बीबीसी रिअॅलिटी चेक : चीनकडून सतत 'हे' खोटे दावे कशासाठी?

चीन, विकास Image copyright Getty Images

चीन आपल्या प्रगतीबाबत अनेक दावे करत आहे. काय आहेत त्यामागचं सत्य?

दावा

हायस्पीड रेल्वे, मोबाइल पेमेंट, ई-कॉमर्स आणि बाईक शेअरिंग या सगळ्या गोष्टींचा शोध चीननं लावला.

रिअॅलिटी चेक निष्कर्ष (सत्य)

वर उल्लेखलेली कोणताही गोष्ट चीननं शोधलेली नाही. चीननं या वस्तूंचा भरपूर उपयोग केला. या वस्तू जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम चीननं जरुर केलं.

सरकार नियंत्रित असलेल्या चीनमधल्या मीडियानं गेल्यावर्षी मे महिन्यात यासंदर्भात अनेक दावे केले होते. चार क्रांतिकारी तांत्रिक आविष्कारांचा जन्म चीनमध्ये झाला असा दावा त्यांनी केला होता.

चीनमधली इंटरनेट कंपनी 'टेन्सेंट'चे मुख्य कार्यकारी अधिकारी पोनी मा यांनी चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या या दाव्याचा पुनरुच्चार केला आहे. हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार पोनी मा हे चीनमधले सगळ्यांत श्रीमंत व्यक्ती आहेत.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चीनमध्ये सायकल चालवणारी मंडळी

पोनी मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, "हायस्पीड रेल्वे, ऑनलाइन शॉपिंग, मोबाइल पेमेंट आणि शेअरिंग बाईक्स ही चौकडी आम्ही जगाला दिली आहे." प्रत्यक्षात मात्र या चारपैकी कुठल्याही गोष्टीची निर्मिती चीनमध्ये झालेली नाही. काही दशकांपूर्वीच या गोष्टी जगात दाखल झाल्या आहेत.

हा दावा आला कुठून?

या सगळ्याची सुरुवात गेल्यावर्षी बीजिंग फॉरेन स्टडीज युनिव्हर्सिटी सर्व्हेपासून झाली अशी शक्यता आहे. कोणते तांत्रिक आविष्कार चीनकडून आपल्या देशात यावेत असं वाटतं, असा प्रश्न 20 विविध देशातलया युवकांना विचारण्यात आला होता.

सर्व्हेच्या उत्तरांमध्ये हायस्पीड रेल्वे, मोबाइल पेमेंट, बाईक शेअरिंग आणि ईकॉमर्स अव्वल स्थानी होतं. यानंतरच चीनमधल्या प्रसारमाध्यमांनी आणि अधिकाऱ्यांनी आधुनिक काळातले चार प्रमुख आविष्कार अशा संबोधनासह प्रचाराला सुरुवात केली.

या चार गोष्टींचं उगमस्थान काय?

हायस्पीड रेल्वे

हायस्पीड रेल्वेची विशिष्ट अशी काही व्याख्या नाही. युरोपियन युनियनच्या म्हणण्यानुसार ताशी 250 वेगानं धावणाऱ्या ट्रेनला हायस्पीड ट्रेन म्हटलं जातं.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा हायस्पीड रेल्वे

वर्ल्डवाइड रेल ऑर्गनायझेशननुसार 1964मध्ये जपानमध्ये पहिल्यांदा हायस्पीड ट्रेन सुरू झाली होती. याआधी 1955मध्ये फ्रान्समध्ये ताशी 331 वेगानं ट्रेन धावली होती.

मात्र नियमितपणे जपानमध्ये पहिल्यांदा टोकियो ते ओसाका मार्गावर ताशी 201च्या वेगानं ट्रेनसेवा सुरू झाली. दरम्यान चीनमध्ये पहिल्यांदा 2008मध्ये हायस्पीड रेल्वे धावली होती. ऑलिम्पिक स्पर्धेच्या काही दिवस आधी ही सेवा सुरू करण्यात आली.

मोबाइल पेमेंट

1997मध्ये फिनलंडमध्ये मोबाइल पेमेंटचा प्रयोग अंगीकारण्यात आला. मात्र काही लोकांच्या मते 2014मध्ये 'अॅपल पे'च्या माध्यमातून मोबाइल पेमेंटची सुरुवात झाली.

ई-कॉमर्स

इंग्लंडच्या मायकेल एल्ड्रिच यांना ई-कॉमर्स संकल्पनेचं श्रेय जातं. त्यांनी ऑनलाइन शॉपिंगची स्पर्धा आयोजित केली होती.

Image copyright Gateshead council
प्रतिमा मथळा इकॉमर्स

बाईक शेअरिंग

बाईक शेअरिंगची सुरुवात 'वाइट बायसिकल प्लॅन' नावानं झाली होती. 1960 मध्ये अॅमस्टरडॅम येथे हा उपक्रम सुरू झाला होता.

मोबाईक आणि ओफोसारख्या कंपन्या बाईक शेअरिंगसाठी नवे पर्याय आजमावत आहेत. यानुसार युझर स्मार्टफोनद्वारे बाईकचं लोकेशन शोधू शकतात. राईडनंतर विशिष्ट ठिकाणी ड्रॉप करण्याचीही सुविधा देण्यात येते.

चीनकडून चुकीचे दावे का?

चीनला 2020 पर्यंत इनोव्हेशन नेशन व्हायचं आहे. म्हणूनच टेक्नॉलॉजीसंदर्भात गोष्टींच्या विकासावर त्यांचा भर आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा चीनमध्ये एक महिला मोबाइल पेमेंट करताना

कागदाची निर्मिती, गनपावडर, प्रिंटिंग आणि कंपास यांच्या निर्मितीचं श्रेय चीनला जातं. गतवैभव परत मिळवण्यासाठी चीन आतूर आहे. त्यादृष्टीनेच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)