सीरिया हल्ला : 'मोहीम फत्ते' झाल्याचं ट्रंप यांचं ट्वीट

निदर्शनं सीरिया Image copyright EPA

अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने मिळून सीरियन सरकारच्या लष्करी तळावर हल्ला सुरू केला. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीट करून मोहीम फत्ते झाल्याचं सांगितलं.

सीरियन सरकारच्या ताब्यात असलेल्या रासायनिक शस्त्रास्त्रे असणाऱ्या साइटवर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 3 नागरिक जखमी झाल्याचा दावा सीरियाने केला आहे.

दरम्यान सीरियात या हल्ल्याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत शिवाय हा हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन आहे, अशी टीका सीरियाने केली.

शनिवारी सकाळी सीरियन नागरिकांना जाग आली तीच स्फोटांच्या आवाजाने. भारतीय वेळेनुसार सकाळी हे हल्ले करण्यात आले. आतापर्यंत नेमकं काय काय झालं याचे वेळेनुसार अपडेट्स खाली वाचा.

Image copyright Getty Images

गेल्या आठवड्यात डूमा येथे झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हा हल्ला झाला, असं सांगितलं जात आहे.

या हल्ल्याच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेला संबोधित केलं. अमेरिका, फ्रान्स आणि युनायटेड किंगडम या देशांच्या संयुक्त फौजा डूमा शहराकडे कूच करत आहेत असं त्यांनी म्हटलं.

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.00

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी ही मोहीम यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी फ्रान्स आणि ब्रिटनचे आभार मानले आहेत.

रात्री झालेली हल्ल्याची कार्यवाही ठरल्याप्रमाणे झाली, असं ते लिहितात.

"आमच्या सैन्याचा मला अभिमान आहे. लक्षावधी डॉलर खर्च केल्यानंतर अमेरिकेच्या इतिहासात ही सेना सर्वांत बलवान सेना बनली आहे. आमच्या सैन्याच्या आसपाससुद्धा कुणी नाही", या अर्थाचं त्यांनी ट्वीट केलं.

भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.00

सीरियामधल्या बशर अल असदच्या सरकारविरोधात आतापर्यंत अनेक वेळा गृहयुद्ध आणि अंतर्गत संघर्ष झाले आहेत. यातल्या अनेक असद विरोधकांना असं वाटत होतं की, मित्रराष्ट्रांच्या हवाई हल्ल्यानंतर असद यांचं सरकार कमकुवत होईल. पण ग्राउंड रिपोर्ट काही वेगळं सांगतो आहे.

सीरियातून मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांचे नेते मोहम्मद अलौश यांनी पाश्चिमात्य देशांचा हा हल्ला निष्प्रभ ठरल्याचं वक्तव्य केलं आहे. मोहम्मद अलौश हे जैश-अल- इस्लाम या संघटनेचे नेते आहेत.

दुपारी 2.44

दरम्यान या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले असल्याचं सीरियाची शासकीय वृत्तसंस्था सानाने म्हटलं आहे. या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे की, "होम्स प्रांतावर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. या क्षेपणास्त्रांचा मार्ग बदलण्यात आला आहे. पण यात 3 नागरिक जखमी झाले आहेत."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भविष्यात कुणी रासायनिक हल्ले करू नयेत, यासाठीच ही कारवाई करण्यात येत आहे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार प्रशिक्षण सुविधा आणि प्रयोगशाळा असलेल्या एका इमारतीचं मोठं नुकसान झालं आहे. तर उत्तर दमास्कस इथल्या सायंटिफिक स्टडीज अँड रीसर्च सेंटरवर झालेल्या हल्ल्यात किरकोळ नुकसान झालं आहे, असं शासकीय वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे.

Image copyright AFP

सीरियाची राजधानी दमास्कच्या परिसरात स्फोट झाल्याचं वृत्त देण्यात आलं आहे.

भारतीय वेळेनुसार दुपारी 1.13

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत तीन ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत.

