कॉमनवेल्थ गेम्स : भारताला 7वं गोल्ड, महिला टेबल टेनिस संघाचं यश

टेबलटेनिस Image copyright AFP

गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थमध्ये भारताची चौथ्या दिवशी दमदार सुरुवात झाली. सुरुवातीला वेटलिफ्टिंग आणि शूटिंग स्पर्धांमध्ये पदकं मिळवल्यानंतर भारतीय महिलांच्या टीमनं सिंगापूरला नमवत टेबलटेनिसचं गोल्ड पटकावलं.

रविवारचा दिवस भारतीय संघासाठी उत्साह वाढवणारा ठरला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रविवारी दुपारी भारतीय महिलांची टीम टेबलटेनिसच्या फायनलमध्ये पोहोचली, तेव्हाच त्यांचं पदक निश्चित झालं. फायनलमध्ये सिंगापूरच्या टीमला 3-1 नं हरवून भारतानं सुवर्णपदक जिंकलं.

भारताच्या मानिका बत्राने पहिली मॅच जिंकली आणि उत्साह वाढवला. मधुरिका पाटकर मात्र दुसरी सिंगल्सची मॅच हरली. पण मौमा दास आणि मधुरिका पाटकर या जोडीनं डबल्समध्ये मात्र सामना जिंकला.

त्यानंतर रिव्हर्स सिंगल्समध्ये पुन्हा एका मानिका बत्राने भारताला मॅच जिंकून पदकही मिळवून दिलं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा पूनम यादवनं 69 किलो गटात सुवर्ण पदक मिळवलं.

त्याअगोदर भारतीय वेटलिफ्टर आणि शूटर्सची कॉमनवेल्थमध्ये घोडदौड सुरूच ठेवली. वेटलिफ्टर पूनम यादव आणि विकास ठाकूर यांनी पदक मिळवलं.


भारताचं दिवसभरातलं यश

महिला टेबल टेनिसमध्ये सिंगापूरच्या संघाला हरवून सुवर्णपदक

69 किलो महिलांच्या गटात वेटलिफ्टिंगमध्ये पूनम यादवला सुवर्ण

94 किलो पुरुषांच्या गटात वेटलिफ्टिंगमध्ये विकास ठाकूरला ब्राँझ

10 मीटर रायफल शूटिंगमध्ये पुरुषांच्या गटात रवि कुमारला ब्राँझ

10 मीटर एअर पिस्तोल स्पर्धेत महिलांच्या गटात मनु भाकरला गोल्ड आणि हिना सिद्धूला सिल्व्हर

45-48 किलो वजनगटात महिला बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोम सेमीफायनलमध्ये म्हणजे आणखी एक पदक निश्चित


पूनम यादवने 69 किलो एकूण 222 किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवलं आहे. दुसऱ्या प्रयत्नात पूनमला सफाईदारपणे 122 किलो वजन उचलता आलं नाही. पण तिसऱ्या प्रयत्नात तिने अगदी सहजरीत्या 122 किलो वजन उचललं.

तिला नमवण्यासाठी इंग्लंडच्या सारा डेव्हिसनं 128 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती त्यात अपयशी झाली. त्यामुळे पूनमला सुवर्ण पदक मिळालं.

22 वर्षांची पूनम ही वाराणसीची रहिवासी आहे. 2014 साली झालेल्या ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धेत तिनं 63 किलो वजनगटात कास्य पदक जिंकलं होतं.

भारताच्या विकास ठाकूरला कास्य पदक

तर वेटलिफ्टिंगमध्ये 94 किलो गटामध्ये विकास ठाकूरनं कास्य पदक जिंकलं. पापुआ न्यू गिनीच्या स्टीव्हन कारीने स्नॅच आणि क्लीन एंड जर्क मिळून 370 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलं. जेव्हा कारीने 216 किलो उचललं तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा विकास ठाकूर

कॅनडाच्या बॉडी सेंटवीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. विकास ठाकूरनं तीन प्रयत्नांमध्ये 152, 156 आणि 159 किलो वजन उचलून कास्य पदक मिळवलं. एका प्रयत्नात 159 किलो वजन उचलणं हे त्याचं आतापर्यंतचं सर्वोत्तम प्रदर्शन आहे.

महिला हॉकीमध्ये भारताने इंग्लंडला नमवलं

भारतीय महिला हॉकीची आज कामगिरी दमदार झाली. पूल ए मॅचमध्ये भारताने ऑलिंपिक विजेत्या इंग्लंडला 2-1नं हरवलं. भारतीय महिला टीमनं पहिल्यांदा कॉमनवेल्थमध्ये सहभाग नोंदवला. या विजयामुळं भारताचा सेमीफायनलला पोहचण्याचा मार्ग सोपा झाला आहे.

Image copyright Getty Images

भारताच्या गुरजीत आणि नवनीत कौरनं प्रत्येकी एक-एक गोल केला आणि इंग्लंडला हरवलं.

रवी कुमारला कास्य पदक

रवी कुमारला 10 मीटर एअर रायफलमध्ये कास्य पदक मिळालं आहे. ऑस्ट्रेलियाच्या डॅन सॅम्पसनला सुवर्ण तर बांग्लादेशच्या अब्दुल्ला हेल बाकीला रौप्य पदक मिळालं आहे. रवी कुमारचं शिक्षण दिल्ली विद्यापीठातून झालं असून तो भारतीय हवाई दलात काम करतो.

मेरी कोम सेमी-फायनलमध्ये

भारताची स्टार बॉक्सिंगपटू एम. सी. मेरी कोम सेमी फायनलमध्ये पोहचली आहे.

Image copyright Getty Images

तिनं स्कॉटलॅंडच्या मेगन गॉर्डनला तिन्ही राउंडमध्ये हरवलं. मेरी कोमनं लंडन ऑलंपिकमध्ये 51 किलो गटात बॉक्सिंगमध्ये कास्य पदक जिंकलं होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)