळ या माध्यमांवर खर्च करतो. एका सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. पण हा वेळ आपण फक्त आज खर्च करत असतो? एका अर्थाने आपण आपले चारित्र्यच तर लिहीत असतो.

डिजिटल आत्म्याचं अस्तित्व कायम

मी माझ्या आईला असे सांगतो की माझ्या नातवंडांना तिचे फेसबुक प्रोफाइल वाचून तिच्याबद्दल, म्हणजे त्यांच्या पणजीबद्दल माहिती मिळेल. समाजमाध्यमे कधीही पुसली जात नाहीत, हे गृहित धरले तर माझ्या आईच्या आयुष्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या घटनांची माहिती त्यांना फेसबुकसारख्या साइट्सवरच्या अधिकृत आत्मकथनावरून मिळेल.

पण इतकेच नाही तर तिच्या आयुष्यातील लहानात लहान बाबी, तिच्या दैंनदिन आयुष्यातील महत्त्वाचा तपशील : जसे की काही नकला ज्यांनी तिला हसवले असेल, व्हायरल फोटो जे तिने शेअर केले होते, तिला आणि माझ्या वडिलांना कोणत्या रेस्तरॉमध्ये जेवण करायला आवडायचे, काही भरभरून हसवणारे बाष्कळ विनोद अशा सगळ्या गोष्टी. आणि अर्थातच या सगळ्यासह पोस्ट केले जाणारे भरपूर फोटो. या सगळ्यांचा नीट अभ्यास केला की माझ्या नातवंडांना त्यांच्या पणजीबद्दलची जरा जास्तीच माहिती मिळेल नाही का?

सोशल मीडियावरच्या आपल्या वैयक्तिक नोंदी, माहिती एकप्रकारे आपला डिजिटल आत्मा असतो असे आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा माझे फेसबुक नियमित फॉलो करणाऱ्यांना माझे धार्मिक विचार, माझी राजकीय भूमिका, माझ्या सहचराबद्दलचे माझे प्रेम, माझी साहित्यिक पसंत सगळेच माहिती असेल. मी उद्या जरी मरण पावलो तरी माझा हा डिजिटल आत्मा अस्तित्वात असणारच.

गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांनी ही 'डिजिटल आत्मा' संकल्पना अधिक विकसित केली आहे. 2014 साली लाँच झालेल्या 'इटर्नी डॉट मी' (Eterni.me) ही वेबसाइट तुमची डिजिटल छबी तयार करण्याचे वचन देते. जी छबी तुमच्या मृत्यूनंतरही कायम राहणार असल्याचा त्यांचा दावा आहे.

या वेबसाइटवरची माहिती बघा- "आज ना उद्या मृत्यू तर अटळ आहेच. पण जर तुम्ही डिजिटल अवताराच्या स्वरूपात चिरंतन राहू शकलात तर...कारण या स्वरूपामुळे भविष्यात अनेकांना खरोखरच तुमच्या आठवणी, तुमच्या गोष्टी, तुमच्या कल्पना या सगळ्यांशी संवाद साधता येईल. तुम्ही जिवंत असताना जसे लोकांना तुमच्याबद्दलची माहिती मिळत होती तशीच माहिती या तुमच्या डिजिटल स्वरूपाकडून मिळणार आहे."

जर इटर्नी डॉट मी (Eterni.me) सारख्या योजना यशस्वी झाल्या तर माझ्या नातवंडांना फक्त माझ्या आईबद्दलची माहितीच मिळणार नाही. जर शक्य झाले तर ते माझ्या आईच्या डिजिटल अवताराला प्रश्नही विचारतील आणि त्यांची हुशार डिजिटल अवतारातली पणजी त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरेही देईल जी कदाचित मरणापूर्वी तिने तिच्या गोजिरवाण्या पतवंडांना दिली असती!

