जर्मनीमध्ये व्हॅननं पादचाऱ्यांना चिरडलं, 3 मृत्युमुखी, अनेक जखमी

जर्मनी व्हॅन अपघात Image copyright EPA

जर्मनीमध्ये मीन्स्टर शहरात एका व्हॅननं पादचाऱ्यांना चिरडल्याचं वृत्त आहे. यामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या व्हॅनचालकानं नंतर आत्महत्या केली आहे, पोलिसांनी सांगितलं. हा अपघात होता की घातपात याविषयी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी नकार दिला.

स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार शहराच्या जुन्या भागातल्या कीपनकर्ल स्टॅच्यू परिसरात ही घटना घडली. यामध्ये किमान 30 जण जखमी झाले आहेत. यातल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे, असं सांगितलं जात आहे.

मीन्स्टर सिटी सेंटरचा भाग पोलिसांनी सील केला असून पुढचा तपास सुरू असल्याचं ते म्हणाले. व्हॅनचालकाने गाडी पादचाऱ्यांच्या दिशेने घातली तेव्हा बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये आलेल्या लोकांनाही चिरडलं. सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या फोटोंमध्ये या रेस्टॉरंटच्या टेबल खुर्च्या उद्ध्वस्त झाल्याचं दिसत आहे.

Image copyright Reuters

जर्मन सरकारचे उपप्रवक्ते उलरिक डेम्मर म्हणाले की, सरकार या घटनेत पीडितांच्या आणि कुटुंबीयांच्या बरोबर आहे.

डिसेंबर 2016मध्ये जर्मनीची राजधानी बर्लिनच्या ख्रिसमस मार्केटमध्ये असाच एक ट्रक घुसला होता. त्या वेळी 12 जणांचा या घटनेत मृत्यू झाला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)