...तर सीरियावर पुन्हा हल्ला : अमेरिकेचा इशारा

सीरिया हल्ला Image copyright AFP

अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटत आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत समर्थन मिळवण्यात अपयश आलं आहे तर दुसरीकडे अमेरिकेने रासायनिक हल्ले रोखण्यासाठी गरज पडल्यास सीरियावर पुन्हा हल्ला करू असं स्पष्ट केलं आहे.

"सीरियातल्या डुमामधल्या संदिग्ध अशा रासायनिक हल्ल्याला उत्तर म्हणून पश्चिमात्य देशांनी केलेला क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे दादागिरी आहे," असं रशियाचे प्रतिनिधी वसीली नेबेंजिया यांनी म्हटलं आहे.

सीरियात झालेल्या मिसाईल हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.

कथित रासायनिक हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी होण्यापूर्वी पाश्चिमात्य राष्ट्रांनी हा हल्ला केला असं ते म्हणाले. "हे सर्व काही एका विशिष्ट मार्गानं करण्यात आलं आहे. यात इतरांना चिथावण्यात आलं आहे. खोटे आरोप लावण्यात आले आहेत आणि निर्णय घेऊन शिक्षा देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय मुद्दे या तऱ्हेनं सोडवायला हवेत, असं तुम्हाला वाटतं का? अण्विकदृष्ट्या प्रबळ अशा दोन राष्ट्रांविषयी आपण बोलत आहोत. शिवाय आपण हे लक्षात घ्यायला हवं की आंतराष्ट्रीय मुद्द्यांबाबत केलेली ही दादागिरी आहे," असं ते म्हणाले.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा निक्की हैली

पण अमेरिकेच्या प्रतिनिधी निक्की हैली यांनी म्हटलं आहे की, रासायनिक शस्त्रांचा वापर थांबवण्यासाठी गरज पडल्यास अमेरिका पुन्हा हल्ला करण्यास तयार आहे.

"कालच्या सैन्य कारवाईतून आम्ही दिलेला संदेश एकदम स्वच्छ आहे. तो म्हणजे अमेरिका सीरियाला, असद सरकारला रासायनिक शस्त्रांचा वापर करू देणार नाही. ज्या तळांचा वापर रासायनिक हल्ल्यांसाठी वापर होत होता, ती अमेरिकेने या हल्ल्यात नष्ट केली आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं म्हणणं आहे की, सीरियानं पुन्हा या गॅसचा वापर केला तर अमेरिका त्याचं उत्तर देण्यासाठी पूर्णत: तयार आहे," असं हैली म्हणाले.

Image copyright AFP GETTY
प्रतिमा मथळा बशर जाफरी

सुरक्षा परिषदेच्या या आपत्कालीन बैठकीत सीरियाचे राजदूत बशर जाफरी यांनी अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन या देशांचा उल्लेख खोटारडे असा उल्लेख केला.

"माझ्या देशावर हल्ला करण्यापूर्वी तुमच्या सरकारांनी या संघटनेकडून, आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता घेतली होती का? सीरिया रासायनिक शस्त्रास्त्र बनवत असलेल्या तळांवर हल्ला केल्याचं सांगण्यात येतं. या देशांना इतकी सखोल माहिती होती तर त्यांनी ती ओपीसीडब्ल्यू (ऑगनाइज़ेशन फ़ॉर प्रोहिबिशन ऑफ़ केमिकल वीपन्स) यांना का पुरवली नाही? या हल्ल्यापूर्वी त्यांनी ही माहिती दमास्कसमध्ये फॅक्ट-फायंडिंग मिशनला का दिली नाही?"

Image copyright Reuters
प्रतिमा मथळा वसीली नेबेंजिया

यावर अमेरिकेचे उपराष्ट्रध्यक्ष माईक पेन्स यांनी पेरूची राजधानी लीमा इथे पत्रकारांना सांगितलं की, अमेरिकेनं या हल्ल्यासाठी स्वतःच्या इंटेलीजन्सचा वापर केला होता.

त्यांनी सांगितलं की, "अशा स्थितीत पुरावे गोळा करणं अवघड काम असतं. पण रासायनिक हल्ला सीरिया सरकारनेच केला होता, हे मोठ्या प्रयत्नानंतर निष्पन्न झालं. अजूनही या हल्ल्याची चौकशी सुरू आहे. या हल्ल्यात सेरेन गॅसचा वापर करण्यात आला होता, असा आमचा निष्कर्ष आहे."

संयुक्त राष्ट्राचे महासचिव अॅंटोनिओ गुटेरस यांनी या संपूर्ण घटनेच वर्णन 'गंभीर परिस्थिती' असं करत संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)