क्लोन केलेले माइंड मूळ आवृत्तीपेक्षा खरेखुरे

अनेक भविष्यवेत्ते भाकित करतात त्याप्रमाणे ही संकल्पना आणखी पुढचे टप्पा गाठू शकेल. विचार करा एका मार्टीन रोथब्लाट् नावाच्या उद्योगपतीने 'बिना 48' नावाचा रोबो बनवून घेतला. त्या रोबोचे दिसणे, मार्टीनच्या पत्नीच्या दिसण्याची हुबेहूब जुळते आणि भरीस भर म्हणून तिच्या बोलण्याची ढब, तिचे टिपीकल शब्द, तिच्या आठवणी यांचा डेटाबेस रोबोमध्ये फीड करुन ठेवला असेल तर काय होईल?

'व्हर्च्युअली ह्युमन' या पुस्तकाचे लेखक आणि युनायटेड थेरेप्युटीक्सचे सीईओ रोथब्लाट् हे ट्रान्सह्युमनिस्ट आहेत. त्यांचे ब्रीदच हे आहे की 'मृत्यू हा पर्यायी आहे.' रोथब्लाट् नजीकच्या भविष्यात असाध्य ते साध्य होणार असल्याचा दावा करतात. ते म्हणतात मृत व्यक्तीला प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने रिॲनीमेट करता येईल. यासाठी माइंड क्लोन सॉफ्टवेअरची मोलाची मदत होईल. या सॉफ्टवेअरमुळे, विचार करून प्रतिसाद देण्याचे कसब डिजीटल अवताराला प्राप्त होणार आहे. इतकेच नाही तर हा अवतार क्लोनिंग करत असलेल्या व्यक्तीच्या वर्तणुकीशी साध्यर्म साधणारा असणार आहे.

'वास्तव' या संकल्पनेबाबत त्याचे मत विचारले असता रुथब्लाट् एकदा म्हणाले होते की हे क्लोन केलेले माइंड आपल्या मूळ आवृत्तीपेक्षा अधिक खरेखुरे ठरणारे असतील. याचे तात्पर्य काय तर मृत्यूपश्चात मागे राहिलेल्या जिवलगांसोबत आपण प्रत्यक्ष नसलो तरी एका वेगळ्या स्वरूपात उरणार असू तर मृत व्यक्तीच्या जाण्याच्या शोक बदलेल?

एलिसाबेथ कुब्लर-रॉस यांच्या 'ऑन डेथ अँड डाईंग' या 1969 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकात दुःखाबाबत एक अंतिम सत्य म्हणता येईल अशा अर्थाचे एक वाक्य आहे, ज्यात दुःख पचवण्याचे पाच टप्पे असतात असे त्या म्हणतात. ते टप्पे आहेत- नाकारणे, राग व्यक्त करणे, घासाघीस करणे, निराश वाटणे आणि अखेरचा टप्पा म्हणजे स्वीकारणे. हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यापासून, नव्या जमान्याच्या अभ्यासूंनी वरील दाव्याच्या मध्यवर्ती संकल्पनेवरच टीका केली आहे. त्यांच्या मते मागे राहिलेले प्रियजन मृत व्यक्तीला जाऊ देतात व आपलेली आयुष्य हळूहळू पुढे नेतात.

डिजिटल डेटा आपल्याला विसर पडू देत नाही

आज अनेक समुपदेशक मृत व्यक्तींच्या प्रियजनांचे दुःख हलके करताना त्यांची समजूत घालतात की त्यांचे जिवलग गेल्यावरही या ना त्या स्वरूपात त्यांच्याबरोबर राहणारच आहेत. त्यांचे नाते जरी बदलणार असले त्या व्यक्ती त्यांच्या आयुष्यात असणारच आहेत याची त्यांना जाणीव करून देतात.

मात्र कितीही झाले तरी दुःखाचा डोंगर कोसळल्यावर त्यातून सावरून पुढे जाणे गरजेचेच असते. काही मागील गोष्टी विसरणेही क्रमप्राप्य असते. आपल्या प्रियजनांना विसरणे तर अशक्यच असते मात्र या ठिकाणचे त्यांचे अस्तित्व विसरावेच लागले. आणि आपल्या धाडसी, नव्या जगाने नेमके हेच तर हेरले आहे : डिजिटल डेटा आपल्याला कसलाही विसर पडू देत नाही.

