कॉमनवेल्थ गेम्स : खेळाडूंसाठी 1 लाख काँडोमची व्यवस्था

  • रेहान फजल
  • बीबीसी प्रतिनिधी, गोल्ड कोस्ट

4 ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट या शहरात इतिहास रचला जाणार आहे. या दशकातील सर्वांत मोठ्या क्रीडा उत्सवासाठी शहर सजलेलं आहे.

गोल्ड कोस्ट 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत राष्ट्रकुलातल्या 71 देशांतले 6600पेक्षा जास्त जण सहभागी झाले आहेत. यामध्ये खेळाडूंसह आलेल्या त्या त्या देशातल्या विविध अधिकाऱ्यांचाही यात समावेश आहे.

गोल्ड कोस्ट शहरातलं खरं आकर्षण आहे ती म्हणजे इथली 322 मीटर उंचीची क्यू-1 स्काई पॉईंट ही इमारत. ही जगातली सहाव्या क्रमांकाची सर्वांत उंच रहिवासी इमारत आहेत. कडक सुरक्षा यंत्रणा पार करून तुम्ही जेव्हा या इमारतीत प्रवेश करता तेव्हा 77व्या मजल्यावर लिफ्टनं पोहचण्यासाठी फक्त 43 सेकंद लागतात.

अर्थात तिथं पोहोचताना तुमच्या कानाला दडे बसलेले असतात आणि तुमचा रक्तदाब वाढलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही खाली पाहाता तेव्हा तुमचे डोळे विस्फारले जातात.

360 डिग्रीमध्ये जेव्हा तुम्ही पूर्ण शहर पाहतात तेव्हा पूर्ण शहराचं दृश्य पाहून तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाता. एकीकडे प्रशांत महासागराचे निळंशार पाणी आणि दुसरीकडे गोल्ड कोस्टमधल्या एकापेक्षा एक गगनचुंबी इमारती. या विहंगम दृश्यामुळे तुम्ही या शहराच्या प्रेमात पडता.

दुबईतली बुर्ज खलिफा, अमेरिकेतली वन वर्ल्ड सेंटर, मलेशियातली पेट्रोनस टॉवर आणि अमेरिकेतल्या एंपायर स्टेट बिल्डिंगनंतर स्काय पॉइंट ही जगातली सर्वांत उंच रहिवाशी इमातर आहे.

तुम्ही या इमारतीत काचांनी घेरलेले असता. पण इथं तुमचे पाय लटपटू लागतात आणि तुमचे हात रेलिंगला पकडण्यासाठी सरसावतात. इथं खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था आहे. या इमारतीमध्ये 78 मजले आहेत. पण शेवटचा मजला पाहण्यासाठी खुला करण्यात आलेला नाही.

इथं खासगी पार्ट्या आणि खासगी समारंभ आयोजित केले जातात. 1998ला या इमारतीची पायाभरणी करण्यात आली. ही इमारत बांधून पूर्ण होण्यासाठी 7 वर्षं लागली. 2005ला या इमारतीचं उद्घाटन झालं. या इमारतीच्या 77 व्या मजल्यावर पोहोचण्यासाठी 25 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे जवळपास 1200 रुपयांचे तिकीट घ्यावं लागतं.

भारतीय बॉक्सिंगपटूंची डोप टेस्ट

दोन दिवसांपूर्वी भारतीय खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असलेल्या अपार्टमेंटबाहेर सीरिंज सापडल्यानंतर भारताच्या काही बॉक्सिंगपटूंची डोपिंग टेस्ट घेण्यात आली. भारतानं या सीरिंजचा भारतीय खेळाडूंशी संबंध नाही, असा खुलासा केला आहे.

परंतु राष्ट्रकुल फेडरेशनचे प्रमुख डेव्हिड ग्वेवनबर्ग यांनी 4 भारतीय खेळाडूंच्या लघवीची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी सिरिंज मिळाले होते तेथून या खेळाडूंचं निवासस्थान अगदी जवळ होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर भारतीय बॉक्सिंगपटूंची ही चाचणी घेतली जाणार आहे.

या सीरिंजीची तपासणी सुरू असून लवकरच अहवाल येणार आहे. पण भारतीय पथकानं ही तपासणी नेहमीची प्रक्रिया असून याचा सीरिंजशी काही संबंध नाही, असा खुलासा केला आहे.

या प्रकरणामुळे अस्वस्थ झालेले भारतीय शेफ डे मिशन विक्रम सिसोदिया यांनी खेलग्राममध्ये उपस्थित सर्व खेळाडूंची बैठक घेतली. देशाची बदनामी होईल, असं कोणतही कृत्य करू नये, अशा सूचना त्यांनी दिली आहेत.

कसं आहे गोल्ड कोस्टमधील खेलग्राम?

दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी जेवढं मोठं खेलग्राम होतं तेवढं मोठं हे खेलग्राम नाही. इथं खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी 1, 2 आणि 3 बेडरूमच्या 1257 अपार्टमेंट बनवण्यात आल्या आहेत. इथं 6500 जणांची राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. हे खेलग्राम 29 हेक्टर इतक्या जागेवर पसरलं आहे.

खेळाडूंच्या सुविधेसाठी इथं 24 तास कार्यरत असलेले हॉस्पिटल आहे. याशिवाय इथं अत्याधुनिक जीम आणि फिजिओथेरपिस्ट आहेत. जगभरातून आलेल्या खेळाडूंसाठी तब्बल 1 लाख काँडोमची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. म्हणजे एका खेळाडूला सरासरी 16 काँडोम मिळणार आहेत.

खेळग्रामला लागूनच हेअर सलून आणि ब्युटी पार्लरची सुविधा सुद्धा आहे.

आम्ही जेव्हा इथं पोहचलो तेव्हा भारतीय खेळाडू नैना जेम्स फेशियल करून घेत होती. इथं बाजूला असलेल्या ज्यूस बारमध्ये बरेच भारतीय आणि कॅनडातल्या खेळाडूंची गर्दी दिसत होती.

जेवणासाठी मोठा डायनिंग हॉल असून तिथं जगातली सर्व व्यंजन मिळण्याची व्यवस्था आहे. सुरुवातीला इथं भारतीय जेवण नव्हतं. यावर तक्रार झाल्यानंतर भारतीय जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

भारतीय संघाला स्वयंपाकी आणण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. स्वच्छता कर्मचाऱ्यांना दररोज 3,400 चादरी, बेडशीट आणि पिलो कव्हर बदलण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अंदाज असा आहे की या स्पर्धेमुळे क्विन्सलँडच्या अर्थव्यवस्थमध्ये 2 अब्ज डॉलर आणि गोल्ड कोस्टच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1 अब्ज 70 कोटी डॉलरची गुंतवणूक झाली आहे. आतापर्यंत 16 हजार लोकांना रोजगार मिळाला आहे. स्पर्धा संपल्यानंतर हे फ्लॅट नागरिकांना विकले जाणार आहेत.

असाही अंदाज आहे की इथं आलेल्या 3500 पत्रकारांकडून 1 लाखांवर बातम्या प्रसिद्ध होतील.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)