'ते स्त्रियांना मांसाच्या तुकड्यांसारखं वागवतात' : डोनाल्ड ट्रंप यांच्याबद्दल 5 खळबळजनक दावे

डोनाल्ड ट्रंप Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा डोनाल्ड ट्रंप

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे नैतिकदृष्ट्या पदावर राहण्यास अयोग्य आहेत, असा आरोप अमेरिकेच्या तपास संस्था FBIचे माजी संचालक जेम्स कॉमी यांनी केल्यानंतर खळबळ उडाली आहे.

"ट्रंप हे एखाद्या माफिया डॉनप्रमाणे आहेत," असा आरोप कॉमी यांनी "A Higher Loyalty' या पुस्तकात केला आहे. या आरोपाबरोबरच त्यांनी काही दावे केले आहेत, ज्यांची सर्वत्र चर्चा होत आहे.

राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ट्रंप यांनी काही महिन्यांतच कॉमी यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर कॉमी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

"माझ्यावर असलेल्या रागातूनच कॉमी यांनी हे पुस्तक लिहिलं आहे," असं ट्रंप यांनी ट्वीट केलं. तसंच कॉमी हे खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत, असं ते म्हणाले.

कॉमी यांचं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ABC न्यूजला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत कॉमी यांनी ट्रंप यांच्याबाबत केलेल्या सहा खळबळजनक दाव्यांचा हा आहे सारांश -

1. राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मानसिक स्थिती योग्य नाही, असे आरोप यापूर्वी झाले आहेत. या आरोपात काही तथ्य आहे का, असा प्रश्न ABC न्यूजचे अॅंकर जॉर्ज स्टेफानॉपॉलस यांनी केला. त्याला उत्तर देत कॉमी म्हणाले, की ट्रंप यांना स्मृतिभ्रंश झाला आहे किंवा ते पदावर राहण्यास मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत, असं मी म्हणणार नाही. पण त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावर राहण्याचा "नैतिक अधिकार नाही".

पुढं ते सांगतात, "ट्रंप हे सातत्यानं खोटं बोलत आहेत. राष्ट्रीय सुरक्षेसारख्या मोठ्या विषयांवरही ते लोकांना अंधारात ठेवतात आणि लोकांकडून अपेक्षा करतात की त्यांनी त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवावा. ते स्त्रियांचा आदर करत नाहीत, त्यांना ते मांसाच्या तुकड्यांसारखं वागवतात. अशा व्यक्तीला राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही."

2. माफिया डॉन सारखं वागतात?

कॉमी यांनी या आधी अमेरिकेतील कुख्यात गॅंबिनो माफिया घराण्याचा बिमोड करण्यात भूमिका बजावली होती.

"ट्रंप यांच्याबरोबर काम करताना मला माझ्या अगोदरच्या कामाची आठवण झाली," कॉमी सांगतात. "सगळीकडे सुन्न शांतता आणि डॉन सांगेल तीच पूर्व दिशा, अशी तिथं परिस्थिती आहे. त्यांच्याकडे नैतिकतेला आणि सत्याला काहीही किंमत दिली जात नाही. आपल्या नेत्याप्रती निष्ठाच सर्वांत महत्त्वाची."

ट्रंप यांची डॉनसोबत केलेली तुलना अतिशयोक्तीपूर्ण वाटत नाही का, असा प्रश्न त्यांना ABC च्या न्यूज अॅंकरनं विचारला असता ते सांगतात, "मला तसं वाटत नाही. मी अत्यंत जबाबदारीनं हे विधान करत आहे."

"मला वाटतं ट्रंप यांच्या कारभाराची तुलना माफिया डॉनच्या कारभाराशी होऊ शकते. आपला वचक राहावा म्हणून ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. ट्रंप हे रस्त्यावर लोकांचे हात-पाय तोडत आहेत आणि दुकानदारांना धमकावत आहेत, असं मला वाटतं. आपल्या साथीदारांनी इतर कुणापेक्षाही आपल्याशी प्रामाणिक राहावं, असं त्यांना वाटतं," कॉमी सांगतात.

3. रशियात रूममध्ये वेश्या?

ट्रंप यांचा भूतकाळ उकरून काढण्यासाठी ट्रंप यांच्या विरोधकांनी एका ब्रिटिश गुप्तहेराला त्यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगितल होतं.

2013 मध्ये रशियाच्या दौऱ्यावर असताना ट्रंप यांनी त्यांच्या रूममध्ये वेश्यांना बोलवलं होतं ही माहिती त्या गुप्तहेरानं आपल्या अहवालात लिहिली आहे. ब्रिटिश गुप्तहेराच्या अहवालातला प्रसंग नंतर लीक झाला आणि याची चर्चा सर्वत्र झाली.

ट्रंप यांनी हे आरोप फेटाळले होते. पण ही गोष्ट FBI ला कळली.

Image copyright Getty Images

या प्रसंगाबद्दल ट्रंप यांनी आपल्याकडे किमान चार वेळा विचारणा केली, असं कॉमी म्हणतात. ब्रिटिश गुप्तहेरानं आपल्या अहवालात काय लिहिलं आहे, हे सांगितल्यावर ट्रंप कॉमी यांच्यावरच भडकले.

"मला असं वागण्याची काय गरज आहे?" असा प्रश्न ट्रंप यांनी कॉमींना विचारला. रशियामध्ये असा प्रसंग घडला नाही, अशीच भूमिका FBI ने घ्यायला हवी, असं त्यांनी कॉमींना सांगितलं. "हे माझ्या पत्नीला कळलं तर तिला आवडणार नाही, असं देखील ते म्हणाले होते," असं कॉमी म्हणाले.

4. ट्रंप यांची हकालपट्टी करावी का?

या सगळ्या प्रकरणानंतर ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवण्याची आवश्यकता नाही, असं कॉमी सांगतात. "डोनाल्ड ट्रंप आज व्हाईट हाऊसमध्ये आहेत, ते अमेरिकन नागरिकांमुळे. लोकांना त्यांची चूक कळायला हवी."

"जर ट्रंप यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना काढलं तर लोकांना चूक कळणारच नाही. त्याऐवजी अमेरिकन नागरिकांनी त्यांना मतदानाने बाहेर काढावं," असं कॉमी यांना वाटतं.

Image copyright AFP/Getty Images
प्रतिमा मथळा जेम्स कॉमी, माजी एफबीआय संचालक

5. ट्रंप यांचे हात आणि केस

ट्रंप यांची उंची 6 फूट 3 इंच आहे तर कॉमी त्यांच्यापेक्षा 6 इंच जास्त उंच आहेत, म्हणजेच, 6 फूट 8 इंच. पण कॉमी म्हणतात की ते टीव्हीवर जितके उंच दिसतात, प्रत्यक्षात ते त्यापेक्षा जास्त उंच आहेत.

"त्यांचा चेहराही थोडा नारिंगी होता," कॉमींनी पुस्तकात लिहिलंय. "त्यांच्या डोळ्यांखाली पांढरे चट्टे आहेत. आणि त्यांचे ब्लाँड केस खरोखरंच त्यांचे आहेत, याची मला तेव्हा खात्री पटली."

यावर आपल्या टीव्ही मुलाखतीदरम्यान बोलताना ते म्हणाले, "त्यांचा टाय नेहमीप्रमाणे खूपच लांब होता. आणि जवळून पाहिल्यावर ते आणखीनच नारिंगी दिसतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)