2009 साली प्रकाशित झालेल्या 'डिलीट : द व्हर्च्यु ऑफ फरगेटींग इन द डिजिटल एज' या पुस्तकत लेखक व्हिक्तोर मेयर-स्कोनबर्जर लक्षवेधी दावा करतात. मानवी जीवनात मध्यवर्ती असलेली विस्मृतीत जाण्याची क्षमता कमालीची आहे.

या विस्मृतीत जाण्यामुळे- अर्थात कालांतराने काही गोष्टींचा विसर पडण्यामुळे आपण 'काळाप्रमाणे वागू शकतो आणि भूतकाळाची जाणीव असूनही भूतकाळाच्या पाशात अडकून राहत नाही. लेखक म्हणतो, "विस्मृतीत जाण्याच्या क्षमतेमुळेच आपण जगू शकतो आणि वर्तमानात ठामपणे जगू शकतो"

मेयर-शोनबर्जर 'द मेमोरियस' या लघुकथेतील फ्युन्स या पात्राचा संदर्भ देतात. जॉर्ज लुईस बॉर्जेस यांच्या कथेतील हे मुख्य पात्र एका दुर्दैवी अपघाताला बळी पडते आणि विस्मृतीची क्षमता हरवून बसते. फ्युन्सला त्याने वाचलेले प्रत्येक पुस्तक, त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, या दिवसातील प्रत्येक बारकाव्यासह लख्ख आठवतो.

'माझी बुद्धिमत्ता म्हणजे जणू कचऱ्याचा ढिगारा आहे'

पण त्याचे हे न विसरण्याचे वरदान त्याला आता शाप ठरते आहे. 'माझी बुद्धीमत्ता म्हणजे जणू कचऱ्याचा ढिगारा आहे,' अशी कबुली तो देतो. त्याचे नावही मोठे सूचक आहे, फ्युन्स म्हणजे कमनशिबी. हाच धागा पकडून लेखकाने असे पात्र रंगविले आहे की फ्युन्सविषयी अतीव कणव दाटून येते.

डोना मिलर वॉट्स याविषयी लिहितात, "फ्युन्स म्हणजे नाखुषीने साठवणारा, मनाच्या अडगळीचा बळी ठरलेला माणूस आहे." अखेरीस तो त्याच्या मनाच्या शब्दांमध्येच हरवून जातो, गोष्टींचे आकलन करून त्यांचे महत्त्वाच्या गोष्टी आणि सामान्य असा भेद करण्यास तो असमर्थ ठरतो कारण "कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे किंवा फरक कसा करायचा हा विचारच त्याच्यापुरता संपतो."

वॉट्स यांना फ्युन्सच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगाने एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते, "अतिमोठ्या प्रमाणात असलेली माहिती सध्या डिजिटल नेटमध्ये जमा झाली आहे. ज्या माहितीचा विसर पडणे कदापि शक्य नाही." लेखक मेयर-शोनबर्जर म्हणतात ते ही खरेच, "यातून हा धडा मिळतो की आपल्या स्मृतींना अधिक चांगल्याप्रकारे आठवण्याच्या नादात आपण आपल्याच आठवणीत अडकू शकतो, ज्यामुळे भूतकाळाला मागे टाकणे केवळ अशक्य होते."

डिजिटल तंत्रज्ञान याच विस्मृतीला मारक ठरते आहे. हे तंत्रज्ञान आपल्याला मृत्यू पावलेल्या व्यक्तींना लक्षात ठेवायला भाग पाडते. हा त्यांचा जणूकाही सूड आहे जो त्या व्यक्ती गेल्यावरही त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याला झपाटून टाकतो.

