सीरिया हल्ला : मोदी सरकारसाठी का ठरणार डोकेदुखी?

नरेंद्र मोदी Image copyright AFP

सीरियावर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी हल्ला केल्यानंतर त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. या हल्ल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यानंतर तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते, ज्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थाला बसू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे.

देशात अनेक राज्यांत निवडणुका होणार आहेत, तसेच पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. या भाववाढीचा परिणाम निवडणुकांवर देखील होऊ शकतो.

अमेरिका सीरियावर कधीही हल्ला करेल, अशी शक्यता दहा दिवसांपासून होती. त्यामुळं कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळाली.

म्हणून जेव्हा पण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याबाबत ट्वीट करत होती त्याचा थेट परिणाम तेलाच्या किमतीवर दिसू लागला होता. आता सीरियावर लष्करी कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता तेलाच्या किमतीत वाढ दिसत आहे. तेलाची किंमत पाच डॉलर प्रती बॅरलनं वाढली आहे.

तसं पाहायला गेलं तर नरेंद्र मोदी यांचं सरकार नशीबवान होतं. जेव्हा त्यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा तेलाची किंमत स्वस्त होती आणि 2015मध्ये तेलाची किंमत प्रती बॅरल 40 डॉलर इतकी झाली होती.

तेलाच्या कमी किमतीमुळं सरकारला वित्तीय तूट भरून काढण्यास आणि महागाईवर नियंत्रण आणण्यास मदत मिळाली. आता युद्धजन्य स्थिती आल्यावर तेलाच्या किमतीत वाढ होईल आणि सरकारला अडचणींचा सामना करावा लागेल.

सौदी अरेबिया, इराक, इराण, ओमान आणि युएईमध्ये जे काही घडतं त्याचे राजकीय पडसाद उमटतात. मध्य पूर्व आशियात होणाऱ्या घटनांचे परिणाम तेलाच्या किमतीवर होतात.

Image copyright EPA

इराक आणि कतारमध्ये अमेरिकेनी तेलसाठ्यांमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक केली आहे. जर तिथं सीरियानं हल्ले केले तर परिस्थिती चिघळू शकते. ते इथं हल्ला करतात की नाही याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.

सीरिया आणि रशिया पुढचं पाऊल काय उचलतील यावर तेलाच्या किमती अवलंबून आहेत, असं मत भाजपशी संबंधित ऊर्जा तज्ज्ञ नरेंद्र तनेजा यांनी व्यक्त केलं.

सीरिया तेल निर्यात करत नाही पण या देशाचं त्या क्षेत्रात असलेलं महत्त्वाचं भौगोलिक स्थान पाहता भारतावर या युद्धाचा परिणाम होऊ शकतो असं तनेजा सांगतात.

सीरियावरील हल्ल्यामुळं सध्या तेलाची किंमत 72 डॉलर प्रती बॅरल झाली आहे. भारताला लागणारं 83 टक्के तेल आयात केलं जातं, त्यातील दोन तृतीअंश तेल हे आखाती देशातून आयात केलं जातं. याचाच अर्थ त्या भागात घडणाऱ्या घटनामुळं तेलाच्या किमतीवर प्रभाव पडू शकतो.

सौदी अरेबियाला फायदा

या युद्धामुळं सौदी अरेबिया, अमेरिका, नायजेरिया, युएई, व्हेनेझुएला, रशिया, इराण, इराक आणि अंगोला या देशांना आर्थिक फायदा होऊ शकतो. सीरियाला या युद्धामुळं नुकसान होत आहे पण त्यांचा साथीदार रशियाला युद्धामुळं फायदा होऊ शकतो. रशिया जगातील मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. रशियात अंदाजे 10 अब्ज डॉलर तेलाचं उत्पादन होतं तितकंच उत्पादन सौदी अरेबियामध्ये होतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)