  1. रासायनिक आणि जैविक हत्यारांचे उत्पादन होणाऱ्या सीरियन प्रयोगशाळेवर हल्ला करण्यात आला आहे.
  2. होम्स या ठिकाणी असलेल्या रासायनिक शस्त्रास्त्रे साठ्यावर हल्ला करण्यात आला आहे.
  3. होम्सजवळ असलेल्या रासायनिक शस्त्रास्त्र साठा आणि महत्त्वपूर्ण नियंत्रण कक्षावर हल्ला झाला आहे.

अमेरिकेने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अमेरिकेने हल्ला केलेल्या किमान 12-13 मिसाइल्सला सीरियन लष्कराने निकामी केलं असल्याचं वृत्त सीरियाच्या सरकारी वृत्त वाहिनीनं दिलं आहे.

या कारवाईमध्ये अद्याप जीवितहानी झाली नाही, असं अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटिस यांनी म्हटलं आहे.

या हल्लाचं सध्याचं स्वरूप वन टाइम शॉट म्हणजेच फक्त एक वेळा करण्यात आलेला हल्ला असं आहे. या कारवाईमुळे सीरियाला योग्य शब्दांत संदेश मिळाला आहे, असं मॅटिस यांनी म्हटलं आहे.

दुपारी 1 वाजून 07 मिनिटांनी - इराणकडून निषेध

अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचा इराणनं निषेध केला आहे. इराण हा सीरियाचा मित्र आहे. सीरियाच्या गृहयुद्धामध्ये इराणनं सीरियाला मदत केली आहे.

या घटनेचे या भागात गंभीर पडसाद उमटतील, असा इशारा इराणनं दिला आहे. सीरियात झालेला रासायनिक हल्ला सीरियानेच केला याला अमेरिकेकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न इराणच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते बेहराम घासेमी यांनी विचारला आहे. सीरियाला स्पष्टीकरण देण्याची संधीही मिळाली नाही, असं ते म्हणाले.

नागरिकांना इजा नाही : डनफोर्ड

जनरल जोसेफ डनफोर्ड यांनी हल्ले थांबले असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, "हल्ले करताना टार्गेट निवडतानाच रशियन सैन्याची जीवितहानी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली होती."

Image copyright Getty Images

डनफोर्ड म्हणाले, "सीरिया सरकारची रासायनिक हल्ल्यांची क्षमता संपण्यासाठी या हल्ल्याचं नियोजन करण्यात आलं होतं. त्यांनी केलेलं संशोधन, माहिती आणि महागडी शस्त्रास्त्र, साधनं या हल्ल्यात नष्ट झाली आहेत. हा हल्ला फक्त इशाराच नव्हता तर नागरिकांना कोणतीही इजा न होता सीरियाच जास्तीजास्त नुकसान करण्यात आलं आहे."

भारतीय वेळेनुसार दुपारी 12.23

रशियाचे सैन्य सीरिया सरकारच्या मदतीसाठी सीरियात आहे. पण या हल्ल्यांबद्दल रशियाला कोणतीही पूर्वी कल्पना देण्यात आली नव्हती, असं पेंटागॉनने म्हटले आहे.

युनायटेड किंगडमने केलेल्या हल्ल्यात चार टोरनॅडो जेट्स वापरण्यात आले. होम्स या शहराजवळील लष्करी तळांवर हा हल्ला झाला. यूकेतील संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी रासायनिक शस्त्रांसाठीचे आवश्यक वस्तूंचे साठे होते.

फ्रान्सचे राष्ट्रध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्स या कारवाईत सहभागी असल्याचं म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातील रासायनिक हल्ल्याबद्दल ते म्हणाले होते की, "रासायनिक शस्त्रांच्या साहायने अनेक पुरुष, महिला आणि मुलं मारले गेली. आता सीमा ओलांडली गेली आहे."

Image copyright AFP
प्रतिमा मथळा फ्रान्सच्या संरक्षण मंत्रालयाने सीरियावर डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचं छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे.

