...जेव्हा व्हॅटिकनमध्ये भरते भूत उतरवण्याची शाळा

पोप Image copyright Getty Images

जगभरातल्या कॅथलिक समुदायात मांत्रिकांची मागणी सतत वाढत असल्यामुळे व्हॅटिकनमध्ये तंत्रविद्येचा एक कोर्स घेण्यात येत आहे. हा कोर्स शिकण्यासाठी नवी बॅच व्हॅटिकनमध्ये नुकतीच दाखल झाली आहे.

एखाद्या शरीराला भूतानं पछाडलं आहे का? असल्यास ते 'झाड' कसं मुक्त करायचं? याचं शिक्षण या कोर्समधून देण्यात येणार आहे. या विद्येला 'एक्सॉरसिजम' असं म्हटलं जातं.

'एक्सॉरसिजम' शिकण्यासाठी जगभरातल्या 50 देशांतून 250 धर्मगुरू व्हॅटिकनमध्ये दाखल झाले आहेत.

तंत्रविद्येत निपुण असणारे धर्मगुरू भावी मांत्रिकांना हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत.

या कोर्समध्ये तंत्रविद्येची तत्त्वं, मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्रीय पार्श्वभूमी देखील शिकवण्यात येणार आहे.

हॉलिवूड चित्रपटांमध्ये तंत्रविद्येचं जे चित्रण केलं जातं त्यामुळं तंत्रविद्या ही शाखा वादग्रस्त ठरली आहे. पण, तंत्रविद्येच्या नावाखाली काही धार्मिक पंथातील लोकांनी पीडितांवर अत्याचार केले आहेत ही बाब आपल्याला नाकारता येणार नाही.

कोर्सचं स्वरुप काय?

हा कोर्स एकमेवाद्वितीय आहे, असं व्हॅटिकनच्या अधिकाऱ्यांना वाटतं. तंत्रविद्या म्हणजे काय? भूतबाधा काढण्यासाठी नेमक्या कोणत्या प्रार्थना म्हणाव्यात हे या कोर्समधून शिकवण्यात येणार आहे.

Image copyright AFP
प्रतिमा मथळा 'एक्सॉरसिजम' शिकण्यासाठी जगभरातल्या 50 देशांतून 250 धर्मगुरू व्हेटिकनमध्ये दाखल झाले आहेत.

2005 साली पहिल्यांदा हा कोर्स सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत या कोर्सला प्रवेश घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या कोर्सची फी अंदाजे 24,000 रुपये इतकी आहे.

'भूतबाधा झाली तर मांत्रिकाकडे पाठवा'

या कोर्सला जगभरातून मागणी आहे. कारण अनेक देशांमध्ये भूतबाधेच्या केसेस वाढताना दिसत आहेत. त्यामुळे मांत्रिकांना मागणी वाढत आहे, असं ख्रिश्चन धर्मगुरूंचं म्हणणं आहे.

जर एखाद्या व्यक्तीला खरंच आधिदैविक त्रास किंवा भूतबाधा झाली आहे असं वाटत असेल तर त्याला मांत्रिकाकडे पाठवा, असं आवाहन गेल्या वर्षी पोप फ्रान्सिस यांनी धर्मगुरूंना केलं होतं.

Image copyright AFP

2017मध्ये इटलीतील 5 लाख लोकांनी मांत्रिकांची सेवा घेतली असं 'थिओस' या ख्रिश्चन थिंक टॅंकनं म्हटलं आहे. तसंच, युनायटेड किंगडममध्ये सुद्धा मांत्रिकाची सेवा घेण्याचं प्रमाण वाढलं आहे.

काही स्थानिक चर्चनं ही वाढती मागणी लक्षात घेऊन आपल्या आवश्यकतेनुसार कोर्स बनवला आहे. अशा प्रकारचे कोर्स इटलीत सिसिली आणि अमेरिकेत शिकागोमध्ये चालतात.

या कोर्सच्या लोकप्रियतेचं कारण काय? असं फादर गॅरी थॉमस यांना बीबीसीनं विचारलं. ते सांगतात, "अलीकडच्या काळात देवापेक्षा लोकांची भिस्त समाजशास्त्रांवर आहे. लोकांचा ख्रिश्चन धर्मावरचा विश्वास कमी होत आहे, त्यामुळं ते अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत."

गॅरी थॉमस हे देखील एक मांत्रिक आहेत. त्यांना तंत्रविद्येचा 12 वर्षांचा अनुभव आहे. बऱ्याच केसेसमध्ये तंत्रिवद्येची खूप कमी आवश्यकता असते असं ते सांगतात.

