कॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध!

  • वंदना
  • एडिटर, बीबीसी टीव्ही
फोटो कॅप्शन,

संजीता चानू

भारताची वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूने गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. 53 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या संजीतानं एकूण 192 वजन उचललं.

पापुआ न्यू गिनीच्या आणि गतसुवर्णपदकविजेत्या डिका टोऊआला नमवत संजीतानं दमदार विजय मिळवला.

24 वर्षीय संजीताने स्नॅच प्रकारात अनुक्रमे 81, 83 आणि 84 किलो वजन उचललं. क्लिन अँड जर्क प्रकारात तिनं 104, 108 किलो वजनाचा भार पेलला. तिसऱ्या प्रयत्नात संजीतानं 112 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र तरीही पापुआ न्यू गिनीच्या डिको तोऊआला 10 किलोनं नमवलं.

स्नॅच प्रकारात संजीतानं प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत तीन किलोची आघाडी मिळवली होती. स्नॅच प्रकारात खांद्यावर तोलून न धरता थेट डोक्यावर उचलून धरायचं असतं. क्लिन अँड जर्क प्रकारात वजन डोक्याच्या वर उचलण्यापेक्षा खांद्यावर टेकवायचं असतं.

सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर राष्ट्रगीत सुरू असताना संजीता भावुक झाली होती.

चार वर्षांपूर्वी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूनं भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं होतं. संजीता चानूनं तेव्हासुद्धा सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

प्रशिक्षक कुंजाराणी देवी यांच्याकडून प्रेरणा घेत संजीतानं खेळायला सुरुवात केली. 24 वर्षीय संजीता मूळची मणिपूरची आहे.

भारतीय रेल्वेची कर्मचारी असलेल्या संजीताचा स्वभाव शांत आणि लाजाळू आहे, मात्र पोडियमवर गेल्यानंतर संजीताचं वेगळं रूप पाहायला मिळतं.

यशाचा, पदकांचा संजीताचा प्रवास लहानपणापासूनच सुरू झाला. 20व्या वर्षी संजीताने 48 किलो वजनी गटात 173 किलो वजन उचलत ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्यावेळी त्या गटासाठीच्या कॉमनवेल्थ रेकॉर्डपासून संजीता केवळ दोन किलो दूर राहिली.

गेल्यावर्षी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न झाल्यानं संजीतानं नाराजी व्यक्त करताना न्यायालयात धाव घेतली होती. मात्र पुरस्कारासाठी तिच्या नावाची निवड झाली नाही.

गेल्यावर्षी संजीतानं कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 53 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरले होतं.

गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई करणारी मीराबाई चानू आणि संजीता चांगल्या मैत्रिणी आहेत. ग्लासगो स्पर्धेत संजीतानं सुवर्णपदक पटकावलं होतं, तेव्हा मीराबाईने रौप्यपदकावर नाव कोरलं होतं.

फोटो कॅप्शन,

संजीता चानू

सुरुवातीला 48 किलो वजनी गटातून खेळणारी संजीता आता 53 किलो गटातून खेळते.

यंदाच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये पी.संतोषीने संजीताला नमवलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)