'महिला धर्माचं नेतृत्व करू शकत नाहीत!' : डोनाल्ड ट्रंपना कोण देतंय बायबलचे धडे?

ट्रंप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा बायबलवर हात ठेऊन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताना डोनाल्ड ट्रंप

गेल्या शंभर वर्षांत अमेरिकेत असं पहिल्यांदा झालंय. बायबलचा अभ्यास करणारा अमेरिकन मंत्रिमंडळाचा एक समूह स्थापन करण्यात आला आहे. तिथं ते सर्व मिळून नेमकं काय करतात? कशाचा अभ्यास करतात ते? डोनाल्ड ट्रंप यांना त्याचा काही फायदा होतो का? बीबीसीचे प्रतिनिधी ओवेन अॅमोस यांनी या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या लेखातला हा संपादित अंश.

अमेरिकेतील शक्तिशाली लोक दर बुधवारी एकत्र येतात. कुठे एकत्र येतात हे विचारू नका. कारण गुप्तहेर खात्याने ही माहिती उघड करण्यास मनाई केली आहे. कुठं भेटायचं हे फक्त या गटातल्या सदस्यांनाच माहीत असतं.

उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स, सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पाँपेओ, शिक्षण मंत्री बेस्टी डेव्होस, उर्जा मंत्री रीक पेरी, महाधिवक्ता जेफ सेशन्स यांच्यासारखी दिग्गज मंडळी या गटात आहेत. त्यांची यादी खूप मोठी आहे. त्यांना प्रत्येक वर्गाला हजर राहता येत नाही कारण ते सर्व खूप व्यग्र लोक आहेत. पण बहुतेक वेळा ते हजर राहतात.

हे लोक आठवड्यातून एकदा भेटतात. या अभ्यास समूहाची बैठक साधारणतः 60 ते 90 मिनिटं चालते. बैठक झाल्यानंतर या मंडळाचे सदस्य शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या शंकांचं निरसन करून घेऊ शकतात.

पण अमेरिकेतल्या या इतक्या प्रभावशाली लोकांना शिकवण्याचं काम कोण करत आहे? आणि या 'बायबल स्टडी ग्रुप'मध्ये ते शिकवतात तरी काय?

Image copyright capitol ministries
प्रतिमा मथळा राल्फ ड्रॉलिंगर आणि त्यांची पत्नी डॅनियल ड्रॉलिंगर हे उच्चभ्रू लोकांसाठी बायबल स्टडी ग्रुप चालवतात.

या बायबल स्टडी ग्रुपचे प्रमुख आहेत 63 वर्षांचे राल्फ ड्रॉलिंगर. सात फूट उंच ड्रॉलिंगर आधी एक व्यावसायिक बास्केटबॉलपटू होते. आता ते धर्मगुरू बनले आहेत.

कोण आहेत राल्फ ड्रॉलिंगर?

राल्फ यांना लहानपणी बायबलची आवड नव्हती. ते सांगतात, "लहानपणी फार तर दहा-बारा वेळा मी चर्चमध्ये गेलो असेल."

"मग मी अनेकदा बायबल वाचायचं ठरवलं, तशी अनेकदा सुरुवातही केली, पण मला त्याचा फारसा अर्थ लागला नाही," ते सांगतात.

शाळेत असताना त्यांना बास्केटबॉलची आवड निर्माण झाली. एकदा खेळ संपल्यावर त्यांना काही चीअरलीडर्सनी बायबलचं वाचन करण्यासाठी बोलवलं. ते त्यांच्यासोबत गेले आणि त्यांनंतर आपलं आयुष्यचं बदलून गेलं, असं ते सांगतात.

1972 मध्ये ड्रॉलिंगर यांना बास्केटबॉलची स्कॉलरशिप मिळाली आणि ते कॅलिफोर्निया विद्यापीठात शिकायला गेले. पुढचे चार वर्षं त्यांचा चर्चशी जवळून संबंध आला आणि तिथं त्यांनी बायबलचं अध्ययन केलं. "मी बायबलच्या अक्षरशः प्रेमात पडलो," असं ते सांगतात.

व्यावसायिक बास्केटबॉलपटू म्हणून कारकीर्द सुरू केल्यानंतर ते जवळपास 35 देशांमध्ये फिरले असावेत. तिथं गेल्यावरही त्यांना वेळ मिळेल तसं ते बायबलवर प्रवचन द्यायचे. "मला बास्केटबॉलपेक्षा बायबल शिकवणं आवडू लागलं."

बास्केटबॉलमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी काही काळ क्रीडा मंत्रालयात काम केलं. मग 1996मध्ये त्यांचा राजकारणाशी जवळून संबंध आला. नंतर त्यांनी 'कॅपिटॉल मिनिस्ट्री'ची स्थापना केली. राजकारण्यांना बायबलचे धडे देणं, हे या मिनिस्ट्रीचं काम आहे. राजकारण्यांबरोबरच अमेरिकेतील उच्चभ्रू लोकांना बायबल शिकवण्याचं काम त्यांच्या संस्थेमार्फत केलं जातं.

