सलमान खान : 'मुस्लीम असल्याने 'भाई'ला शिक्षा' - पाकिस्तानात प्रतिक्रिया

सलमान खान

फोटो स्रोत, STR/AFP/Getty Images

सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली यावर पाकिस्तानातही प्रतिक्रिया उमटत आहेत.

काळवीट शिकार प्रकरणात शिक्षा प्रकरणात अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. काही लोक याला कायद्याचा विजय मानत आहेत, तर सलमान खानचे चाहते यावर नाराज आहेत.

सलमानला झालेल्या शिक्षेबद्दल पाकिस्तानमध्येही उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सलमान खान अल्पसंख्याक असल्याने त्याच्याबद्दल भेदभाव होत आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काही जणांनी सलमानला झालेली शिक्षा फारच जास्त असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

पाकिस्तानातील नेते आणि पाकिस्तानातील सेलेब्रिटी सलमानची बाजू घेत आहेत.

मावरा होकेन ट्विटरवर म्हणते, "ज्या जगात मानवी हक्कांना काही किंमत नाही, तिथं एका चांगल्या माणसाला अनेक वर्षांपूर्वी मारलेल्या एका प्राण्याच्या गुन्ह्यात शिक्षा देण्यात आली आहे."

ती म्हणते, "तुम्ही मला कितीही चांगलं किंवा वाईट म्हणून शकता पण जे झालं ते वाईट झालं आहे. लक्षात ठेवा अशा माणसामुळेच मानवता जिवंत आहे. सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा झाल्याबद्दल मला फार दुःख होत आहे,"असं ती लिहिते.

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो, "सलमान खानला झालेल्या शिक्षेमुळं मला फार दुःख होत आहे."

शोएब ट्विटरवर पुढे लिहितो, "कायदा आपलं काम करत आहे. भारताच्या सन्मानीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा आदर राखला पाहिजे. तरीसुद्धा मला असं वाटतं की, ही शिक्षा थोडी जास्त आहे. त्यांचे कुटुंब आणि चाहते यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. तो लवकरच तुरुंगातून बाहेर येईल अशी आशा आहे."

सलमान खानला झालेल्या शिक्षेवर सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकही प्रतिक्रिया देत आहेत.

एहतेशाम उल हक म्हणतात, "सलमान खान फार चांगला माणूस आहे. काही महिन्यांपूर्वी माझी त्यांच्याशी लंडनमध्ये भेट झाली होती. मी त्यांना म्हटलं होतं तुमचे पाकिस्तानात बरेच चाहते आहेत, तुम्ही पाकिस्तानात तुमच्या चाहत्यांना भेटायला का जात नाही? त्यावर त्यांनी वचन दिलं होतं की, ते लवकरच पाकिस्तानात येतील. आता हे कधी शक्य होईल?"

हसन औवैस लिहितात, "मी पाकिस्तानात आहे आणि मी फक्त प्रार्थना करू शकतो. परमेश्वर करो भाईला लवकर जामीन मिळावा."

काही लोकांनी ख्वाजा आसिफ यांच्यासारखं सलमानला झालेल्या शिक्षेचा संबंध धर्माशी जोडला आहे.

इरशाद लिहितात, "पाकिस्तानमध्ये सर्व मुस्लिमेतर सुरक्षित आहेत. पण भारतात मुस्लीम सुरक्षित नाहीत. गुन्हा हा नाही की मी काळविटाची शिकार केली, माझा गुन्हा हा आहे की, मी मुस्लीम सुपरस्टार आहे."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)