मीराबाई चानू : कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं गोल्ड मेडल

  • वंदना
  • बीबीसी टीव्ही एडिटर
मीराबाई

वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी कॉमनवेल्थ स्पर्धेत महिलांसाठीच्या 48 किलोग्राम वजनी गटात सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं आहे.

23 वर्षं वयाच्या आणि 4 फूट 11 इंच उंचीच्या मीराबाई चानूनं ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे.

स्नॅच राऊंडमध्ये 80, 84 आणि 86 किलो वजन उचलत मीराबाईंनी देशाला सुवर्ण पदक मिळवून दिलं. यासोबतच त्यांनी स्वत:चा विक्रम मोडला आहे.

यानंतर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये त्यांनी 103 किलोग्राम वजन उचललं. त्यानंतर मात्र मीराबाईंनी मागील कॉमनवेल्थ स्पर्धेचा 103 किलोग्राम वजन उचलण्याचा स्वत:चा विक्रम मोडीत काढत 107 किलोग्राम वजन उचललं. तिसऱ्यांदा मीराबाईंनी 110 किलोग्राम वजन उचलत इतरांपेक्षा 13 किलोग्राम अधिक वजन उचलत बढत मिळवली.

दुसऱ्या स्थानावर मॉरिशिसची मारिया हानिट्रा रोलिया आहेत. ज्यांनी 170 किलो इतकं वजन उचललं.

'डिड नॉट फिनिश'

ऑलिम्पिकसारख्या खेळात प्रतिस्पर्ध्याकडून हार पत्करावी लागली तर वेगळी गोष्ट आहे. पण खेळाडू त्याचा खेळ पूर्णच करू शकला नाही तर ती गोष्ट खेळाडूच्या मानसिक धैर्याला धक्का पोहोचवणारी असते.

2016मध्ये मीराबाई यांच्यासोबत असंच झालं होतं. ऑलिम्पिकमध्ये मीराबाई अशा दुसऱ्या खेळाडू होत्या ज्यांच्या नावासमोर डिड नॉट फिनिश असं लिहिलेलं होतं.

जे वजन मीरा सराव करताना सहजपणे उचलत असत, तेच वजन ऑलिम्पिक स्पर्धेत उचलताना जणू त्यांचे हात जखडले होते. त्यावेळी भारतात रात्र असल्यामुळे खूप कमी भारतीयांनी बघितलं.

सकाळी उठल्यानंतर भारतातल्या क्रीडाप्रेमींनी जेव्हा ही बातमी वाचली तेव्हा मीराबाई त्यांच्या नजरेत व्हिलन ठरल्या. 2016मध्ये तर त्या डिप्रेशनमध्ये गेल्या आणि दर आठवड्याला त्यांना मानसिक तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागले.

या अपयशानंतर खेळाला रामराम ठोकावा असं एकदा मीराबाई यांच्या मनात आलं. पण त्यांनी माघार न घेता गेल्या वर्षी चांगली कामगिरी केली.

48 किलोग्राम वजन असणाऱ्या मीराबाईंनी वजनाच्या 4 पट अधिक म्हणजे 194 किलो इतकं वजन उचलत मागील वर्षी वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. मागील 22 वर्षांत असा विक्रम करणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय महिला ठरल्या होत्या.

48 किलो वजन कायम राहावं यासाठी मीराबाईंनी त्या दिवशी जेवणसुद्धा केलं नव्हतं. याच दिवसाच्या तयारीसाठी मीराबाई मागच्या वर्षी सख्ख्या बहिणीच्या लग्नातही गेल्या नव्हत्या.

बांबू वापरून वेटलिफ्टिंगचा सराव

8 ऑगस्ट 1994ला मणिपूर इथल्या छोट्या गावात मीराबाई यांचा जन्म झाला. इंफाळपासून त्यांचं गाव 200 किलोमीटर दूर होतं. त्याकाळी मणिपूरच्याच महिला वेटलिफ्टर कुंजुरानी देवी स्टार होत्या आणि अथेन्स ऑलिम्पिकसाठी खेळायला गेल्या होत्या.

त्यांचा आदर्श मीराबाईंनी घेतला आणि सहा भावंडांत सर्वांत छोटी असलेल्या मीराबाईंनी वेटलिफेटर बनण्याचा निश्चय केला.

मीराबाईंच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनाही माघार घ्यावी लागली. 2007मध्ये त्यांनी सराव सुरू केला तेव्हा लोखंडाचा बार नसल्यानं त्या बांबूच्या बारनं सराव करत असे.

गावात प्रशिक्षण केंद्र नसल्यानं सरावासाठी त्यांना 50-60 किलोमीटर दूर जावं लागायचं. जेवणात चिकन आणि अंडी लागायची. पण सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईंना तेही शक्य नव्हतं. पण यामुळे मीराबाई थांबल्या नाही.

वयाच्या 11व्या वर्षी मीराबाई अंडर 15 चॅम्पियन होत्या आणि 17व्या वर्षी ज्युनियर चॅम्पियन. ज्या कुंजुरानी यांना बघत मीराबाईंच्या मनात चॅम्पियन बनण्याचं स्वप्न जागृत झालं त्याच कुंजुरानी यांचा 12 वर्षं जुना विक्रम मीराबाईंनी मोडीत काढला. 192 किलो वजन उचलून.

असं असलं तरी प्रवास सोपा नव्हता. कारण मीराबाईंच्या आई-वडिलांजवळ पुरेशी साधनसंपत्ती नव्हती. रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र न झाल्यास खेळ सोडावा लागेल, अशी परिस्थिती उद्भवली होती.

पण ही वेळ आली नाही. वर्ल्ड चॅम्पियनशिप सोडून मीराबाईंनी ग्लासगो कॉमनवेल्थ गेम्समध्ये सिल्व्हर मेडल जिंकलं होतं.

डान्सची आवड

वेटलिफ्टिंगऐवजी मीराबाईंना डान्स करायला आवडतो. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं की, "सरावानंतर कधीकधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान आवडतो."

मीराबाईंचं पुढचं लक्ष यावर्षी होणाऱ्या आशियाई स्पर्धा आणि 2020मध्ये होणाऱ्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेवर आहे.

गोल्ड कोस्टमधल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारतीय महिलांचे पुढील सामने;

• 53 किलो वजनी गट- संजीता चानू- 6 एप्रिल

• 58 किलो वजनी गट- सरस्वती राऊत- 6 एप्रिल

• 63 किलो वजनी गट- वंदना गुप्त- 7 एप्रिल

• 69 किलो- पूनम यादव, 8 एप्रिल

• 75 किलो- सीमा, 8 एप्रिल

• 90+ किलो- पूर्णिमा पांडे, 9 एप्रिल

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)