'महिला या धर्मगुरू होऊ शकत नाही'

बायबल शिकवण्यासाठी ड्रॉलिंगर यांनी अनेक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. हे शिक्षक स्थानिक धर्मगुरू असतात. त्यांच्यामार्फत ही शिकवण दिली जाते.

पण त्यांच्या या समूहात एकही महिला धर्मगुरू नाही. संस्थेत महिला आहेत पण त्या प्रशासकीय कामं करतात. याचं कारण विचारला असता ते म्हणतात, "राजकारण किंवा व्यवसायात महिलांनी नेतृत्व करण्याला बायबलने बंदी घातली नाही, पण चर्चमध्ये किंवा धर्माचं नेतृत्व करण्याबाबत बायबलनेच महिलांना बंदी घातली आहे. याचा अर्थ असा नाही की त्यांचं महत्त्व कमी आहे. फक्त त्यांना दुसरी जबाबदारी आहे. त्यामुळं त्या बायबल शिकवू शकत नाहीत."

2010 मध्ये सिनेट आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींना बायबलचे धडे देण्यास सुरुवात झाली. आता किमान 50 प्रतिनिधी त्यांच्या वर्गात हजर राहतात.

"जेव्हा डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी आमच्या स्टडी ग्रुपमधल्या दोन जणांची नियुक्ती मंत्रिमंडळात केली. मग नंतर हीच प्रक्रिया कायम राहिली. पुढे त्यांनी मंत्रिमंडळात ज्यांना निवडलं ते सर्व आमच्या स्टडी ग्रुपचे सदस्य होते. उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स या ग्रुपचे सदस्य आहेत आणि कोण-कोण सश्रद्ध आहे, याची त्यांना चांगली माहिती आहे," असं ड्रॉलिंगर सांगतात.

काय शिकवलं जातं?

बायबल स्टडी ग्रुपमध्ये जे काही शिकवलं जातं ते काही गोपनीय नाही. त्यांच्या वेबसाइटवरही सगळं मजकूर उपलब्ध आहे.

समलैंगिक विवाहांबद्दल ते लिहितात, "समलैंगिक संबंध आणि विवाह ईश्वराच्या नजरेत बेकायदशीर आहेत. त्यांनी तसं स्पष्टपणे म्हटलं आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा ऊर्जा सचिव रिक पेरी आणी कृषी सचिव सॉनी परड्यू म्हणतात की ड्रॉलिंगर यांनी आम्हाला जीवनाचा मार्ग दाखवला.

वैयक्तिक मालमत्तेचा हक्क, मुक्तव्यापार या गोष्टींना बायबलचं पाठबळ आहे, पण साम्यवादाला बायबल परवानगी देत नाही, अशी शिकवण बायबल स्टडी ग्रुपकडून दिली जाते.

तुम्ही मंत्रिमंडळातल्या निर्णयांवर हस्तक्षेप करतात का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणतात, "धर्म आणि राजकारण या दोन्ही गोष्टी वेगळ्या असायला हव्यात. कोणत्या सदस्याने किंवा मंत्र्याने कसं वागावं, याबद्दल मी काही सांगत नाही. मी त्यांना फक्त योग्य मार्गदर्शन करतो. योग्य वाट दाखवतो. त्या वाटेवर चालायचं की नाही, याचा निर्णय त्यांनीच घ्यावा असं मला वाटतं."

ट्रंप यांच्यावर प्रभाव

"मी दिलेल्या ब्लूप्रिंटवरच ट्रंप चालतात, असं मी म्हणणार नाही. पण मला जे वाटतं यापेक्षा ते काही वेगळं करत नाही. कारण त्यांची आणि माझी बायबलची समज सारखीच आहे. ट्रंप हे बायबल स्टडी ग्रुपचे सदस्य नाहीत पण आठवड्याभरात काय शिकवण्यात आलं, याची माहिती त्यांना नोट्समधून पाठवली जाते. त्यांचं वाचन करून ते मला इमेल करतात," असं ते सांगतात.

Image copyright Getty Images

तुम्ही धर्म आणि राजकारण एकत्र करत आहात, असं तुम्हाला वाटत नाही का? असं विचारल्यावर ते म्हणतात, "धर्म आणि राज्यसंस्था वेगवेगळ्या असायला हव्या यात शंका नाही. पण नीतीमूल्यांबाबतीत आपण तसं म्हणू शकत नाहीत. तुम्हीच बघा ना, कोणतंही क्षेत्र असू द्या जसं की कुटुंब संस्था, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, या ठिकाणी ईश्वराचा आदेश पाळूनच आपण वागायला हवं," असं ड्रॉलिंगर म्हणतात.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)