सकाळी 11.47 : आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन : सीरिया

सीरियातील सरकारी माध्यमांनी हा हल्ला म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असल्याची टीका केली आहे. सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी साना न्यूजने म्हटलं आहे की, दहशतवादी अपयशी ठरल्यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी हस्तक्षेप करत सीरियाच्या विरोधात आगळीक केली आहे. पण यात त्यांना अपयशच येईल.


विश्लेषण : असद यांच्यात काही बदल होईल का? जॉनथन मार्कस, संरक्षण प्रतिनिधी

एका वर्षापूर्वी अमेरिकेनं सीरियाच्या हवाई तळावर हल्ला केला होता त्यापेक्षा या हल्ल्याची तीव्रता जास्त आहे. गेल्या वर्षी 59 क्षेपणास्त्रांचा वापर झाला होता. या वेळी त्यापेक्षा जास्त क्षेपणास्त्र या वेळी वापरण्यात येत आहेत.

अमेरिकेचा हल्ला सध्या थांबला असला तरी अमेरिकेनं असद यांना इशारा दिला आहे. जर तुम्ही पुन्हा रासायनिक हल्ले कराल तर कारवाई होईल, असा हा संदेश देण्यात आला आहे.

असं असलं तरी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या हल्ल्यानंतर असद यांच्या वागणुकीत बदल होईल का? गेल्या वर्षी हल्ला करण्यात आला होता तरी देखील त्यांची वर्तणूक बदलली नव्हती.


ट्रंप म्हणाले, "सीरिया सरकारच्या रासायनिक हल्ल्यांच्या क्षमतेशी संबंधित असलेल्या लष्करी तळांवर हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत."

ट्रंप म्हणाले, "या हल्ल्यांचा उद्देश रासायनिक शस्त्रांचा वापर आणि प्रसाराला चाप लावणे हाच आहे."

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, "हे काम माणसाचं नाही. हे गुन्हे राक्षसच करू शकतो."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ - आम्ही आमच्या मित्रराष्ट्रांसोबत काम करत आहोत - थेरेसा मे

सीरियाने हे रासायनिक हल्ले केल्याचा इन्कार केला आहे. तर सीरियाचा सहकारी असलेल्या रशियाने पाश्चात्य राष्ट्रांनी हल्ला केला तर त्याची परिणती युद्धात होईल, असा इशारा दिला होता.

या हल्ल्यासाठी टॉमाहॉक या क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात येत असल्याचं अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.

सीरियाची राजधानी दमास्कस या ठिकाणी हल्ला झाल्याचं वृत्त सीरियन वाहिनीनं दिलं आहे. किमान सहा ठिकाणी हल्ला झाला आहे असं दमास्कसमधील प्रत्यक्षदर्शीनं वृत्तवाहिनीला सांगितलं आहे.

सीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दमास्कसवर हल्ला झाल्याला दुजोरा दिला आहे. सीरियाने हवाई संरक्षण सिद्ध केलं असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. तसेच सरकारी फौजांनी काही क्षेपणास्त्रं पाडली असल्याचं म्हटलं आहे.

ब्रिटनमधील संस्था सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने सिरियाच्या राजधानीमधील सीरियन सायंटिफिक रीसर्च फॅसिलिटी आणि इतर लष्करी तळांना या हल्ल्यांचा फटका बसला असल्याचे म्हटलं आहे.

रशियाचं म्हणणं काय?

सीरिया सरकारचे मुख्य सहकारी राष्ट्र असलेल्या रशियाने या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशा हल्ल्यांचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया रशियाच्या अमेरिकेतील दूतावासाने दिली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी केलं शांततेचं आवाहन

सध्या सुरू असलेल्या हल्ल्याच्या परिस्थितीचा आपण सातत्यानं आढावा घेत आहोत असं संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अॅंटोनिओ गुटेरस यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या पाच कायमस्वरुपी सदस्यांपैकी तीन सदस्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांनी संयुक्त राष्ट्राने आखलेल्या नियमांशी बांधिलकी जपावी असं आवाहन गुटेरस यांनी केलं.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अॅंटोनिओ गुटेरस

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता राखणं हे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीच्या कर्तव्य आहे. सर्वांनी एकत्र येऊन जबाबदारीपूर्ण वर्तन करावे असं गुटेरस म्हणाले.