Image copyright Getty Images

"आतापर्यंत मी 180 प्रकरणं हाताळली आहेत, त्यापैकी फक्त 12 प्रकरणांमध्ये मला 'अस्सल तंत्रविद्ये'चा वापर करावा लागला," असं ते सांगतात.

तंत्रविद्येचा वापर करायचा असेल तर त्यासाठी धर्मगुरूंना बिशपकडून परवानगी घ्यावी लागते. अस्सल तंत्रविद्येमध्ये काही विशिष्ट मंत्र असतात. या मंत्रांद्वारे भूताला त्या व्यक्तीच्या शरीरातून बाहेर जाण्याचा आदेश दिला जातो अशी धारणा आहे.

"अलीकडच्या काळात टॅरो कार्ड आणि काळ्याजादूचा वापर वाढला आहे. त्यामुळे देखील लोकांचा ओढा तंत्रविद्येकडे वाढला आहे," असं इटालियन धर्मगुरू बेनिग्नो पलिल्ला यांनी व्हॅटिकन न्यूजला सांगितलं.

1999मध्ये कॅथलिक चर्चनं पहिल्यांदा तंत्रविद्येच्या नियमावलीत बदल केले होते. 1614 पासून 1999 पर्यंत या नियमावलीत कुठलाही बदल करण्यात आला नव्हता.

यानंतर आधिदैविक प्रश्न, शारीरिक प्रश्न आणि मानसशास्त्रीय प्रश्नांचं वर्गीकरण करण्यात आलं. त्यांनंतर जेव्हा पण एखादी केस धर्मगुरूंकडे येते तेव्हा ते आधी डॉक्टरांचा सल्ला घेतात. जर त्यांच्याकडून तो प्रश्न सोडवला गेला नाही तर बिशपच्या परवानगीनं तंत्रविद्येचा वापर केला जातो.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एक्सॉरसिजमचा वापर करायचा असेल तर बिशपची परवानगी घ्यावी असा नियम आहे.

गॅरी थॉमस यांच्या टीममध्ये देखील डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ आहेत. एखाद्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे की नाही याचं निदान करण्याआधी ते डॉक्टरांचा सल्ला घेतात. शेवटचा उपाय म्हणून तंत्रविद्येचा वापर केला जातो असं ते सांगतात.

नेमका विधी काय आहे?

तंत्रविद्येचा वापर करण्याची पद्धत कॅथलीक चर्चनी आखून दिली आहे. विधीच्या वेळी धर्मगुरूचा पोशाख कसा असावा या विषयी चर्चनी सूचना दिल्या आहेत.

ज्या व्यक्तीला भूतबाधा झाली आहे त्या व्यक्तीला आवश्यकता असल्यास बांधून ठेवलं जातं आणि या विधीच्या वेळी पवित्र पाण्याचा वापर केला जातो.

विधी पूर्ण होईपर्यंत धर्मगुरूच्या हातात क्रॉस असतो. व्यक्तीच्या शरीराला क्रॉसचा स्पर्श न होऊ देता त्या व्यक्तीच्या शरीरावरून तो फिरवला जातो.

Image copyright AFP-UPI
प्रतिमा मथळा ख्रिश्चन समुदायातले काही पंथ पीडित व्यक्तीचं आणि बालकांचं शोषण करतात, अशी टीका देखील होते.

ख्रिश्चन धर्मातील संतांना आवाहन केलं जातं. बायबलमधल्या श्लोकांचं पठण केलं जातं. हे शरीर सोडून दे असं सैतानाला सांगितलं जातं.

येशू ख्रिस्ताला शरण ये असं धर्मगुरू त्या भूताला सांगतात. भूतानं त्या व्यक्तीच्या शरीराचा ताबा सोडला अशी खात्री धर्मगुरूला आली की भविष्यात त्याला भूतबाधा होऊ नये म्हणून प्रार्थना केली जाते.

तंत्रविद्या वादग्रस्त का आहे?

तंत्रविद्येवर टीका देखील केली जाते. याचं कारण म्हणजे, तंत्रविद्येच्या नावाखाली ख्रिश्चन समुदायातले काही पंथ पीडित व्यक्तीचं आणि बालकांचं शोषण करतात. काही वेळा तर हा विधी करताना पीडितांचा जीव देखील जातो.

ज्या लोकांना स्क्रिझोफ्रेनियासारखे आजार आहेत त्यांच्या आजाराचं निदान न करता त्यांच्यावर तंत्रविद्येचा प्रयोग झाल्यावर त्यांचं नुकसान होऊ शकतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)