मुलाला सांभाळण्यासाठी तिने जमिनीवर बसून दिली परीक्षा

फोटो स्रोत, Shaharzad Akbar / TWITTER
आपल्या लहान बाळाला सांभाळत प्रवेश परीक्षा देणाऱ्या एका अफगाणी महिलेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर या महिलेचं कौतुक झालं असून तिला आर्थिक मदतही प्राप्त झाली आहे.
जहान ताब या 22 वर्षीय युवतीनं आपल्या दोन महिन्यांच्या मुलाला सांभाळत परीक्षा दिली. यावेळी तिचं मूल रडत असतानाही तिनं आपल्या परीक्षेवर लक्ष दिल्याबद्दल सगळ्यांनाच तिचा हेवा वाटला. यावेळी मूल मांडीवर नीट ठेवता येण्यासाठी ती जमिनीवर बसली आणि खाली ठेवून पेपर लिहू लागली.
अफगाणिस्तानातल्या डेकुंडी प्रातांतल्या ग्रामीण भागातल्या ओश्तो या गावात जहान रहाते. या गावापर्यंत कोणतीही सार्वजनिक परिवहन सेवा पोहोचत नाही. तसंच, ज्या केंद्रावरून तिनं परीक्षा दिली ते केंद्र तिच्या घरापासून किमान 7 तास दूर आहे.
अफगाणिस्तानच्या निली शहरातल्या 'नासिरखोसरॉ हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट'मध्ये प्रवेश घेण्यासाठी दिलेल्या प्रवेश परीक्षेत जहान पास झाली आणि तिच्या कष्टाचं चीज झालं.
समाजशास्त्राचा अभ्यास तिला करायचा असून त्यासाठी पैसे मिळतील अशी तिला आशा आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी तिला 10 ते 12 हजार रुपये खर्च येणार आहे.
जहानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर UKमधल्या अफगाण युथ असोसिएशन (AYA) या संस्थेनं तिला महाविद्यालयात प्रवेश देण्यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे.
'अपेक्षेपेक्षा जास्त'
अफगाण युथ असोसिएशनचे अध्यक्ष परवेझ करिमी यांनी याबाबत बीबीसीशी संवाद साधला. करिमी सांगतात, "जहानपासून अफगाणिस्तानातल्या अन्य महिलांनी प्रेरणा घ्यावी. अफगाणिस्तानात महिलांना पुरुषांएवढी किंमत नाही. इथल्या पालकांना आपल्या मुलांनीच शिक्षण घ्यावं असं वाटतं."
करिमी पुढे सांगतात, "आपल्या लहान मुलाला सांभाळत प्रवेश परीक्षा देणं हे अपेक्षेपेक्षा जास्तच आहे. ती अनेक आव्हानं पार करत या परीक्षेपर्यंत पोहोचली आहे."
(UGC आणि सोशल न्यूज टीमच्या क्रिस ब्रॅमवेल यांनी दिलेल्या माहितीवरून)
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)