जपान : अपवित्र असल्याच्या कारणावरून स्त्रीची रेसलिंग रिंगबाहेर हकालपट्टी

सुमो पहलवान

फोटो स्रोत, Getty Images

जपानमध्ये सुमो रिंगमध्ये प्रथमोपचार करण्यासाठी गेलेल्या बाईला रेफ्रीनं रिंगच्या बाहेर जायला सांगितलं. कारण या रिंगमध्ये येण्याची स्त्रियांना परवानगी नाही.

ही रिंग पवित्र समजली जाते आणि पारंपरिक रुढीनुसार, जपानमध्ये स्त्री अपवित्र समजली जाते. म्हणून त्यांना या कथित पवित्र रिंगमध्ये प्रवेशबंदी आहे.

जपानमधील मयेझुरू शहराचे महापौर रयोझो टाटामी या रिंगमध्ये भाषण देताना कोसळले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ही स्त्री प्रथमोपचार करण्यासाठी गेली होती.

"रिंगमधून बाहेर जाण्याचा आदेश रेफ्रीने दिला. स्त्री तिथे येण्यामुळे ते प्रचंड चिडले. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनमरणाचा प्रश्न असताना हे कृत्य करणं वाईट होतं," सुमो असोसिएशनचे प्रमुख नोब्युशी हकाऊ यांनी एका निवेदनात सांगितलं.

"आम्ही माफी मागतो." असं त्यांनी सांगितलं.

ती बाई निघून गेल्यावर तिथे मीठ शिंपडल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याच्या बातम्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

स्त्री अपवित्र असल्यामुळे तिला रेसलिग रिंगमध्ये प्रवेश नसतो

जपानी संस्कृतीत कुस्ती सुरू होण्याच्या आधी रिंगमध्ये मीठ घालून ती पवित्र करण्याची प्रथा आहे. बाईच्या येण्यामुळे रिंग अपवित्र होते असं मानलं जातं. या घटनेमुळे सोशल मीडियावर प्रतिसाद उमटले.

"एखादी बाई तिथे गेल्यावर मीठ टाकणं हे किती वाईट आहे," असं जपानमधील एका ट्विटर युजरचं मत आहे.

तर "एखाद्याचं जीव वाचवण्याचं हे फळ आहे?" असा प्रश्न दुसरा एक जपानी युजर विचारतो. त्यापेक्षा असोसिएशनच्या प्रमुखाच्या डोक्यावर मीठ शिंपडायला हवं." अशा शब्दात दुसऱ्या एक युजरनं आपली प्रतिक्रिया दिली.

सुमो रिंगमुळे वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2000 मध्ये ओसाका फुसाई ओटा यांनी रिंगमध्ये जिंकलेल्या सुमो रेसलरला ट्रॉफी देण्यासाठी रिंगमध्ये जाण्याची परवानगी मागितली होती. पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)