आकाशगंगेच्या पोटात सापडली आणखी 12 कृष्णविवरं!

आकाशगंगा

आकाशगंगेच्या मध्यभागी महाकाय कृष्णविवर असल्याचा कयास गेल्या अनेक वर्षांपासून होता. हाच कयास उचलून धरणारं एक संशोधन पुढे आलं आहे, ज्यानुसार आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी 12 कृष्णविवरं असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढलाय.

मध्यभागी असलेल्या या महाकाय कृष्णविवराच्या बाजूनं ही 12 कृष्णविवरं आहेत. या संदर्भातला शोधनिबंध नुकताच नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

कोलंबिया विद्यापीठातले संशोधक चार्ल्स हेली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नासाच्या 'चंद्रा एक्स-रे' या टेलेस्कोपमधून उपलब्ध झालेल्या संग्रहित माहितीच्या आधारावर हे संशोधन केलं आहे.

आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या महाकाय कृष्णविवराचं सॅजिटेरिअस A* (Sgr A*) असं नाव आहे. या कृष्णविवराच्या सभोवती गॅस आणि धुळीचं तेजोवलय आहे. यामध्ये ताऱ्यांचा जन्म होतो. हे तारे इथंच जगतात, इथंच मरतात आणि नंतर ते कृष्णविवरात बदलूनही जाऊ शकतात.

या तेजोवलायच्या बाहेर असणारी कृष्णविवरं Sgr A* या महाकाय कृष्णविवराच्या प्रभावाखाली असतात. ही कृष्णविवरं जसजशी त्यांची ऊर्जा गमावतात तसतशी ती Sgr A*च्या जवळ ओढली जातात आणि त्याच्या शक्तीनं बांधली जातात.

यातील काही कृष्णविवरं ताऱ्यांशी बंध रूपात असतात. याला बायनरी सिस्टिम असं म्हणतात.

Image copyright Science Photo Library

अशा ब्लॅकहोल बायनरी सिस्टममध्ये प्रखर स्फोट होत असतात. यापूर्वीही या कृष्णविवरांचा शोध लावण्यासाठी या स्फोटातून निघणाऱ्या एक्स-रेंचा शोध घेतला जात होता.

अस्पष्ट आणि स्थिर

हेली म्हणाले, "आकाशगंगेचं केंद्र पृथ्वीपासून इतक दूर आहे की आपल्याला दिसू शकतील इतके प्रबळ आणि तीव्र स्फोट 100 ते 1000 वर्षांत घडतात."

म्हणून कोलंबिया विद्यापीठातल्या संशोधकांनी अशा बायनरी सिस्टिम निष्क्रिय असताना यातून कमी क्षमतेच पण सतत उत्सर्जित होणाऱ्या एक्स-रेंचा अभ्यास केला.

ते म्हणाले, "जी कृष्णविवरं सुटी असतात ती फक्त काळी असतात. ती काहीच करत नाहीत."

"पण जेव्हा कृष्णविवरं कमी वस्तुमानाच्या ताऱ्यांशी बांधलेली असतात तेव्हा त्यांतून कमी क्षमतेच्या एक्स-रेंचं उत्सर्जन होतं. ही किरणं जरी कमी क्षमतेची असली तरी त्यांचं नियमित होणारं उत्सर्जन म्हणून ती शोधता येण्यासारखी आहेत."

चंद्रा टेलेस्कोपवरील अशा एक्स-रेंच्या माहितीचा अभ्यास केला असता Sgr A*च्या आजूबाजूला 12 कृष्णविवर असल्याचं लक्षात आलं आहे. ही कृष्णविवरं Sgr A*पासून 3 प्रकाश वर्षं अंतराच्या आत आहेत.

Image copyright Science Photo Library

या बायनरींचा अभ्यास केला असता या संशोधकांच्या टीमनं Sgr A*च्या भोवतीनं 300 ते 500 इतक्या संख्येनं कमी वस्तुमानाच्या बायनरी आणि कमी वस्तुमानाची किमान 10 हजार स्वतंत्र कृष्णविवरं असतील, असा अंदाज केला आहे.

हेली म्हणाले, "हे संशोधन बऱ्याच बाबतीत महत्त्वाचं आहे. ग्रॅव्हिटेशनल व्हेव्ज संदर्भातील संशोधनात यात मोठी भर पडणार आहे. एखाद्या दीर्घिकेच्या मध्यभागी किती कृष्णविवरं असू शकतात, याचा जर चांगला अंदाज बांधता आला तर त्याच्याशी संबंधित ग्रॅव्हिटेशनल व्हेव्जच्या किती घटना असू शकतील याच्या अंदाजात अधिक अचुकता येईल."

दोन स्वतंत्र कृष्णविवरं एकमेकांवर आदळल्यामुळे ग्रॅव्हिटेशनल व्हेव्ज निर्माण होतात. हे 'स्पेस टाईम'मध्ये निर्माण होणारे तरंग असतात. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी याबद्दल अंदाज लावला होता. 2015मध्ये यांचा शोध लावण्यात आला.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)