सीरियाच्या लोकांची परिस्थती गंभीर होऊ नये आणि युद्धजन्य स्थिती आणखी चिघळू नये म्हणून आपण सर्वांनी खबरदारी घ्यायला हवी अशी विनंती गुटेरस यांनी केली.

सीरियात झालेल्या कथित रासायनिक हल्ल्याचा तपास होऊ शकला नाही त्यामुळं आपण नाराज झालो आहोत असं ते म्हणाले. रशिया आणि अमेरिकेनं एकमेकांविरोधात आपला नकाराधिकार वापरल्यामुळं चौकशी समितीची स्थापना होऊ शकली नव्हती.

सीरियन नागरिकांना त्रास नको : अमेनस्टी इंटरनॅशनल

अमेनस्टी इंटरनॅशनल या संस्थेने अमेरिका आणि मित्रराष्ट्रांना सीरियातील नागरिकांचे संरक्षण करण्याचे आवाहन केलं आहे.

अमेन्स्टी इंटरनॅशनलचे पदाधिकारी रईद जरार म्हणाले, "सीरियातील नागरिक गेली 6 वर्षं हल्ल्यांना तोंड देत आहे. युद्धगुन्हे म्हणता येतील अशा रासायनिक हल्ल्यांचाही यात समावेश आहे. लष्करी कारवाईत नागरिकांना कमीतकमी त्रास होईल, याची खबरदारी घेतली पाहिजे. इथलं लोक आधीच दहशतीखाली जगत आहेत. सरकारच्या कथित गुन्ह्यांची शिक्षा नागरिकांना होऊ नये."

सीरियात नागरिकांची निदर्शने

अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या हल्ल्यानंतर दमास्कसमध्ये नागरिकांनी निदर्शने सुरू केली आहेत.

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा दमास्कसमध्ये सीरियाचा झेंडा फडवताना नागरिक
Image copyright Reuters
प्रतिमा मथळा दमास्कस इथं विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावर असद यांचं पोस्टर उभारण्यात आलं.
Image copyright Reuters
प्रतिमा मथळा अमेरिकेच्या हल्ल्यांविरोधात दमास्कसमध्ये नागरिकांनी राग व्यक्त केला.

रासायनिक हल्ल्यांची चौकशी सुरू

द ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वीपन्स ही संस्था डुमामध्ये काय घडल याचं सत्यशोधन करणार आहे. शनिवारी 14 एप्रिलला या संघटनेची टीम आपलं काम सुरू करेल. रसायनिक शस्त्रांचा उपयोग झाला का आणि नेमकं काय घडलं याचा तपास करण्यात येणार आहे, असं या संस्थेनं ट्वीट केलं आहे.

जगभरातून प्रतिक्रिया काय आहेत?

सीरियावर केलेल्या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. नाटोचे सचिव जेन स्टॉल्टेनबर्ग यांनी या हल्ल्याला पाठिंबा दिला असून रासायनिक शस्त्रास्त्रं वापरणाऱ्यांना धडा शिकवला गेला पाहिजे असं विधान त्यांनी केलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हल्ल्याला पाठिंबा दिला आहे. नेहमी ट्रंप यांच्या धोरणावर टीका करणारे सिनेट आर्म्ड सर्व्हिस कमिटीचे अध्यक्ष जॉन मॅक केन यांनी ट्रंप यांना पाठिंबा दिला आहे. ट्रंप यांच्या या पावलाचं त्यांनी स्वागत केलं आहे.

रासायनिक शस्त्रास्त्रांची 100 वर्षं

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पहिल्या महायुद्धापासून सीरियापर्यंत - पाहा रासायनिक शस्त्रास्त्रांची शंभर वर्षं

ही ब्रेकिंग न्यूज अपडेट केली जात आहे. अधिक तपशील थोड्याच वेळात प्रसिद्ध करण्यात येईल. बातमी पूर्ण वाचण्यासाठी हे पेज रीफ्रेश करा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)