एप्रिल फूलचा जोक महापौरांना पडला महागात!

फ्रेंच महापौर पडला महागात Image copyright Reuters

एप्रिल फूलचा विनोद कधी हिट ठरतो तर कधी तो कुणाला गोत्यात टाकतो. फ्रान्सचे एक महापौरही 1 एप्रिलला थोडं विनोदाच्या मूडमध्ये होते, पण त्यांना तो विनोद नडला.

आइकिया ही मोठी स्वीडिश कंपनी आपल्या शहरात येणार असून त्यामुळे 4,000 नवीन नोकऱ्या उपलब्ध होणार, असं बोवे शहराचे महापौर कॅरोलीन केयॉ यांनी फेसबुक आणि ट्विटरवर जाहीर केलं.

साहजिकच 54,000 लोकसंख्या असलेल्या बोवे शहराच्या नागरिकांना खूप आनंद झाला. पण त्यांच्या या विधानात किती सत्य होतं?

काहीच नाही. 'एप्रिल फूल बनाया!'

तासाभरानंतर केयॉ मॅडमनी ही बातमी खरी नसल्याचं स्पष्ट केलं आणि लोकांचा आनंद तिथेच संपला. मग त्यांना लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आणि अखेर त्यांनी याबाबत माफी मागितली.

केयॉ यांनी हा 'अत्यंत वाईट' विनोद असल्याचं सोशल मीडियावर कबूल करत, याबाबत दिलगिरी व्यक्त केली. फ्रेंच मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या, "प्रत्येकाची विनोदबुद्धी सारखीच असतेच असं नाही."

तसंच, भविष्यात शहराबाहेर एका व्यावसायिक प्रकल्पात निश्चितच ४ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील, असंही त्यांनी पुढे नमूद केलं आहे.

"आपला हेतू गुंतवणुकदारांचं लक्ष वेधण्याचा होता, विशेषत: आइकियाचं," असं फेसबुसवर लिहत त्यांनी आपल्याला नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांबाबत "प्रचंड आदर" असल्याचं स्पष्ट केलं.

पण अनेकांसाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास खूप उशीर केल्याचं म्हटलं आहे.

विरोधी पक्षानेते मेहदी रहौई यांनी फ्रेंच रेडिओ स्टेशन RTLशी बोलताना सांगितलं की, "महापौर बोवेच्या रहिवाशांचा किती विचार करतात, हे या विनोदातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आता मिस केयॉ यांनी शहरातील बरोजगारी कमी करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहीजे."

पण महापौरांना माफी मिळणं कठीण होतं, निदान सोशल मीडियावर तरी. तिथे तर लोकांनी महापौरांना जशास तसं उत्तर दिलं. एक ट्वीट होतं - "आम्ही तुमला पुढच्या निवडणुकीत नक्कीच मतं देऊ.... एप्रिल फूल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)