महिलेच्या गर्भधारणेसाठी डॉक्टरने न सांगता वापरले स्वत:चेच स्पर्म

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

गर्भधारणा व्हावी यासाठी डॉक्टरनं न सांगता स्वत:चेच स्पर्म वापरले, असा आरोप अमेरिकेतल्या एका महिलेनं केला आहे. ही बाब 35 वर्षांनंतर डीएनए चाचणीनंतर समोर आल्याचं महिलेचं म्हणणं आहे.

केली रॉलेट यांनी डीएनएचे नमुने तपासणीसाठी Ancestry.com या वेबसाईटकडे पाठवले होते. त्यानंतर आलेला निकाल धक्कादायक होता. कारण डीएनएचे नमुने हे त्यांच्या वडिलांच्या डीएनएसोबत जुळत नव्हते.

डीएनएचे नमुने उपचार करणाऱ्या डॉक्टरच्या डीएनएशी मिळतेजुळते असल्याचं लक्षात येईपर्यंत चाचणीत काहीतरी दोष राहिला असावा, असं त्यांना वाटत होतं.

घरच्यांनी रॉलेट यांच्या जन्माआधी आयडाहो इथल्या फर्टिलिटी डॉक्टरशी संपर्क साधला होता. विशेष म्हणजे गर्भ राहावा यासाठी आपल्या आई-वडिलांनी तज्ज्ञांची मदत घेतली होती याबद्दल डीएनएचा निकाल येईपर्यंत रॉलेट यांना कधीच सांगण्यात आलं नव्हतं. रॉलेट यांच्या आई-वडिलांनी केली यांच्या जन्मानंतर एकमेकांपासून घटस्फोट घेतला होता.

रॉलेट यांच्या खटल्यात सेवानिवृत्त स्त्रीरोग तज्ज्ञ जेरल्ड मॉर्टिमर यांच्यावर फसवणूक, निष्काळजीपणा, मानसिक तणाव आणि कराराचा भंग केल्याचा आरोप केला आहे.

कराराचा भंग

1980 साली रॉलेट यांचे आई-वडील सॅली अॅशबी आणि हॉर्ड फॉवलर यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर ते वायोमिंग सीमेनजीकच्या आयडाहोजवळ राहात होते.

वडिलांमधल्या स्पर्मच्या कमतरतेमुळे आणि आईच्या गर्भाशयाच्या स्थितीमुळे रॉ़लेट यांच्या आई-वडिलांनी स्पर्म डोनर आणि वडील या दोघांचे स्पर्म वापरून रॉलेट यांना जन्म देण्याचं ठरवलं.

स्पर्म डोनर हा विद्यार्थी असावा आणि त्याची उंची 6 फूट आणि केस तपकिरी तर डोळे निळ्या रंगाचे असावेत, असं या दाम्पत्यानं तेव्हा डॉ. मॉर्टिमर यांना सांगितलं होतं.

फोटो स्रोत, sturti/Getty Images

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

पण गर्भधारणा राहावी यासाठी डॉ. मॉर्टिमर यांनी 3 महिने स्वत:चेच स्पर्म वापरले, असं न्यायालयीन कागदपत्रांनुसार समोर आलं आहे. डॉक्टर जर स्वत:च्याच स्पर्मचा वापर करणार होते तर आम्ही याला कधीच संमती दिली नसती, असं पालकांचं म्हणणं आहे.

मुलीची डिलिव्हरी करणाऱ्या आणि जन्मानंतर तिची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांना जेव्हा या दाम्पत्यानं सांगितलं की, मुलीला वॉशिंग्टनला घेऊन जाणार आहेत, तेव्हा डॉक्टर रडले होते, असं खटल्यात समोर आलं आहे.

केली रॉलेटचा आपण बायोलॉजिकल फादर आहोत हे डॉ. मॉर्टिमर यांना माहिती होतं, पण त्यांनी हे तिच्या आई-वडिलांना सांगितलं नव्हतं, असं तक्रारीत म्हटलं आहे.

डॉ. मॉर्टिमर यांनी आपण स्वत:चे स्पर्म या प्रक्रियेकरता वापरत आहोत, हे लपवून ठेवलं.

गेल्या वर्षी रॉलेट यांनी आईला संपर्क साधला होता आणि Ancestry.com या वेबसाईटनं दिलेले निकाल सांगितले होते. ते चुकीचे असल्याचा आपल्याला विश्वास असल्याचंही त्यांनी आईला सांगितलं होतं.

आपल्या नावापुढे आई-वडील म्हणून नोंदवण्यात आलेली नावं आईला सांगितल्यानंतर आईला मात्र जबर धक्का बसला होता. रॉलेट यांच्या आई अॅश्बी यांनी नंतर या बातमी संदर्भात त्यांच्या आधीच्या पतीशी संपर्क साधला आणि दोघांनी या संशयाचा खुलासा न करण्याचा निर्णय घेतला. कारण अॅश्बी आणि फॉवलर यांना स्वतःचं वैगुण्य उघडं करायचं नव्हतं आणि मुलीला ही गोष्ट समजल्यास तिला दु:ख होईल, असंही त्यांना वाटत होतं, असं खटल्याच्या नोंदीतून उघड होतं.

अनपेक्षित संबंधांचा उलगडा

पण नंतर रॉलेट यांच्या हाती त्यांच्या जन्म प्रमाणपत्राची प्रत लागली तेव्हा त्यावर डॉ. मॉर्टिमर यांचं नाव आणि स्वाक्षरी होती. संशय बळावल्यानं त्यांनी चर्चा करण्यासाठी पुन्हा आई-वडिलांशी संपर्क साधला.

"विश्वासघात करून फवणूक झाल्यानं रॉलेट यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती सार्वजनिक केली. त्यांच्या प्रकरणात लोकांना असलेली रुची कुटुंबीयांना ठाऊक असली तरी त्यांच्या खासगीपणाचा आदर केला जाईल. कारण या प्रकरणातून बाहेर येण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत," असं रॉलेट यांच्या वकिलांनी स्थानिक माध्यमांना सांगितलं.

फोटो स्रोत, sturti/Getty Images

डीएनए चाचणीमुळे कुटुंबाचा इतिहास आणि अस्तित्वाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती लोकांच्या हाती लागत आहे, असं Ancestry.comच्या प्रवक्त्यांनी वॉशिंग्टन पोस्टला सांगितलं आहे.

"एकदम अचूक निकाल देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. यांसारख्या प्रकरणातून अनपेक्षित संबंधही लोकांसमोर येऊ शकतात," असं ते पुढे म्हणाले.

अमेरिकेतल्या इंडियाना इथल्या डॉक्टरला यासारख्याच एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. या डॉक्टरने स्वत:च्या रुग्णांवर स्वत:चेच स्पर्म वापरल्याचं समोर आलं होतं. त्याच्या एकूण रुग्णांपैकी 2 रुग्णांच्या मुलांचा तो बायोलॉजिकल फादर असल्याचं पॅटर्निटी चाचणीतून समोर आलं होतं.

कॅनडातही असंच प्रकरण समोर आलं आहे. इथे जवळपास डझनभर लोकांनी डॉक्टरने स्वत:चेच स्पर्म वापरून आमच्या मुलांना जन्म दिल्याचा आरोप केला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)