घोटाळ्यांवर घोटाळे : ब्राझीलमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

राष्ट्रपती Image copyright Reuters
प्रतिमा मथळा ब्राझीलचे दोन माजी राष्ट्राध्यक्ष रूसेफ आणि लुला

2014 पासून ब्राझील एका घोटाळ्यात गुंतलाय. त्याची सुरुवात एका तेल कंपनीपासून झाली, जी शासनाच्या मालकीची आहे. या घोटाळ्याने उच्चभ्रू लोकांना कवेत घेतलं. काही उद्योगपती आणि अगदी राष्ट्राध्यक्षही त्यात गुरफटले.

तसं पाहिलं तर हे एक साधं भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. हा कोट्यवधींचा घोटाळा आहे, ज्यात 80 पेक्षा अधिक राजकारणी आणि उद्योगक्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

पण जसजसा या प्रकरणाच्या तपासाचा व्याप वाढला, ज्याला 'ऑपरेशन कार वॉश' म्हटलं गेलं, तसतसे इतर घोटाळे समोर येऊ लागले.

मग यात गुंतून समोर आलेल्या अनेकांनी आपल्याला आपल्या पदांवरून हटवण्याचा हे राजकीय कट आहे, असं सांगण्यास सुरुवात केली.

पण हा घोटाळा नक्की आहे तरी काय? त्यात कोणाचा सहभाग आहे?

ऑपरेशन कार वॉश

एका घोटाळ्याचा तपास म्हणून ऑपरेशन कार वॉश 2014 मध्ये सुरू झालं. सरकार नियंत्रणाखाली असलेल्या पेट्रोबार कंपनीने बांधकाम कंपन्यांकडून लाच घेऊन त्यांना चढ्या भावाने कंत्राटं दिली, असे आरोप झाले होते.

हे काय कमी होतं की त्यात मजूर पक्षाचा पायही गर्तेत जाताना दिसला. कंत्रांटांचा आरोप होत असतानाच या पक्षाने या पैशातून काही पैसा राजकारण्यांकडे वळता केला, जेणेकरून त्यांचा राजकीय पाठिंबा निवडणुकांमध्ये विकत घेता येईल.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा ब्राझील मध्ये भ्रष्टाचाराला उत आला आहे.

या प्रकरणात ज्या डझनभर लोकांकडे बोट दाखवली गेली त्यात अनेक राजकारणी होते. प्रेमाने लुला म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय माजी राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दि सिल्वा यांचं नावही त्यात समोर आलं.

उच्च पातळीवर भ्रष्टाचार

तीन वर्षांच्या चौकशीनंतर लुला यांना पाच आरोपांपैकी पहिल्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं. पेट्रोबास कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी मदत केल्यामुळे OAS या इंजिनिअरिंग कंपनीने लुला यांना समुद्रकिनारी एक प्रशस्त घर मिळवून दिलं होतं.

लुला यांना 12 वर्षांसाठी तुरुंगात पाठवण्यात आलं. त्यांना अपील करण्याच्या काळातही मोकळं सोडता कामा नये म्हणून न्यायधीशांनी त्यांची शिक्षा 7 एप्रिलपासूनच सुरू करण्याचे आदेश दिले.

पण लुला यांनी या आरोपांचा इन्कार केला. राष्ट्राध्यक्षपदासाठी पुढची निवडणूक मला लढता येऊ नये म्हणून हे राजकीय कारस्थान असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

Image copyright Google
प्रतिमा मथळा मायकेल तेमर यांच्यावर एका वृत्तपत्राने भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे.

देशाची धुरा सांभाळल्यानंतर चौकशीला सामोरं गेलेले लुला हे पहिले राष्ट्राध्यक्ष नव्हेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून भ्रष्टाचार करणाऱ्या इतर दोघांवर वेगळे आरोप आहेत.

ब्राझीलच्या अटर्नी जनरलने सध्याचे राष्ट्राध्यक्ष मायकेल तेमेर यांच्यावर मांसाचं पॅकेजिंग करणाऱ्या JBS कंपनीच्या मालकाकडून पैसे घेतल्याचा आरोप लावला आहे. तेमेर आधी उपराष्ट्रपती होते आणि मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला आहे.

JBS कंपनीवर आधीच दुसऱ्या एका प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

या आरोपांची माहिती सुप्रीम कोर्टाकडे पाठवण्यात आली आहे. आता हे सगळं प्रकरण संसदेच्या खालच्या सदनात पाठवायचं की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. त्यावरून तेमेर यांचं राष्ट्राध्यक्षपद सुरक्षित राहणार की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल.

तेमेर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

त्यांच्या आधी या पदावर होत्या जीलमा रूसेफ, ज्यांच्यावर वेगळे आरोप होते. लुला यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केल्यांनंतर रूसेफ राष्ट्राध्यक्षपदी आल्या. पण ऑगस्ट 2016 मध्ये त्यांच्यावर महाभियोग दाखल झाला आणि त्यांना पायउतार व्हावं लागलं.

रूसेफ यांच्यावर महाभियोग का दाखल झाला?

कारवॉश प्रकरणाशी कुठलंही नातं नसलेले दुसरेच आरोप रूसेफ यांच्यावर होते. रूसेफ या लुला यांच्या निकटवर्तीय आहेत. सरकारच्याच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे वळवल्याचा रूसेफ यांच्यावर आरोप झाला.

ब्राझीलच्या घटनेनुसार हे बेकायदशीर आहे, पण हे तर सगळेच करतात, असा युक्तिवाद रूसेफ यांनी स्वतःचा बचाव करताना केला. पण टीकाकारांचा आरोप आहे की त्यांनी सामाजिक योजनांमधील त्रुटी भरून काढण्यासाठी हा पैसा वापरला, जेणेकरून 2014 साली त्या पुन्हा निवडून येऊ शकतील.

या आरोपांविरोधात रूसेफ म्हणाल्या की आपली निवड झाल्यापासूनच उजव्या विचारसरणीचे त्यांचे विरोधक त्यांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा डिलेमा रुसॉफ यांना ऑगस्ट 2016 मध्ये त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं होतं.

पण निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला.

त्यांचेच उपराष्ट्रपती तेमेर हे मध्य-उजव्या विचारसरणीच्या PMDB पार्टीचे सदस्य आहेत. म्हणून त्यांना 2019 पर्यंत देशाची धुरा देण्यात आली, जेव्हा पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होणार आहेत.

पण रूसेफ यांचे समर्थक त्यांच्या पाडावासाठी आणखी एक वेगळी दंतकथा मांडतात. ते म्हणतात की विरोधकांनी रूसेफ यांची रवानगी करण्याचा कट रचला कारण त्यांना वाटलं की कार वॉश प्रकरणात रूसेफ त्यांना संरक्षण देऊ शकणार नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)