साखरेवर जास्तीचा कर लावला तर लोकांचं आरोग्य सुधारेल?

तुम्ही किती कोल्डड्रिंक पिता? Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा साखरेवरच्या कराने आरोग्यावर काय परिणाम होणार?

मेक्सिको, फ्रान्स आणि नॉर्वेसारख्या देशांपाठोपाठ आता UKमध्येही कोल्डड्रिंक्समधल्या साखरेवर अतिरिक्त कर लागू करण्यात आला आहे.

शुक्रवारपासून लादण्यात आलेल्या या अतिरिक्त कराचं स्वागत करणारे ब्रिटीश मंत्री आणि कार्यकर्ते याला एक मोठं यश मानत आहेत. तरी काही जाणकारांनुसार या मोहिमेला इतक्या लवकर यशस्वी ठरवता येणार नाही.

या नवीन करामुळे UKमधल्या फँटा, रिबेना आणि ल्युकोझेड कंपन्यांनी आपापल्या कोल्डड्रिंक्समधलं साखरेचं प्रमाण याआधीच कमी केलं आहे, मात्र कोका कोलाने यात अद्याप कपात केलेली नाही.

2014 साली भारतातही कार्बोनेटेड साखरयुक्त शीतपेयांवर असाच कर लागू करण्यात आला होता. तेव्हा अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले होते की, हा कर महसूल वाढवण्यासाठी नव्हे तर लोकांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला आहे.

कसा लादला जाणार हा कर?

हा कर मुख्यतः पेय निर्मात्यांवर लादण्यात आलं आहे. पण या अतिरिक्त करामुळे ग्राहकांच्या खिशाला चाट लागणार का, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

प्रतिमा मथळा साखर किती

ज्या कोल्डड्रिंक्समध्ये दर 100 मिलिलीटरमध्ये 8 ग्रॅमहून अधिक साखर आहे त्यावर प्रतिलीटर 24 पेन्स (अंदाजे 22 रुपये) कर लागणार आहे. तर ज्या पेयांमध्ये 5 ते 8 ग्रॅम साखर आहे, त्यावर 18 पेन्स (अंदाजे 20 रुपये).

केवळ फळांच्या रसापासून बनवलेल्या पेयांवर कुठलाही अतिरिक्त कर नसेल, कारण त्यात वाढीव साखर टाकलेली नसते. तसंच दुग्ध पदार्थांवरही हा कर लावण्यात आलेला नाही कारण त्यातलं कॅल्शियम आरोग्यासाठी आवश्यक आहे.

या नवीन करामुळे ब्रिटन सरकारच्या खजिन्याचा महसूल वर्षाला 50 कोटी पाउंडांनी वाढण्याचा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. पण काही कंपन्यांनी आता पेयांमधली साखर कमी केल्याने हा आकडा आता 24 कोटी पाउंडांवर आला आहे.

हा पैसा शाळांमधले खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्पोर्ट्स क्लब्ससारख्या सोयी उभारण्यासाठी गुंतवण्याचा सरकारचा मानस आहे.

केक आणि बिस्किटांसारखे पदार्थ या कराच्या मर्यादेत येत नाहीत. पण अशा पदार्थांमधलं साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी कंपन्यांना कसं प्रोत्साहित करता येईल, यावर सरकार काम करत आहे.

फायदा होईल का?

University of Bedfordshire चे आहारतज्ज्ञ डॉ. डॅनियल बेली यांच्यानुसार हा कर स्थूलता कमी करण्याच्या दिशेत एक मोठं पाऊल आहे. कंपन्यांनी यानंतर आपल्या धोरणात तातडीने हालचाली केल्या असल्या तरी ग्राहकांवर याचा किती परिणाम होईल, याबद्दल स्पष्टता नसल्याचं त्यांनी सांगितलं.

"हा कर लागल्याने पेय तर महाग झाली, पण त्यामुळे त्या पदार्थांची विक्री कमी होईल का? याउलट लोक कदाचित त्याच पदार्थांसाठी जास्त पैसे मोजण्यासाठीही तयार असतील," असं डॉ बेली सांगतात. त्यांच्या या तर्कामागे एक सर्वेक्षण आहे.

मिंटल संस्थेने केलेल्या एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की, ब्रिटनमधल्या अर्ध्याहून अधिक ग्राहकांना किमती वाढल्याने काही फरक नाही पडला.

त्याऐवजी जर त्या पदार्थांवर त्यांची पोषणआहाराची सहज कळणारी माहिती दिली गेली, तर लोकांना जास्त कळेल आणि अधिक फरक पडेल, असंही 2,000 लोकांच्या सर्वेक्षणातून पुढे आलं आहे.

पण आणखी एका अभ्यासानुसार कोल्डड्रिंक्समधल्या साखरेवर कर लावला तर त्याने लोकांमधलं दारू पिण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. UKच्या London School of Hygiene and Tropical Medicine ने 2012 आणि 2013 साली केलेल्या एका सर्वेक्षणात 32,000 घरांच्या घरगुती खर्चाचा अभ्यास करण्यात आला. त्यात जवळपास 60 लाख किराणा बिलांचं निरीक्षण केल्यावर हा निष्कर्ष काढण्यात आला की साखरयुक्त पेयांवर कर लादण्यामुळे त्यांची खरेदी कमी होते. पण त्या कुटुंबांमध्ये मद्यसेवनाचं प्रमाण तितकंच राहतं.

