पाहा व्हीडिओ : राजघराण्यातील सासू-सुनेचं भांडण चव्हाट्यावर येतं तेव्हा

स्पेन राजघराण्याची राणी लेतिझिया आणि त्यांची सासू राणी सोफिया यांच्यातील भांडण चव्हाट्यावर आलं आहे. ईस्टर मास साजरा कराण्यासाठी सासू-सुना स्पेनमधील मॉलोर्का बेटावर एकत्र आल्या असताना ही घटना घडली आहे.

स्पेनच्या मॉलोर्का बेटावर इस्टर मास साजरा करायला स्पेनच्या राजघराण्यातील दिग्गज एकत्र आले होते. या दरम्यान राणी सोफिया या आपल्या नातींबरोबर फोटो काढत होत्या. त्याचवेळी त्यांच्या सूनबाई राणी लेतिझिया यांनी आपल्या मुलींना तिथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी फोटोच्या मध्ये येत प्रतिबंधही केला.

या वेळी दोघींमध्ये काही शाब्दिक चकमकही झाल्याचं दिसतं. मुलींच्या खांद्यावर ठेवलेला हात काढून टाकताना त्या व्हीडिओत दिसतात.

सगळ्यांसमोर सासू सुनेचं भांडण चालू असताना स्पेनचे राजे फिलीप्स यांना मध्यस्ती करावी लागली. हा प्रकार राजघराण्यातील 'तणावा'चा प्रसंग होता, अशी स्पेनच्या प्रसारमाध्यमांत चर्चा चालू आहे.

सासू-सुनेच्या भांडणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

"स्पेनची जनता मात्र राणी लेतिझिया यांच्या वागणुकीवर नाराज आहे," असं स्पेनचे पत्रकार मार्टिन बीआंकी तास्सो यांनी ट्वीट केलं आहे.

ग्रीसच्या मारी शॅन्टेल यांनी राणीच्या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मारी यांनी स्पेनचे राजे फिलीप यांचे चुलत भाऊ 'राजपुत्र पाल्वोस' यांच्याशी लग्न केलं आहे.

"45 वर्षीय माजी टीव्ही अँकर राणी लेतिझिया यांनी आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे", असं शॅन्टेल यांनी ट्विट केलं आहे.

त्यांनतर शॅन्टेल यांनी स्पेनच्या राजघराण्याचा फॅमिली फोटो ट्विटरवर पोस्ट केला आणि "असं असतं आनंदी आजी-आजोबांचं घर" असं लिहिलं.

राणी लेतिझिया यांच्या मैत्रिणीचा हवाला देत, या घटनेनंतर राणी लेतिझिया खूप चिंतेत होत्या, असं टेलेमाद्रिद टीव्हीच्या एल सर्क्युलो कार्यक्रमात सांगण्यात आलं आहे.

एल पाईस वर्तमान पत्रानं दिलेल्या माहितीनुसार, राणी लेतिझिया यांच्या मुलींच्या जन्मानंतर राजघराण्यातील सासू-सुनेमधील भांडणं वाढल्याची माहिती दिली आहे.

याआधी राजघराणं एकत्र येण्यासाठी राजा फेलिप यांनी वारंवार प्रयत्न करूनही हा प्रकार घडला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)