जेव्हा मोदी लंडनमध्ये सांगतात 'सर्जिकल स्ट्राईक'ची कहाणी...

मोदी Image copyright Twitter/BJP4DELHI/BBC

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानला इशारा दिला. "दहशतवाद एक्सपोर्ट करणाऱ्यांना आता कळायला पाहिजे की भारत आता बदलला आहे," लंडनच्या वेस्टमिन्स्टरमधल्या सेंट्रल हॉलमध्ये 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात यूके राहणाऱ्या भारतीयांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मोदींनी या आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता सर्जिकल स्ट्राईकची कहाणी सांगितली. तसंच देशातल्या बलात्काराच्या वाढत्या घटनांबद्दलही भाष्य केलं. याबाबत चिंता व्यक्त केली. परराष्ट्र धोरण, शेतकऱ्यांचं घटतं उत्पन्न याबद्दल बोलल्यानंतर मोदी केअर, भारतीय लोकशाहीची ताकद अशा अनेक विषयांवर त्यांनी संवाद साधला.

सर्जिकल स्ट्राईक वर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "हा मोदी आहे. त्यांच्याच भाषेत उत्तर कसं द्यायचं हे त्याला चांगलंच माहिती आहे."

भारतीय लष्करानं 2016 मध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवर त्यांनी सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला होता. तेव्हा पाकिस्तानी सेनेने भारताच्या दाव्याचं खंडन करून सांगितलं की सीमेवरील कारवाई गोळीबारापर्यंतच मर्यादित होती.

आम्ही चूप का बसावं?

या मुद्द्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, "भारताचा इतिहास 'अजेय' राहण्याचा आहे. पण कोणाचा हक्क हिरावून घेणंसुद्धा भारताला मान्य नाही. पण जर कोणी दहशतवाद निर्यातीचा धंदा करत असेल, माझ्या देशातल्या नागरिकांचा जीव घेत असेल, युद्ध लढण्याची ताकद नाही म्हणून मागून हल्ला करत असतील तर हा मोदी आहे आणि त्याच भाषेत उत्तर देणं त्याला चांगलंच माहिती आहे."

मोदी पुढे म्हणाले, "आमचे जवान झोपले असताना काही लोकांनी त्यांची हत्या केली, तुम्हाला वाटतं का मी गप्प बसावं? त्यांना खरमरीत उत्तर द्यायला नको का? म्हणून सर्जिकल स्ट्राईक केला. मला आपल्या सेनेचा अभिमान आहे. जी योजना होती त्याची शंभर टक्के अंमलबजावणी केलीच आणि सूर्योदयाच्या आधी ते परतलेसुद्धा."

संपूर्ण जगाला माहिती देण्याआधी ही माहिती पाकिस्तानला दिली होती असंही मोदी म्हणाले.

ते म्हणाले, "आमचा प्रामाणिकपणा पाहा. मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, भारतात माहिती मिळण्याच्या आधी आज रात्री आपण काय केलंय याची माहिती तुम्ही पाकिस्तानी सेनेला द्या."

Image copyright Twitter/@PRINCEMEHRABJP

बलात्कारच्या घटनांबद्दल बोलताना ते म्हणाले, "एखाद्या लहान मुलीवर बलात्कार होणं किती दु:खद घटना आहे? पण मग आम्ही आमचं सरकार असताना किती बलात्कार झाले, तुमचं सरकार असताना किती बलात्कार झाले? असे आकडे सांगत बसायचे का? बलात्कार हा बलात्कारच असतो. तो आम्ही कसा सहन करू?"

"एखादी मुलगी जेव्हा घरी उशीरा येते तेव्हा तिला उशीरा येण्याची कारणं विचारली जातात. पण तेच प्रश्न उशीरा आलेल्या मुलाला विचारले जात नाही. ते पाप करणारा कोणाचा तरी मुलगाच आहे ना?" असं ते म्हणाले.

कॉमनवेल्थ देशांच्या प्रमुखांच्या संमेलनासाठी मोदी लंडनमध्ये आहेत. तेव्हा 'भारत की बात सबके साथ' या कार्यक्रमात अनेक मुद्दयांवर ते बोलत होते. आपल्या अनेक योजनांची माहिती देताना 'भारत अजेंडा सेट करतोय', असं सांगितलं.

भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेचा उल्लेख करताना ते म्हणाले, " मागच्या वेळी माल्टा येथे झालेल्या संमेलनात मी जाऊ शकलो नाही. यावेळी प्रिन्स चार्ल्स स्वत: आमंत्रण द्यायला आले होते. यावेळी आपल्याला यायचंच आहे, असं पत्र इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ यांनी मला लिहिलं. त्यामुळे हा मोदीचा विषय नाही तर भारतां वाढतं प्रोफाईल आहे."

Image copyright Getty Images

अडीच तासांहून अधिक चाललेल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसून जोशी यांनी केलं. कार्यक्रमात लोकांचे प्रश्न आणि प्रसून जोशी यांचे स्वत:चे प्रश्न विचारून मोदींना बोलतं केलं.

कार्यक्रमाच्या आधी मोदींनी ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे आणि राणी एलिझाबेथ यांची भेट घेतली.

नरेंद्र मोदी यांना लंडन दौऱ्यात विरोधाचा देखील सामना करावा लागला. मागच्या काही दिवसात भारतात कठुआ आणि उन्नाव येथे झालेल्या बलात्काराच्या घटना आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणी न्याय न मिळाल्यामुळे लंडनच्या लोकांनी रस्त्यावर निदर्शनं केली आणि मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या.

हेही वाचलंत का?

'आज आमच्याकडे कुठलीही बातमी नाही!' : 88 वर्षांपूर्वीचा बीबीसीतला तो दिवस!

मोदी मुदतपूर्व निवडणुका का नाही घेऊ शकत?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)