म्हणून तुलनात्मक पातळीवर पाहिलं तर शीतपेयांमधल्या साखरेवर कर वाढला तर लोकांचं इतर साखरविरहित पेयांचं सेवन वाढतं.

कोणाचं किती सेवन?

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा टीनएजर्समध्ये सॉफ्टड्रिंक्सचं सर्वाधिक सेवन

सगळ्याच वयोगटातले लोक कोल्डड्रिंक्स पितात पण याचं सर्वांत जास्त प्रमाण टीनएजर्समध्ये आढळून आलंय. त्यांच्या साखरेच्या एक चतुर्थांश प्रमाण अशा ड्रिंक्समधून येतं.

UKचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सांगतात, "टीनएजर्स एका वर्षात जवळपास एक बाथटब भरून साखरयुक्त पेय घेतात. आपल्या जगात वाढणारी स्थूलता काळजीचं कारण आहे. या करानंतर नक्कीच साखरेचं सेवन कमी होण्यास मदत होईल."

याने लहान मुलांचं मौखिक आरोग्यही चांगलं होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या नव्या कराची अंमलबजावणी होत असतानाच Public Health England (PHE) या आरोग्य संस्थेने काही आकडेवारीही जाहीर केली आहे. त्यानुसार इंग्लंडमधल्या दवाखान्यांमध्ये दर 10 मिनिटांनी एक मुलाचा दात काढला जातो.

PHEच्या डॉ. सँड्रा व्हाईट सांगतात, "एवढ्या मुलांना केवळ दातदुखीसाठी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतंय, हे खरंच चिंतेचं कारण आहे."

त्या कुटुंबांना सॉफ्टड्रिंक्सचं सेवन कमी करून पाणी आणि दूध घेण्याचं आवाहन करत आहेत.

ग्राहकांची प्रतिक्रिया

आम्हाला काय खायचंय, काय प्यायचंय, हे सरकारने ठरवू नये, असा सूर सोशल मीडियावर या नव्या कराविरुद्ध उमटून आला आहे.

ट्विटरवर @IAmNeesha ने म्हटलं आहे - "हा #SugarTax एक मोठा विनोद आहे. लोक खरंच याविरुद्ध बोलू शकत नाहीत का? आणि मला जर ऑफिस किंवा जिम केल्यानंतर कोक प्यायचं असेल, तर त्यासाठी मी उगाच जास्त कर कशाला भरू?"

Image copyright Twitter

आणखी एका ट्विटर युजर @sammyyjadee ने म्हटलं, "लोकांना याविषयी खरंच जागरूक करण्याची गरज आहे. त्यांना त्याचं कमी सेवन करण्याबद्दल शिकवा, आणि मुलांच्या आहारातून असली पेय हद्दपार करा."

एकाने याचं स्वागत करताना म्हटलं आहे की, "तसं तर सरकारने आमच्या वैयक्तिक विषयांमध्ये पडू नये, असं मी मानतो. पण हा प्रश्न गंभीर आहे. NHS (ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य व्यवस्था) लोकांचं आरोग्य जपण्यासाठी संघर्ष करत आहे, म्हणून आता आपण यासाठी असा कर भरतोय, नाहीतर ते भरतीलच."

कंपन्यांना फटका?

50% निर्मात्यांनी आपल्या कोल्डड्रिंक्समध्ये आधीच साखरेचं प्रमाण कमी केल्याचा अंदाज आहे. फँटाने 33 टक्क्यांनी, रिबेना आणि Irn-Bru ने 50 टक्क्यांनी आणि ल्युकोझेडने तर 66 टक्क्यांनी साखर कमी केली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 2014 साली भारतातही कार्बोनेटेड साखरयुक्त शीतपेयांवर असाच कर लागू करण्यात आला होता.

काही महिन्यांपूर्वी कोका कोलाने आपल्या 1.75 लीटरच्या बॉटलचा साईझ कमी करून 1.5 लीटर केली होती. त्याची किंमतही 20 पेन्स (18 रुपयांनी) वाढवण्यात आली होती.

पण कंपनीने म्हटलंय की ते त्यांची जगप्रसिद्ध चव बदलणार नाही, कारण "लोकांना ती टेस्ट आवडते आणि त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलंय की ती बदलू नये".

मेक्सिकोमध्ये अशा कराचा परिणाम झाला होता?

मेक्सिकोमध्ये 1 जानेवारी 2014ला साखरयुक्त कोल्डड्रिंक्सवर असाच 'साखर कर' लादण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या वर्षाच्या अखेरीस मेक्सिकन लोक आधीच्या तुलनेत 12 टक्के कमी साखर ग्रहण करत होते. सर्वांत जास्त कपात झाली होती गरीब घरांमध्ये.

अभ्यासकांच्या हेही लक्षात आलं की ज्या इतर पेयांवर हा कर लागला नाही, त्यांची विक्री या काळात वाढली होती. या वाढीमागे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची लोकप्रियता वाढण्यासारखंही एक कारण आहे.

पण याने लोकांमधली स्थूलता कमी झाली का? तसं तर असा कुठलाही लाक्षणिक बदल झाल्याचा पुरावा नाही, पण कदाचित हे इतक्या लवकर कळणारही नाही.

हे तुम्ही पाहिलंत का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - देशात 10 लाखांपेक्षा भोंदू डॉक्टर लोकांवर उपचार करातायेत?

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)