पूर्वी गेलेल्या माणसांचे स्मरण करण्यासाठी काही थेट कृतीची गरज असायची. त्यांच्याबद्दल आदर दाखवण्यासाठी तुम्हाला कुठेतरी जावे लागायचे : दफनभूमी, चर्चमध्ये किंवा त्यांच्या स्मारकाजवळ. किंवा त्यांच्या फोटोंचा बॉक्स वा अल्बम वा मृत्युलेखाच्या कात्रणांचा आधार घ्यावा लागायचा. आत्ताच्या क्षणापासून काही उसंत घेऊन तुम्हाला तुमचा भूतकाळ, तुमचा इतिहास किंवा तुम्ही त्या व्यक्तीबरोबर घालवलेला वेळ याचा विचार करायला सवड काढावी लागत असे.

मात्र फेसबुकवर या सर्व जागा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आहेतच आणि जो वेळ लागणार आहे तोही आत्ताचा क्षण आहे. ज्याप्रमाणे मी फेसबुकवर आहे त्याचप्रमाणे जॅकी काकुचेही या माध्यमात अस्तित्त्व आहे. तिच्याशिवाय, तिला टाळून पुढे जाणे शक्यच नाही असेही म्हणता येईल. खरेतर फेसबुकवरील अशा लाखो मृत व्यक्तींना टाळून पुढे जाणेच शक्य नाही.

डेटा किंवा डिजिटल भूतांचे काय करायचे?

मी आत्तापर्यंत ऐकलेल्या अनाकलनीय गोष्टींपैकी सर्वात गूढ गोष्ट म्हणजे सर्कशीत काम करणाऱ्या डूबी या विदुषकाने सांगितलेली गोष्ट. स्टेजवर सादरीकरणाला जाण्यापूर्वी त्याने एक व्हॉइसमेल ऐकला. तो मेल त्याच्या मरणासन्न अवस्थेतील आजोबांचा होता. "तुझ्यावर माझे खूप प्रेम आहे आणि मी तुझ्याशी नंतर बोलेन." असे आजोबा त्या मेलमध्ये म्हणाले. पण वेळेचा खेळ असा काही झाला की डूबीने तो आवाज ऐकेपर्यंत त्याचे आजोबा खरोखरच देवाघरी गेले होते.

काय दैवदुर्विलास पाहा, विदूषक खरे तर एका मृत माणसाचा आवाज ऐकत होता - मृत्यूची, काळाची ही थट्टा- जॅकी काकूचे फेसबुक प्रोफाइल पाहतांना माझी झालेली अवस्था कदाचित मीही याच शब्दात मांडू शकेन. मी ज्या डिजिटल अवकाशात आहे तिथे तिचेही अस्तित्त्व आहे पण मला माहिती आहे ती आता या जगात नाही.

काही अनुचित घटना घडणार असेल तर त्याची हूरहूर लागण्याच्या भावनेला आपण 'पूर्वसूचना' असा शब्द वापरतो. 'इशारा' वा 'समज' या अर्थाने आपण हा शब्द वापरतो. पण मृत फेसबुक युजर्सच्या प्रोफाइलवर अचानक नजर गेल्यावर निर्माण होणारी भावना काहीशी वेगळी आहे. मोठा फरक आहे' दोन्हींमध्ये. फेसबुकवर असे प्रोफाइल पाहिले की वाटते, एका विशिष्ठ वेळी काही अघटित घडणार आहे. आपल्या मृत्यूचीच ती वर्दी असल्यासारखे वाटते. आपल्याला आधीच आपल्या मृत्यूची अप्रत्यक्ष सूचना मिळाल्याचे ते रिमाइंडर असल्यासारखा भास होतो.

अजून तरी या डेड डेटा किंवा डिजिटल भूतांचे काय करायचे यावर उपाय सापडलेला नाही. इंटरनेटची मेमरी, त्यातली साठवणही एका क्षणी धूसर होत जाईल अशी एकमेव आशा आहे.

आणि बोर्जेसने लिहिलेल्या ओळींची खात्री वाटू लागते. तो लिहीतो,"खरे सत्य हे आहे की आपण सगळेच काही मागे ठेवूनच जगत असतो."

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
व्हीडिओ कॅप्शन, सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)